जहेर है की प्यार है तेरा चुम्मावाल्या ममताताई सध्या अध्यात्माच्या मार्गाला लागल्या आहेत

सिनेसृष्टी, क्रिकेट ही अशी क्षेत्र आहेत जिथे पावलोपावली तुम्हाला विविध प्रलोभनं दाखवली जातात. यापासून दूर राहून जर आडवाटेने न जाता प्रामाणिकपणे तुमचं काम तुम्ही सुरू ठेवलं तर तुम्ही निश्चितच यशस्वी होता.

परंतु या क्षेत्रात वावरणारी काही माणसं मोहाला बळी पडतात. करत असलेल्या कामापेक्षा जास्त पैसा मिळवण्याची चटक त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आणि इथेच ही माणसं स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेतात.

ही कहाणी अशाच एका अभिनेत्रीची. जी एकेकाळी यशाच्या शिखरावर होती परंतु स्वतःच्या हाताने तिने आयुष्य उध्वस्त केलं.

ही अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी.

एका मध्यमवर्गीय कुटुंबात ममताचा जन्म झाला. १९९२ साली आलेल्या नाना पाटेकर आणि राजकुमार यांच्या ‘तिरंगा’ सिनेमातून ममताने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढच्याच वर्षी १९९३ साली सैफ अली खान सोबत ‘आशिक आवारा’ सिनेमात ममता हीरोइन म्हणून झळकली.

या सिनेमामुळे ममताला फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळाला.

पुढे ‘क्रांतिवीर’, ‘करन अर्जुन’, ‘सबसे बडा खिलाडी’ अशा एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमांमध्ये ममताने काम केले. म्हणजे भिडूंनो, तुम्ही कल्पना करू शकता की ममता किती यशस्वी अभिनेत्री होती. ममताचे सिनेमे चर्चेत होते, परंतू आणखी एका कारणामुळे ममता कुलकर्णी हा ठिकठिकाणी सर्वांच्या गप्पांचा विषय बनला.

१९९३ साली एका फोटोशूटमुळे ममता कुलकर्णीला रातोरात प्रसिद्धी मिळाली.

झालं असं, सिनेवर्तुळात प्रसिद्ध असलेलं स्टारडस्ट मॅगझिन त्यांच्या मुखपृष्ठावर असलेल्या फोटोसाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होतं. कारण अनेक मोठ्या अभिनेत्रींनी या फोटोशूटसाठी नकार दिला होता.

कोणीतरी मॅगझिनला ममता कुलकर्णी हे नाव सुचवलं.

ममताने दोन – तीन बॉलिवुड सिनेमांमध्ये काम केलं होतं. तिला एवढी ओळख मिळाली नव्हती. त्यामुळे जेव्हा स्टारडस्टने ममताला विचारलं तेव्हा ममताने लगेच होकार दिला.

होकार दिल्यानंतर स्टारडस्ट मॅगझिनने फोटोशूटसाठी ममता समोर एक विचित्र अट ठेवली. या फोटोशूटसाठी ममताला टॉपलेस पोज द्याव्या लागणार होत्या, अशी ती अट होती.

हे ऐकताच ममता काही क्षण गडबडली. थोडा वेळ विचार करून तिने मॅगझिन समोर तिची भूमिका स्पष्टपणे मांडली. मी फोटोशूटसाठी तयार आहे. पण जर मला फोटो नाही आवडले तर तुम्ही ते छापायचे नाहीत, असं ममताचं म्हणणं होतं. मॅगझिनने ममताचं म्हणणं मान्य केलं.

सर्व तयारी झाली. ममताने कसलाही संकोच न बाळगता विविध हावभावात बिनधास्तपणे टॉपलेस पोज दिल्या.

शूट झाल्यानंतर ममताला फोटो प्रचंड आवडले. पुढे ममताचे हे फोटो मॅगझिन मध्ये छापण्यात आले. त्या वर्षी जितकी चर्चा स्टारडस्ट मॅगझिनची झाली नसेल तितकी चर्चा ममताच्या या फोटोंची झाली.

हे फोटो पाहण्यासाठी अनेकांनी हे मॅगझिन विकत घेतले. एका दिवसात ममताला भरपूर लोकप्रियता मिळाली. आणि ममता कुलकर्णीला लोकं चांगलीच ओळखू लागली.

यानंतर सुद्धा ममताचं फिल्मी करियर जोरात सुरू होतं.

राजकुमार संतोषी यांच्या घातक सिनेमामध्ये ममता कुलकर्णीने डान्स केलेला कोई जाये तो ले आए हे गाणं आजही सगळ्या आयटम सॉंगचा बाप मानलं जातं.

त्याकाळी हॉटनेसची फुटपट्टी ममता कुलकर्णी पासून मोजली जायची. एक मराठी मुलगी बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात सर्वात सेक्सी बॉम्ब म्हणून ओळखली जात होती.

अशातच राजकुमार संतोषी आणि ममतामध्ये झालेला वादाची इंडस्ट्रीत उलटसुलट चर्चा झाली. राजकुमार संतोषी यांनी १९९८ साली आलेल्या ‘चायना गेट’ सिनेमात ममता कुलकर्णीला हिरोईन म्हणून घेतले. सिनेमा फ्लॉप झाला.

परंतु सिनेमात उर्मिला मातोंडकरने केलेलं ‘छम्मा छम्मा’ हे आयटम साँग प्रचंड तुफान हिट ठरलं.

यामुळे दुःखी झालेल्या ममताने जाहीरपणे राजकुमार संतोषींवर जाहीर टीका करण्यास सुरुवात केली.

जेव्हा आपण दुसऱ्यावर चिखलफेक करतो तेव्हा आपले हात सुद्धा माखतात. ममताच्या या स्वभावामुळे एकेकाळी तिला सिनेमात घेण्यासाठी इच्छुक असलेले निर्माते, दिग्दर्शक तिला सिनेमात घेईनासे झाले.

२००२ साली आलेल्या ‘कभी तुम कभी हम’ या सिनेमानंतर ममताने बॉलीवूडला राम राम ठोकला.

२०१३ साली तिने बॉयफ्रेंड विकी गोस्वामी बरोबर लग्न केलं. लग्न करण्यासाठी ममताने धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारला. विकी गोस्वामी हा आंतरराष्ट्रीय ड्रग डीलर होता.

दहा वर्षांनी अचानक ममता कुलकर्णी पुन्हा चर्चेत आली. २०१६ साली ठाणे पोलिसांनी २००० कोटी इतक्या ड्रग तस्करीत विकी गोस्वामीला मदत केल्याप्रकरणी ममता कुलकर्णीला दोषी ठरवले.

या प्रकरणामुळे लोकांच्या विस्मरणात गेलेली ममता पुन्हा चर्चेत आली. पुढे ममता अध्यात्माच्या मार्गाला लागली. ‘एका योगिनीचे आत्मचरित्र’ नावाचं धार्मिक पुस्तक तिने लिहिलं.

यशाच्या शिखरावर असलेल्या ममताचं आयुष्य तिला कधी वेगळ्या दिशेला घेऊन गेलं, हे तिचं तिलाच कळालं नाही.

एकेकाळी सलमान खान, अक्षय कुमार यांसारख्या मोठ्या स्टारची हिरोईन राहिलेली ही अभिनेत्री आज अलिप्तपणे स्वतःचं आयुष्य जगत आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.