‘आमची माती आमची माणसं’ च्या मागे आहे हा आपला माणूस…

आपल्या लहानपणी घरात टीव्हीवर एकचं चॅनल लागायचं दूरदर्शन. दुपारी मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम असायचे. तिसरा डोळा ,दामिनी, घरकुल असे करता करता संध्याकाळी सातच्या बातम्याच्या अगोदर साडे सहा वाजता एक चिरपरिचित धून ऐकू यायची.

“ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती,

आमची माती आमची माणसं.”

ती शेतात नांगर मारणारी बैलजोडी तिच्या बरोबर शेतात राबणारा शेतकरी राजा. गाण्यात असलेल आदिवासी लोकनृत्य, हा शो बघायला अंगणात बसलेला आज्जा गडबडीत घरात शिरायचा. अजूनही जसच्या तसं चित्र डोळ्यासमोर राहत.

परवा सहज साडेसहा वाजता दूरदर्शन लावलं आणि काय आश्चर्य सेम तेच गाण तोच शो सुरु झाला. ‘आमची माती आमची माणसं’ अजूनही सह्याद्री वाहिनीवर सुरु आहे. ते पाहिल्यावर मात्र अभिमान वाटला आणि थोडीशी लाज सुद्धा वाटली.

अभिमान याचा की ही भारतातल्या सर्वात जास्त काळ चाललेल्या टीव्ही शो पैकी हा एक शो असेल आणि लाज याची की आमच्या मातीला आमच्या माणसांना विसरून आपण पुढे आलोय याचा.

‘आमची माती आमची माणसं’चा इतिहास नेमका काय याचा शोध घेतला तेव्हा “बोलभिडू” जाऊन पोहचले दूरदर्शनचे निवृत्त उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर साहेबांच्या पर्यंत. त्यांनी “बोलभिडूला” या शोचा नेमका प्रवास काय होता ते उलगडून सांगितलं.

साधारण १९५८ साली दूरदर्शनची स्थापना झाली. त्यावेळी आकाशवाणीवर काम करणाऱ्या पुल देशपांडे यांच्यासारख्या कलाकाराना परदेशातून प्रशिक्षण देऊन भारतात आपले शो सुरु करण्यात आले. दूरदर्शन थोड्याच दिवसात देशाच्या कानाकोपर्यात पोहचले. २ ऑक्टोबर १९७२ रोजी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर मुंबई दुरदर्शनची सुरवात झाली.

मराठी प्रेक्षकांना काय आवडेल याबद्दल अनेक चर्चा करण्यात आल्या आणि त्यातून एक कृषीविषयक कार्यक्रम सुरु करावा अशी कल्पना पुढे आली. दिल्ली दूरदर्शन वर कृषीदर्शन नावाचा एक कार्यक्रम असायचा.

आकाशवाणीवरही असाच एक कार्यक्रम व्हायचा त्याच धरतीवर मुंबई दूरदर्शनवर साधारण १९७५-७६ च्या दरम्यान  गावरहाटी हा कार्यक्रम सुरु झाला. यात अनेक तज्ञ कृषीसंशोधक या शोमध्ये शेतकर्यांना सल्ला द्यायला यायचे. यात कोणते बी बियाणे वापरावे, कोणत्या मृदेत कोणते खत वापरावे, पिकावर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो या टाईपचे मार्गदर्शन असायचे.

गावरहाटी कार्यक्रम लोकांच्या पर्यंत म्हणावा तसा पोहचला नाही. याचे मुख्य कारण त्यात वापरली जाणारी टेक्निकल भाषा अशिक्षित शेतकऱ्याना कळायची नाही. आणि शेतकऱ्यांचा कार्यक्रम आपल्याला कळणार नाही म्हणून इतर कोणी हा शो सुरु झाला की टीव्ही बंद करायचं. अखेर दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांनी यात महत्वाचे बदल करायचे ठरवले.

सर्वात प्रथम कार्यक्रमाचे नाव ‘गावरहाटी’ पासून “आमची माती आमची माणसं” करण्यात आलं. यासाठी नवी टिम उभी करण्यात आली.

याच टीम मध्ये होते शिवाजी फुलसुंदर.

शिवाजी फुलसुंदर डिसेंबर १९८१साली मुंबई दूरदर्शनमध्ये ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमाचा निर्माता म्हणून जॉईन झाले. पुणे जिल्हयातल्या जुन्नर तालुक्यातल्या वडगाव कांदळी या गावचा हा तरुण.

शेतकरी कुटुंबात जन्म झाला असल्यामुळे त्यांनी लहानपणापासून शेती व शेतीमधल्या प्रश्नांची दाहकता जवळून अनुभवली होती. शिक्षण बीएस्सी अग्री होत पण गावाकडची नाळ तुटली नव्हती. त्यांची जेव्हा या कार्यक्रमासाठी निवड झाली तेव्हा त्यांना आपल्या शेतकरी बांधवाना नेमके काय हवे आहे याची जाणीव होती. त्यांनी त्यानुसार कार्यक्रमात बदल केले.

सर्वात पहिलं काय केलं असेल तर ‘आमची माती आमची माणसं’ या शोचं गाण बनवलं. जेष्ठ कवी गीतकार शांताराम नांदगावकर यांनी या गाण्याचे शब्द लिहिले. चाल शिवाजी फुलसुंदर यांनी तेव्हाचे डेप्युटी डायरेक्टर याकुब सईद यांच्या मदतीने स्वतः दिली. यासाठी महाराष्ट्रातल्या लोकसंगीताचा वापर करण्यात आला. अतिशय सहज बनवलेलं हे गीत पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रावर गारुड घालेल हे त्यावेळी त्यांना तरी कुठे ठाऊक होत?

‘आमची माती आमची माणसं’ म्हणजे मुंबई दूरदर्शनचा अनोखा प्रयोग होता. १९८५ साली शिवाजी फुलसुंदरनी गप्पागोष्टी नावाच सदर सुरु केलं.

यात गावामधली आपल्या अवतीभवती दिसणारी माणसं गप्पा मारताना दिसायची. यात पाटील असायचे, हौसाकाकू असायच्या हरहुन्नरी गण्याबापू असायचा. आपण बोलभिडूवर जशा आपल्याभाषेत गप्पा मारतो त्याच पद्धतीने ही आपली माणसं टीव्हीवर वाड्याच्या सोप्यात चावडीवर गल्ली पासून दिल्लीची चर्चा करायची. आणि यातूनच शेतीची माहिती सोप्या भाषेत लोकांना पोहचायची.

आकाशवाणीमध्ये काम करणारे राजा मयेकर,मानसिंग पवार, रवी पटवर्धन, माया गुर्जर, जयंत ओक, वसंत खरे असे अनेक कलाकार यात होते. पुढे सिनेमामध्येही गाजलेले जेष्ठ कलाकार रवी पटवर्धन या कार्यक्रमात वस्ताद पाटीलचा रोल करायचे. बावीस मिनिटाच्या या नाटिकेसाठी आधी तालिमी करून वनशॉट वन टेकमध्ये हा हा कार्यक्रम बनायचा.

पुस्तकी भाषा टाळून बोलीभाषेत सादर होणारा हा कार्यक्रम खूप गाजला. शेतीची पार्श्वभूमी नसलेले लोकही हा कार्यक्रम पाहू लागले. फुलसुंदर यांनी या गप्पागोष्टी लोकच्यापर्यंत पोहचण्यासाठी एक मार्केटिंग स्ट्रटेजी देखील वापरली. कार्यक्रमाच्या शेवटी एक उखाणा लोकांना घातला जाई ज्याच उत्तर पुढच्या शो मध्ये दिल जाई. लोक उखाण्याच उत्तर पाहण्यासाठी वाट बघायचे.  

हा शो इतका लोकप्रिय झाला की याची दखल बीबीसी या जागतिक वृत्तवाहिनीने देखील घेतली. मनोरंजनातून प्रबोधन या कल्पनेच कौतुक करण्यात आलं. शिवाजी फुलसुंदर यांनी याशिवाय यशोगाथा या सदरातून प्रेक्षकांना प्रयोगशील व आदर्श शेतकऱ्यांची ओळख त्यांच्या वावरात जाऊन करून दिली.

शेतीत होणारे नवनवीन बदल त्यांनी महाराष्ट्रापर्यंत पोहचवले. राज्याच्या कानाकोपऱ्यातकोकणापासून ते विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या.

मुंबई दूरदर्शनच्या या कार्यक्रमाच्या या अभिनव कल्पनेचा आदर्श इतर भाषेतील वाहिन्यांनी देखील घेतला. आज अनेक खाजगी चॅनल वृत्तवाहिन्या शेतीविषयक कार्यक्रम घेतात याची पायाभरणी ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमापासूनच झाली असं म्हटल तर चुकीचं ठरणार नाही.

शिवाजी फुलसुंदर यांना या कार्यक्रमाच्या यशानंतर आणखी मोठया जबाबदाऱ्या देण्यात आल्या. दूरदर्शनच्या डेप्युटी डायरेक्टर पदापर्यंत त्यांची प्रगती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी डीडी किसान वाहिनीच्या निर्मितीमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले.राष्ट्रपतींचा पुरस्कार देखील मिळाला. पण एवढ्या वर्षांनंतरही ‘आमची माती आमची माणसं’ या लाडक्या अपत्याबद्दल बोलभिडूशी बोलताना त्यांच्या आवाजातून एक विशेष अभिमान डोकावत असतो.

तर भिडूनो शेतकऱ्याच्या पोरानो आज नोकरी, मिटिंग, संसार, ट्रॅफिक, इएमआयच्या गराड्यातून काही वेळ काढा आणि आपल्या या लाडक्या सिरीयलचा एखादा भाग तरी नक्की पहा. बापजाद्याच्या सातबाऱ्यावर ऐट करता ती राखायची कशी याचे एखाद दुसरे धडे नक्की मिळतील.   

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Pradip Bankar says

    Hi, how can I get old archive of this show, my grandfather was once interviewed in this show. I would like to have this archive.
    Can you let me know the contact to whom i should contact ?
    Regards
    Pradip Bankar

Leave A Reply

Your email address will not be published.