कोरोनापायी लोकं बेरोजगार झालीत, तिकडं भावानं रिलीफ फंडातून लॅम्बोर्गिनी घेतली

लहानपण असुदे किंवा कॉलेजमधले दिवस आपल्या कंपासपेटीत किंवा रूमच्या भिंतीवर एखाद्या भारी गाडीचं पोस्टर असायचं. भारी गाडी म्हणजे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू नाय, तर लालचुटूक फेरारी, पिवळी किंवा हिरवी लॅम्बोर्गिनी, काळी हमर असल्या बाप गाड्या. त्या गाड्यांच्या साईडला माधुरी दीक्षित, प्रियांका चोप्रा, तब्बू असल्या हिरॉईनचे फोटो असायचे. पोस्टरवर दिसणारी गाडी असो किंवा हिरॉईन, शंभर टक्के आपली होणार हेच टार्गेट तेव्हा डोक्यात असायचं.

पुढं माधुरी दीक्षितची माधुरी नेने झाली, प्रियांका तिकडं जोनासच्या घरची सून झाली. तसं लय दुःख झालं नाय, कारण तब्बूनं अजून लग्न केलेलं नाय आणि लॅम्बोर्गिनी घ्यायचा आपला चान्स अजूनतर आहे. खरं अवघडच चान्स आहे, पण म्हणलं जरा पॉझिटिव्ह राहून बघू. आपल्या घरात तब्बू नाय आली, तरी दारात लॅम्बोर्गिनी येणारच.

तुम्ही म्हणाल, एवढा मोटिव्हेशनचा ढोस कसा काय मिळालाय भिडू? त्याच काय झालं आज सकाळ सकाळ आम्ही ‘अपना टाईम आयेगा’ गाणं ऐकलं, त्यात युट्यूबवर दोन-चार व्हिडीओ पण पाहिले. डायरेक्ट चार्जिंग बसलं. आम्ही ठरवलंच होतं की, आता लय कष्ट करुन लॅम्बोर्गिनी घ्यायची.

तेवढ्यात एक बातमी दिसली, एका कार्यकर्त्यानी लॅम्बोर्गिनी घेतल्याची. आधी लय खुश झालो, असं वाटलं आपल्याला मार्ग सापडला. मग कळलं की भावानं लय बेक्कार झोल मारलाय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की असा काय झोल मारलाय की लॅम्बोर्गिनी घेता आली. दम धरा सांगतो…

तर किस्सा झालाय अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये. आता जसा आपल्याकडं कोरोनानं बाजार उठवला तसा त्यांच्याकडं पण उठवलाच होता. लय जणांचे जॉब गेले, छोटे व्यवसाय बंद पडले. लॉकडाऊन पण बराच काळ होतं, साहजिकच लोकं टेन्शनमध्ये आली. तिकडच्या सरकारनं एक निर्णय घेतला. ज्या ज्या छोट्या व्यवसायांना नुकसान सहन करावं लागलं, त्यांना लोनरुपी मदत करायची.

काही कार्यकर्त्यांनी खरं मनापासून अप्लाय केलं. यात एक कार्यकर्ता होता ली प्राइस, त्यानं सरकारच्या पेचेक प्रोटेक्शन स्कीमच्या अंडर लोन घेतलं. आपली एक कंपनी आहे आणि कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी पैशे नाहीत, असं सांगत त्यानं थोडं थिडकं नाही, तर १२ करोड रुपयांचं लोन घेतलं.

आता एवढे पैशे घेतलेत आणि कंपनीचा तर पत्ता नव्हताच. गड्याचं टार्गेट एकच होतं, पैशे उधळा. सगळ्यात आधी भावानं घेतली लॅम्बोर्गिनी एसयूव्ही. आपण रुममध्ये फोटो लावायचो तशीच डिट्टो. लॅम्बो एकदम भारी गाडी, पण तिच्यात काय लय लोकांना बसता येत नाही. त्यामुळं भावानं छोटा हत्ती घेतला, नाय नाय आपल्याकडचा नाही. फोर्डचा छोटा हत्ती, फोर्ड एफ-३५०. ट्र्कच असतोय, पण महागवाला.

दोन गाड्या घेऊन भावाचं मन भरलं नाही, मग त्यानी घेतलं रोलेक्स. आता बुडाखाली दोन वांड गाड्या आल्या, हातात चमकणारं घड्याळ आलं तरी पैसे उरलेले. मग गडी गेला स्ट्रीप क्लबात, तिकडं पार्ट्या आणि स्ट्रिपर्सवर वारेमाप नोटा उधळत त्यानं जीवाचं टेक्सास केलं.

आता देश लॉकडाऊनमध्ये बाहेर येतोय, लोकांकडं अजूनही फार पैसे नाहीत आणि हा गडी एवढी उधळपट्टी कशी काय करतोय? याचा डाऊट आला असणारच. पोलिसांनी जरा तपासाची चक्र फिरवली आणि लक्षात आलं, की ली प्राईसची कंपनीच अस्तित्वात नाही. त्या भावानं पैसे घेतले आणि चैन केली. आता घावलाय म्हणल्यावर सुट्टी नाहीच.

तिकडच्या न्यायालयानं त्याला ११० महिन्यांची शिक्षा ठोठावलिये, त्याच्याकडून जवळपास सात करोड रुपयेही वसूल करण्यात आले आहेत.

थोडक्यात काय तर भावाचा बल्ल्या झालाय, आता लॅम्बोर्गिनीही गेली असणार आणि फोर्डही. हात रोलेक्सशिवाय रिकामा दिसणार आणि क्लबात डान्स बघायला जाण्याऐवजी जेलची हवा खावी लागणार.

आता हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हाच आमचा मोटिव्हेशनचा ढोस थोडा कमी झाला. पण म्हणलं खचून जायला आपण काय झोल केलेला नाही. आपण निवांत सुरुवात करू, भले स्विफ्ट घेऊन फिरू पण उगा झोल करायच्या नादात पडायला नको. कष्ट करत राहिलो, तर लॅम्बोर्गिनी एखाद्या दिवशी दारात येईलच की…

आणि तब्बूचं म्हणाल तर तिचं अजून तरी लग्न झालेलं नाही… त्यामुळं थोडी का होईना आशा कायम आहे!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.