अफगाणिस्तानातल्या शिक्षकांना अहमदनगरमधून एक भिडू शिक्षक मदत करतोय.
अफगाणिस्तानात आता तालिबानच सरकार सत्तेवर आलयं. अफगाणी नागरिकांचे सर्वच हक्क या तालिबान्यांनी हिरावून घेतलेत. तिथं शिक्षणासंबंधित रोज नवनवे फतवे निघतायत. त्यामुळे शिक्षक विद्यार्थी सगळेच दहशतीखाली आहेत. आणि या दहशतीचं पर्यावसन तणावामध्ये होतंय.
हा तणाव कसा कमी करता येईल यासाठी अहमदनगर मधून एक भिडू कामाला लागला. हजारो किलोमीटर दूर राहून या अफगाणी शिक्षकांचं तणावाचं ओझं कस कमी करता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत ते डॉ. अमोल बागुल.
त्यांनी अफगाणिस्तानातल्या पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या शिक्षण क्षेत्रातील भविष्यासाठी, सुरक्षेसाठी डॉ. अमोल बागुल यांनी ‘वर्ल्ड टीचर फोरम’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून शंभराहून अधिक जागतिक संघटनांकडे दाद मागितली आहे.
डॉ. बागुल हे राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक आहेत. त्यांनी दहा वर्षांपासून ‘वर्ल्ड टीचर फोरम’ हे संकेतस्थळ सुरु केलं. त्यांच्या या फोरममध्ये बरेच परदेशी शिक्षक होते, तसेच काही अफगाणी शिक्षक होते. या माध्यमातून जागतिक पातळीवर विविध ‘ऑनलाइन’ उपक्रमही राबवले गेले.
बागुल सरांची थोडी माहिती
डॉ. अमोल बागुल हे उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी एकाच शैक्षणिक वर्षात २७६ शैक्षणिक उपक्रम राबविण्याची किमया केली आहे. कवि मनाच्या या शिक्षकाने जागतिक मराठी भाषादिनी अभ्यासक्रमातील कवितांचे ७७ सार्वजनिक ठिकाणी गायन केले. बासरीवादनातही आपला ठसा उमटविणाऱ्या डॉ.बागुल यांनी ७ हजार ५०० विद्यार्थ्यांना बासरीवर राष्ट्रगीत शिकविले आहे.
वर्ल्ड टिचर फोरममध्ये सक्रीय असलेले डॉ.बागुल यांनी या माध्यमातून १२१ देशातील ५ हजार शिक्षकांमध्ये होत असलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणि संकल्पनांच्या आदान-प्रदानात सहभाग घेतला आहे. त्यांनी ९ पुस्तके लिहिली आहेत. अमेरिकेतील हनिबेल स्पेस अकॅडमी आणि नासा स्पेस कँपसाठी त्यांची निवड झाली होती. त्यांनी २०० हून अधिक शैक्षणिक प्रशिक्षण घेतले असून ५० हून अधिक विशेष अभ्यास कार्यक्रमही त्यांनी पूर्ण केले आहेत. वर्ष २०११ च्या जनगणना कार्यक्रमातील उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना जनगणना राष्ट्रपती पदक मिळाले आहे.
कोरोनाच्या कालावधीत जेव्हा डॉ. बागुल यांनी ई लोक शिक्षा अभियान सुरु केले. तेव्हा बऱ्याच अफगाणी विद्यार्थी शिक्षकांनी या अभियानात सहभाग घेतला. कोरोनाच्या कालावधीत या अभियानात हजारो अफगाणी लोक जोडले गेले होते त्यांची संख्या रोडावली. आत्ता तर ती म्हणजेच गेल्या वीस दिवसात ती घटून दोनवर आली. अभियानात सहभागी असणाऱ्या मुली महिला तर गायबच झाल्या.
यामुळेच बागुल सरांनी काहीतरी करण्याचा निर्धार केला. अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैनिक परतल्यानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानात अराजक माजवलं. या परिस्थतीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या बागुल सरांनी अफगाणी शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींशी संपर्क साधला. आधीच भयग्रस्त असलेल्या या अफगाणी नागरिकांना सरांनी दिलासा दिला. कुठेही नाव येणार नाही या अटीवर त्यांनी तिथल्या शिक्षक आणि शिक्षक संघटनांशी संपर्क साधला.
त्यांनी अनुभवलेली विदारक परिस्थिती म्हणजे,
तिथले सर्वच नागरिक फोरमशी बोलताना मदतीची याचना करीत आहेत. ऑनलाईन कॉलवर बोलणारा नागरिक दुसऱ्या क्षणी दिसेल कि नाही इतकी भयानक परिस्थिती तिथं आहे. काही अफगाणी व्यक्तींनी सांगितलेली, अनुभवलेली विदारक स्थिती बघूनच डॉ. बागुल यांनी विविध जागतिक संघटनांकडे अफगाणी शिक्षण क्षेत्रासाठी ही मदत मागितली आहे.
‘वेटिंग फॉर सनराइज’
उजेडाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अफगाणी लोकांसाठी ‘वेटिंग फॉर सनराइज’ या ‘टॅगलाइन’ने काम करणाऱ्या डॉ. बागुल यांच्या ‘मिशन ऑफ अफ्युचर’ अंतर्गत तेथील शिक्षण घटकांशी समाज माध्यमांद्वारे संपर्क ठेवायला सुरुवात केली आहे. त्यांचे मानसिक समुपदेशन, आरोग्याची विचारपूस करतात. यासाठी त्यांना दूभाषक व अनुवादकांची मदत होत आहे. जागतिक आरोग्य संघटना व ‘युनिसेफ’साठी ‘ऑनलाइन’ स्वयंसेवक म्हणून केलेल्या कामाचा अनुभव डॉ. बागुल यांना या मिशनसाठी कामी येत आहे.
हे ही वाच भिडू
- यशवंतराव इंदिरा कॉंग्रेसमध्ये परत का गेले याचं उत्तर प्रधान मास्तरांना मिळालं…
- चारित्र्यवान प्रधान मास्तरांच्या गादीखाली साडी सापडते तेव्हा…
- स्वामीजींचे तीन पीए जे पुढे आपापल्या राज्याचे मुख्यमंत्री बनले, यातला एक पंतप्रधान झाला..