लातूरच्या या गड्याला २०१९ मध्ये बनवायचं आहे अपक्षांच सरकार
आम्हाला इंटरनेटवर एक इंटरेस्टिंग फोटो दिसला. फोटो होता एका अर्धवस्त्रामधल्या साधूचा. त्याच्या हातात बोर्ड होता
“मी पंतप्रधान श्री विजयप्रकाश एक भाकरी द्या एक रुपया द्या एका भिक्षुकाला पंतप्रधानपदी बसवूया.”
आम्हाला प्रश्न पडला कोण आहे हा गडी??? शोध घेतल्यावर कळालं यांच नाव “निवडणूकमहर्षी श्री.विजयप्रकाश कोंडेकर राहणार लातूर”
हे गुरुजी गेली तीस वर्ष निवडणुका लढत आहेत. को-ऑपरेटीव सोसायटीपासून ते राष्ट्रपतीपदाच्या सगळ्या निवडणुका त्यांनी लढवल्या आहेत. हे ऐकूनच आम्ही गार झालो. सरळ त्यांना फोन केला म्हटल बघू तरी कीस मिट्टीका बना है ये आदमी?
“लोकशाही हा एक खोल समुद्र आहे आणि मी या समुद्रात गटांगळया खाउन तरंगलोय.”
कोंडेकर गुरूजींनी पहिल्याच वाक्यात बाउन्सर टाकला.
त्यांच्या लोकशाहीबद्दलच्या संकल्पनाच आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरच्या होत्या. त्यांच म्हणन आहे,”भारतात सगळ्यात जास्त घाण कुठे आहे तर ती देश्याच्या पार्लमेंटमध्ये. ती घाण आहे पोलिटिकल पार्टीची. ही सगळी घाण मला आउट करायची आहे. ” काँग्रेस भाजप शिवसेना कम्युनिस्ट पार्टी या सगळ्याच पक्षाशी त्यांना प्रॉब्लेम आहे.
त्यांना २०१९ला मोदीना पाडून सरकार आणायचं आहे तेही अपक्षांच.
लातूर जिल्यातील शिरूर अनंतपाळ हे त्यांच मूळगाव. एका जैन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तिथेच त्याचं प्राथमिक शिक्षण झालं. महाराष्ट्र विद्यूत मंडळामध्ये ते नोकरी करत होते. एकोणीशे एकोणव्व्द मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि तिथून सुरु झाला हा प्रवास. ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी या छंदापायी आपली नोकरी सुद्धा सोडली. अंगात फक्त एक पंचा नेसून ते या प्रवासाला निघाले.
एखाद्या ध्येयाने पछाडलं तर माणूस काय करू शकतो याच उदाहरण म्हणजे विजय कोंडेकर.
त्यांनी लातूर मध्ये राहून विलासराव देशमुख, शिवराज पाटील यांच्या विरुद्ध निवडणुका अनेक वेळा लढवल्या पण या शिवाय शरद पवार , प्रिया दत्त ,मिलिंद देवरा, जया प्रदा यांच्या विरुद्ध ही निवडणूक लढवल्या.एवढंच काय तर राष्ट्रपतीपदाच्याही निवडणुकीतही ते उतरतात.
के आर नारायण यांच्या पासून प्रतिभाताई पाटील सगळ्यांच्या विरुद्ध ते होते. सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समोर ही जून २०१७ला कोंडेकर उभे राहिले होते. त्यांना मत किती मिळाले हे आम्ही विचारले नाही. तो मुद्दा गौणच आहे.
तसंही प्रत्येक निवडणुकीत त्यांच डिपॉजीट जप्त होत. पण गडी थांबत नाही. त्यांचाच भाषेत सांगायचं झालं तर ते थोडेसे पागल आहेत. आपल्या ध्येयाप्रती पागल.
आम्ही त्यांना त्यांचा निवडणुकीचा अजेंडा विचारला.
तर त्यांच म्हणन आहे की भारताच्या एकूण बजेटपैकी ७०% खर्च संरक्षणावर केला जातो. गेली सत्तर वर्षे हा खर्च केला जात आहे आणि तरीही हा प्रश्न सुटलेला नाही. याशिवाय नेतेमंडळीच्या सुरक्षिततेसाठी ही बराच पैसा खर्च होतो. ज्या देशामध्ये नागरिकांच्या पायाभूत सोयीसुविधांच्यासाठी पैसे नाहीत तिथे हा पैसा चुकीच्या कारणासाठी वाया घालवला जात आहे. खर्चासाठीची प्राथमिकता ठरवणे हे कोंडेकरांचे अपक्ष सरकार बनवल्यानंतरचे पहिले उद्दिष्ट्य असेल.
याशिवाय निवडणुकीचा खर्च कमी करणे हे हि त्यांचं प्रमुख उद्देश्य आहे.
भारताची पार्लमेंटही वेगवेगळ्यापक्षांची जेल बनली आहे. गोरगरीब जनतेला पैसा नसेल तर तिथे प्रवेश मिळत नाही.कोंडेकर मागणी करतात की फक्त सतराशे रुपये खर्चामध्ये कोणालाही ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढता आली पाहिजे. यामुळे पैसा नाही म्हणून कोणी लोकशाहीच्या या प्रक्रीयेपासून बाजूला राहणार नाही. शिवाय आज उमेदवार निवडणुकीला वारेमाप खर्च करतात आणि त्याच्या भरपाईसाठी पुढे भ्रष्टाचार करतात याला ही आळा बसेल.
पण कोंडेकराना सरकार स्थापन करण्यासाठी आणखी कमीतकमी २७२ उमेदवार लागणार ना. ते कुठून आणणार?
गुरुजी म्हणतात की हे उमेदवार तुमच्या आमच्यातच आहेत फक्त ते तुम्हाला माहिती नाहीत. त्यांनी अशा प्रत्येक मतदारसंघामधल्या अपक्ष निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांची यादीच निवडणूक आयोगाकडे मागितली आहे. ते म्हणतात की
“भारतात कोणाचचं नसेल तेव्हढ माझं नेटवर्क स्ट्रॉंग आहे. माझ्या अनेक पराभवाने मला निवडणूकीच शास्त्र इलेक्शन कमिशनरपेक्षा जास्त समजलं आहे. याचा वापर करून मी लोकांना जागृत करणार आणि यावेळी नक्की निवडणूक जिंकणार.”
स्वतः मुख्यमंत्र्याच्या गावात राहून त्यांच्या विरुद्ध लढायचं म्हणजे साधी गोष्ट नाही.
विजय कोंडेकरांच्या या उठाठेवीबद्दल कधी कुठल्या नेत्याने दमदाटी केली का? यावर ते म्हणतात की “सगळ्यांना माहिती आहे की मी एक फकीर माणूस आहे. मी माझ्या कार्यासाठी वाहून घेतलं आहे. मी कधी कुठल्या लाचलुचपतिला बळी पडू शकत नाही किंवा कुठल्या प्रेशरला जुमानत नाही. यामुळे कोणताच नेता माझ्या नादी लागण्याच्या भानगडीत पडत नाही.”
या कार्याबद्दल कोंडेकरांच्या घरच्यांना काय वाटत? गुरुजी सांगतात त्यांच्या घरच्यांनी मुलांनी कधी त्यांना अडवायचा प्रयत्न केला नाही. झोपायला उशी आणि खायला दोन भाकऱ्या एवढाच काय त्यांचा घराशी संबंध येतो.
असा हा अवलिया. त्याला ना कुठल्या जातीचं पाठबळ आहे ना पैशाचं तरी भारतातल्या दिग्गज नेत्याशी भिडायची हिंमत त्याचात आहे. कोणी चेष्टा करा अथवा शिव्या द्या, आपली लढाई चिकाटीने लढत आहे. त्यांच्या मुद्द्याशी आपले मतभेद जरूर असतील पण त्याच्या हेतूबद्दल इच्छाशक्तीबद्दल कोणालाच शंका नाही.
आजही लातूरमध्ये गांधी चौकात संध्याकाळी तुम्हाला हा ७२ वर्षाचा इंग्लिश बोलणारा म्हातारा आपला प्रचार करताना दिसेल. भेटला तर नक्की एखादा सेल्फी घेऊन ठेवा. काय माहित उद्या खरोखरच हा फकीर अपक्षांच सरकार स्थापन करून पंतप्रधान बनेल. लोकशाही मध्ये सगळच बेभरवशाचं आहे, नाही?
हे ही वाच भिडू.
- गोव्याच्या कानाकोपऱ्यात सिनेमा पोचविणाऱ्या अवलियाची गोष्ट !
- एमबीबीएस डॉक्टर, पण आदिवासींसाठी मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी तुडवतोय रानवाटा !
- महाराष्ट्राचा मांझी : ज्यांनी एकट्याच्या जीवावर अभयारण्य निर्माण केलं !