पंतप्रधानांच्या मन की बातमधील उत्पन्न ९० टक्के कमी झालयं, पण त्यामागची कारण काय आहेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन कि बात म्हणजे मागच्या ७ वर्षांच्या काळात देशातील सगळ्यात गाजलेल्या रेडिओ कार्यक्रमांपैकी एक म्हणवला जातो. पण सध्या याच कार्यक्रमातून सरकारला मिळणाऱ्या महसुलात मागच्या ३ वर्षांच्या काळात ९० टक्के घसरण झाली आहे.

त्यामुळेच सध्या या लोकप्रिय म्हणवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाची लोकप्रियता कमी झाल्याचा दावा केला जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार फौजिया खान यांनी या उत्पन्नाबाबत प्रश्न विचारला होता. याचं उत्तर देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी उत्तर दिले.

ठाकूर यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये हा कार्यक्रम लॉन्च झाल्यानंतर ३० कोटी ८० लाख रुपयांची कमाई या कार्यक्रमामधून झाली होती. मात्र मागच्या काळात हा आकडा इतका खाली आला आहे की २०२१ – २१ या आर्थिक वर्षात केवळ १ कोटी २ लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे.

मधल्या काळात हे उत्पन्न टप्प्या-टप्प्याने कमी होतं गेलं आहे.  २०१७ – २०१८ मध्ये हे उत्पन्न १० कोटी ६४ लाख रुपयांपर्यंत घसरले तर २०१८-१९ मध्ये ७ कोटी ४७ लाख रुपयांपर्यंत महसूल खाली आला होता. तर २०१९-२० मध्ये हा आकडा २ कोटी ५६ लाख इतका होता.

ठाकूर यांनी हे उत्पन्न कमी होण्याचं काही ठोस कारण सांगितले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, या कार्यक्रमाचा प्राथमिक उद्देश सरकारच्या रोजच्या मुद्द्यांवर देशातील नागरिकांशी संवाद साधणं हा आहे. सोबतच महसुलात जरी घसरण झाली असली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमामुळे रेडिओची लोकप्रियता वाढलेली आहे, सोबतच रेडिओला उर्जितावस्था देखील आली आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून चालवला जातं असलेला ‘मन कि बात’ हा कार्यक्रम संपूर्ण भारतात ऑल इंडिया रेडिओ, ३४ दूरदर्शन चॅनेल आणि ९१ खाजगी चॅनेल्सकडून प्रसारित केला जातं असतो. अलीकडील काळात या कार्यक्रमात पंतप्रधानांनी कोणत्या मुद्द्यांवर बातचीत करावी यावर मत मागितली जात असतात.

मग प्रश्न उरतो तो म्हणजे ‘मन कि बात’ कार्यक्रमाची लोकप्रियता कमी झाली आहे का?

सरकारी आकड्यानुसार,

२०१८ मध्ये आकाशवाणीकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये जवळपास ७० टक्के लोक या कार्यक्रमाला ऐकत असतात. तर ९१ टक्के लोकांना या कार्यक्रमामुळे पॉजिटिव्हिटी तयार होते. खुद्द तत्कालीन मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत माहिती दिली होती.

तर २०१८ ते २०२० या काळात ६ कोटी ते १४ कोटी लोकांपर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकर पोहोचू शकले होते. गतवर्षी म्हणजे २०२० मध्ये तब्बल १४ कोटी लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचू शकला होता. प्रसार भारती म्हणजे आकाशवाणी आणि दूरदर्शनकडून या कार्यक्रमाला ५१ भाषांमध्ये अनुवादित केलं जातं. त्यामुळे देशातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं सरकारला शक्य होतं. 

मग तरीही उत्पन्न कमी का झालं? 

मन कि बातचं उत्पन्न कमी का झालं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी मन कि बातला पैसे कशातून मिळतात हे बघणं महत्वाचं आहे.

तर मन की बातचं उत्पन्नाचा प्रमुख आणि एकमेव स्रोत म्हणजे कार्यक्रमाच्या दरम्यान आकाशवाणी आणि दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या जाहिराती. या जाहिरातींमधूनच सरकारला पैसे अर्थात उपन्न मिळतं असते. 

मात्र आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या उच्चाधिकाऱ्यांनी काही हिंदी माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, उत्पन्न कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे महामारी हे आहे. कारण संपूर्ण माध्यम विश्वात जाहिरातींवर मोठा परिणाम झाला आहे, याला दूरदर्शन आणि आकाशवाणी देखील अपवाद नाही.

मन की बात या कार्यक्रमाला सरकारी आणि खाजगी या दोन्ही प्रकारच्या जाहिराती मिळतं असतात. अधिकाऱ्यांनी सांगितले कि मागच्या २ वर्षांमध्ये खाजगी जाहिरातदारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर कमतरता आली आहे. तर त्याचवेळी सरकारच्या जाहिराती देखील मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत. 

मात्र कार्यक्रमचा मुख्य उद्देश हा जाहिराती गोळा करणं आणि त्यातुन महसूल मिळवणं हा नाही. तर जनता आणि राष्ट्रीय मुद्दे यांच्यामध्ये चर्चा घडवून आणणे ही जबाबदारी आहे. आणि त्यावरचं लक्ष केंद्रित केलं जातं आहे.

सोबतच याच उद्देशामुळे व्यावसायिक जाहिरातींऐवजी सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती वाढवल्या आहेत, आणि त्यातून सरकारला कोणताही महसूल मिळतं नाही. 

आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांशी चर्चा करताना सांगितले कि ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनकडून मिळणारी खराब सेवा हे देखील उत्पन्न कमी होण्याचं संभावित कारण असू शकते. कारण कधी कधी श्रोत्यांना केवळ मन कि बातसाठीच नाही तर अन्य शो साठी देखील प्रभाव विश्लेषण आणि अन्य उपायांवर पुरेसा डेटा दिला जात नाही..

तर यामागे आणखी एक कारण सांगितले जात आहे ते म्हणजे केंद्रीकृत प्रसारणासाठी काही स्थानिक केंद्रांना एकत्रित जोडण्यात आलं आहे. त्यामुळे या लहान स्टेशनकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचा देखील मोठा परिणाम जाणवत आहे. यावर्षी मार्चमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागावर प्रकाशित झालेल्या एक अहवालानुसार प्रसारभारतीच मागच्या ३ वर्षांमध्ये मिळणार उत्पन्न जवळपास अर्ध झालं आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.