इतिहास साक्षी आहे, दुष्काळातल्या माण नदीच्या पुराचा हिसका औरंगजेबाला देखील बसलेला

दोन दिवसात पाऊस झाला आणि कधी पाणी नसणाऱ्या माणदेशातील माणगंगा नदीला पूर आला. पूलांवरून पाणी वाहून जाऊ लागले आणि कधीच पूराचा अनुभव न आलेल्या सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेला देखील महापूराचा अनुभव घेता आला.

माण नदी ही सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील कळस्करवाडीत उगम पावते आणि पंढरपुर तालुक्यातील सरकोली येथे भिमा नदीला जाऊन मिळते. एकशेऐंशी किलोमीटरच्या या प्रवासात या नदीला ४२ ओहोळ, ओढे येऊन मिळतात.

संख्येवरून तुम्हाला वाटलं असेल की,

या नदीला बारमाही पाणी असेल तर तस नाही भिडू… 

ही नदी महाराष्ट्रातल्या पर्जन्यछायेच्या प्रदेशातून जाते. म्हसवड सारखा भाग हा सर्वात कमी पाऊस पडणारा भाग म्हणून ओळखला जातो. कोरडी ठणठणीत नदीत हीच काय तिची ओळख. ज्या नदीला कधी पाणी आलेलं पहायला मिळतं नाही त्या नदीला पूर येण्याची कल्पना देखील कवीकल्पना म्हणून फाट्यावर मारली जाते.

तर अशा नदीला दोन दिवसांच्या पाऊसामुळे पूर आला. दुष्काळ पाचवीला पुजलेल्या गावांना जेव्हा माणगंगेचं हे रौद्ररुप पहायला मिळालं तेव्हा लोकं आवाक् झाले. इतिहासात कधी या नदीला पूर आला होता का याच्या चर्चा झडू लागल्या आणि माणगंगेच्या पाण्याने हिसका दाखवलेल्या औरंगजेबाचा विषय निघाला.

सुमारे तीनशे वर्षांपुर्वीचा काळ.

त्या वेळी औरंगजेब मराठा स्वराज्य काबीज करण्याच्या ध्येयाने पिसाळला होता. स्वराज्याचा एक एक मावळा अखेरची खिंड लढत होता. याच काळात औरंगजेब सातारा सांगली परिसरात होता. नेमका या वेळी कृष्णा, वारणा आणि माण नद्यांना महापूर आला आणि औरंगजेबाचे न भरून येणारे नुकसान झाले.

सुमारे तीनशे वर्षांपुर्वीच्या कागदपत्रांमध्ये या पूराबद्दलच्या नोंदी असून मानसिंगराव कुमठेकर मांडणी केली होती. 

तीनशे वर्षांपुर्वी आलेल्या या महापूराच्या नोंदी मुघल अखबार, प्रत्यक्ष महापूर अनुभवलेले लेखक मुस्तैदखान, खाफिखान यांनी लिहून ठेवल्या आहेत. प्रसिद्ध इतिहासकार सेतू माधवराव पगडी यांनी या अखबारांचे भाषांतर केले आहे.

इस १७०० मध्ये औरंगजेबाने सातारा जिंकला. त्यानंतर तो मिरजेकडे येण्यासाठी निघाला भूषणगड, कलेढोण, झरे, आटपाडी मार्गे तो १२ सप्टेंबर रोदी खवासपूर येथे पोहचला. या भागात त्याचा मुक्काम होता. सैनिक, हत्ती, घोडे, उंट, मोठ्या प्रमाणात शाही सामान असा औरंगजेबाचा लवाजमा त्याच्या सोबत होता.

ऑक्टोंबर १७०० च्या दरम्यान या परिसरात असताना माण नदिला अचानक महापूर आला.

या महापूरात औरंगजेबाच्या छावण्या वाहून गेल्या.खुद्द औरंगजेब या महापूरात अडकला. इतका की त्याला पूराच्या पाण्यात बुडण्यापासून वाचताना त्याचा पाय मोडला. या प्रसंगात त्याला कायमचे अपंगत्व आले. आज माण नदिला पाणी आले होते असे सांगितले तरी ती मोठ्ठी धक्कादायक बातमी ठरू शकते.

पण इतिहासात माण नदीला पूर आला होता आणि त्यात हिंदुस्तानाचा सम्राट म्हणून संपुर्ण भारत काबीज करण्याची स्वप्न रचणाऱ्या औरंगजेबाचा पाय माण नदीचा पूरात मोडला होता हे पचवणं जरा जडच जातं. 

असाच महापूर दोन वर्षात पुन्हा आला होता पण तेव्हा औरंगजेब विशालगड ते कराड या मार्गात अडकला होता. 

ते साल होतं १७०२ चं. आणि विशेष म्हणजे पुन्हा या महापूरात औरंगजेब अडकला. जून १७०२ मध्ये औरंगजेबाने विशालगड जिंकला आणि तो कराडकडे येण्यासाठी निघाला. या दरम्यान परिसरात मोठ्ठा पाऊस सुरू होता. औरंगजेबाचे सैन्य वडगाव जवळ आले तेव्हा नद्या नाले दुथडी भरून वाहत होत्या. मोठ्ठा पाऊस सुरू होता. याबद्दल साकी मुस्तैदखान याने वर्णन करुन ठेवले आहे. तो म्हणतो की,

दहा दहा आणि वीस वीस पावसाचा वर्षाव होत असे. कुणाला डोळे उघडण्याची अगर डोके वर काढण्याची सोय नव्हती. सामान वाहून नेणाऱ्या जनावरांची स्थिती काय वर्णानी. ज्यांना बुडून मरायवयाचे होते ते मेले. ज्यांच्या नशिबात वाचणे होते ते वाचले.

याच पुरामध्ये औरंगजेबाचा खजिना नदीपार करताना वाहून गेला. सोन्याची सुमारे तीन हजार नाणी वाहून गेली. हि नाणी शोधण्यासाठी औरंगजेबाने पुन्हा पगारी सैनिक कामाला लावले होते पण हा खजिना हाती लागलाच नाही.

मुस्तैदखान नावेतून जीव वाचवणाऱ्या माणसांबद्दल जे लिहतो ते वाचून आजच्या पूरातून जीव वाचवणाऱ्या लोकांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही, तो लिहतो…

नदीची प्रत्येक लाट म्हणजे प्राणसंकटच. एकेका नावेत माणसे तरी किती भरावीत. एक शवपेटीका आणि त्यात हजार मुडदे अशी अवस्था होती. 

इतिहासकार खाफिखान म्हणतो की,

ओढ्याच्या काठाकाठावर पावलापावलावर माणसे आणि जनावरे मरून पडली होती. त्यांची इतकी दुर्गंधी  सुटली होती की जिवंत माणसांना जीव नकोसा झाला होता.

खुद्द औरंगजेबास कृष्णा, वारणा आणि माण नद्यांचा फटका बसल्याचे विस्तृत वर्णन करण्यात आले आहे. या महापूरातच त्याला कायमचे अपंगत्व आले.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Dr. Satish Kadam says

    औरंगजेबाचा पाय सांगलीतील पुरात नाहीतर सांगोला जिल्ह्यातील मान नदीच्या पुरात खवासपूर नावाच्या गावात छावणी असताना मोडलाय.

  2. Vishwajeet katkar says

    Proud of Mandeshi

Leave A Reply

Your email address will not be published.