संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याने सरसंघचालकांना चप्पल फेकून मारली होती…

मराठा सेवा संघ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधी भूमिकेसाठी ओळखली जाणारी संघटना. ९० च्या दशकात अकोल्यात स्थापन झालेल्या या संघटनेकडे मराठा समाजातील अधिकाऱ्यांची एक संघटना म्हणून देखील बघितलं जात होतं. मात्र आता तब्बल ३२ वर्षानंतर मराठा सेवा संघ भाजपसोबतच युती करण्याची भूमिका घेत आहे.

मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही भूमिका मांडली आहे. त्यामुळे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि भाजप आगामी काळात एकाच मंचावर दिसून आल्यास आश्चर्य वाटायला नको.

मात्र मराठा सेवा संघाची भूमिका एकेकाळी किती भाजप आणि संघविरोधी होती याचा प्रत्यय २००५ मधील एका घटनेतून येतो.

हि घटना म्हणजे मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्याने थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना चप्पल फेकून मारली होती. या घटनेनंतर याच कार्यकर्त्याचा सेवा संघाकडून सत्कार देखील करण्यात आला होता.

२००५ मध्ये तत्कालीन सरसंघाचलक के. सुदर्शन सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी येणार होते. मात्र सरसंघचालकांच्या येण्याला आणि त्यांच्या हस्ते पुतळ्याचे आणावरण करण्याला मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांच्यासह अनेक संघटनांनी विरोध केला होता.

पोलिसांनी त्यावेळी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या विरोधामुळे कार्यक्रमात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यातून पोलिसांनी आधी सुमारे ४० जणांना ताब्यात घेतले होते.

मात्र तरीही के एस सुदर्शन यांनी पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर त्यांच्यावर गर्दीतून एका अज्ञात व्यक्तीने चप्पल फेकून मारली. या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी बराच गोंधळ झाला. बातमी वाऱ्यासारखी शहरात, राज्यात आणि देशभरात पसरली. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माधव शिंदे यांच्याकडून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. 

यानंतर चप्पल फेकणारा महेश चव्हाण हा कार्यकर्ता संभाजी ब्रिगेडशी संबंधित असल्याचं समोर आलं होतं. कारण त्यानंतर महेश चव्हाण याचा मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडकडून मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी जाहीर सत्कार केला होता. सोबतच या कार्याबद्दल महेशला “शिवक्रांतीवीर” असा किताब ही पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिला होता. 

विशेष म्हणजे त्यावेळी पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी रेखा खेडेकर या भाजपच्या तिकिटावर बुलढाण्याच्या चिखली विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या. त्यावेळी रेखा खेडेकर तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. परंतु तेव्हाही खेडेकर यांनी सातत्याने भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर टीका करत होते.

त्यानंतर आता मराठा सेवा संघाने भाजपसोबत युती करण्याची भूमिका घेत आहेत. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या या भूमिकेवर भाजपकडून देखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले कि, असा कोणताही अद्यापपर्यंत निर्णय नाही. त्यांची ऑफर काय आहे हे बघूनच हा सगळा निर्णय घेतला जाईल.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.