कापड गिरण्यांनी गजबजणार गिरणगाव, डॉक्टरांच्या एका हाकेवर शांत व्हायला लागलं..

मुंबईतील कामगार वर्ग त्यांना ‘डॉक्टर साहेब’ म्हणून बोलवायचा. व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या त्यांचं घाटकोपर परिसरातील पंतनगर येथे त्याचं क्लिनिक होतं. जिथं ते कामगारांवर उपचार करायचे. अनेकवेळा तर गोर-गरीब कामगारांवर मोफतच उपचार करायचे.

डॉक्टरकी सुरु असतानाच आपल्याकडे येणाऱ्या कामगारांच्या व्यथाही ते ऐकून घ्यायचे. त्यातूनच त्यांनी कामगारांच्या प्रश्नांमध्ये, त्यातही प्रामुख्याने वेतनवाढीच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आणि हळूहळू मुंबईतील कामगारांचा नेता म्हणून त्यांचा उदय झाला. आपल्यापैकी अनेकांना कल्पना आलेली असेल की,

मी डॉ. दत्ता सामंत यांच्याविषयी सांगतोय.

२१ नोव्हेंबर १९३१ रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग इथे त्यांचा जन्म झाला होता. मुंबईतील जी.एस.मेडिकल कॉलेजमधून त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं होतं. खरं तर सुरुवातीच्या काळात त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा चळवळीशी रूढार्थाने संबंध नव्हता. परंतु गिरणगावातील कामगारांच्या प्रश्नांनी व्यथित झालेल्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली.

आक्रमक कामगार नेता म्हणून उदय. 

१९६५ साली त्यांनी ‘महाराष्ट्र खाण कामगार युनियन’ची स्थापना केली. हीच त्यांच्या कामगार चळवळीतील सक्रियतेची सुरुवात होती. खाण कामगारांच्या प्रश्नावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे लवकरच ते कामगारांमध्ये लोकप्रिय व्हायला लागले. डॉ. सामंतांच्या नेतृत्वाखाली संघटीत होणारा कामगार वर्ग मात्र खाण मालकांच्या नजरेत सलत होता.

त्यामुळे डॉ. सामंत यांच्यावर हल्ला देखील झाला होता, या हल्ल्यानंतर कित्येक दिवस ते हॉस्पिटलमध्येच होते.

या हल्ल्यातून बरे झाल्यानंतर मात्र डॉ. सामंत हल्याने डगमगून न जाता अधिक झुंजारपणे चळवळीत सक्रीय झाले. चळवळीतील कार्यव्यस्ततेमुळे पुढे त्यांनी आपली डॉक्टरकीची प्रॅक्टिससुद्धा बंद केली आणि पूर्णवेळ कामगारांच्या लढ्यासाठी देऊ लागले.

१९६७ सालच्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली आणि जिंकली देखील. हा त्यांचा विधानसभेतील पहिला प्रवेश होता.

काही काळ डॉ.सामंत काँग्रेसच्या कामगार संघटनेशी जोडले गेले होते. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मुलुंड येथून विधानसभेची निवडणूक देखील जिंकली होती. पण आणीबाणीच्या काळात ते काँग्रेसपासून दुरावले गेले. सामंतांच्या वाढत चाललेल्या हिंसक कामगार आंदोलनामुळे आणीबाणीच्या काळात त्यांना अटक करण्यात आली.

पुढे १९७७ साली ज्यावेळी ते बाहेर आले त्यावेळी एक झुंजार कामगार नेता म्हणून ते प्रचंड लोकप्रिय झाले होते.

त्यांच्या एका हाकेवर गिरणगाव ठप्प व्हायचं

‘डॉक्टर साहेब’ सामंतांची कामगार चळवळीवरील पकड आणि कामगारांच्या मनात त्यांच्याविषयी असलेलं स्थान इतकं वंदनीय होतं की पुढे एक दिवस असा उजाडला की कापड गिरण्यांनी गजबजणार अख्ख गिरणगाव त्यांच्या एका हाकेवर शांत व्हायला लागलं. डॉक्टर साहेबांनी बंदचं आवाहन करायचं आणि गिरणगाव ठप्प व्हायचं, असा एक शिरस्ताच झाला होता.

त्यांच्या रूपाने गिरणी कामगारांना एक असा नेता मिळाला होता, ज्याच्या पुढे माना तुकवत गिरणी मालक कामगारांच्या मागण्या मान्य करत असत.

भारताच्या इतिहासातील कामगारांचा सर्वात मोठा संप

डॉ. सामंत यांनी खरं तर आपल्या आयुष्यात कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भात अनेक यशस्वी आंदोलनं केली. कामगारांच्या हक्कासाठी ते अविरत झटत राहिले, पण ते सार्वाधिक लक्षात ठेवले जातात ते १९८२ सालच्या गिरणी कामगारांच्या आंदोलनाच्या निमित्ताने.

जवळपास २ वर्षे चाललेला कामगारांचा हा बंद भारताच्या इतिहासातील कामगारांचा सर्वात मोठा संप समजला जातो.

१९८१ सालच्या मध्यापर्यंत मुंबईतील कापड गिरणी कामगार आणि मालकांमधील संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला होता. अशा वेळी कामगारांनी आपल्या संघर्षाचं नेतृत्व करण्याची विनंती डॉ. सामंतांना केली होती. डॉ. सामंतांनी  ‘राष्ट्रीय गिरणी कामगार संघटने’च्या  विरोधात जाऊन या संघर्षांचं नेतृत्व स्वीकारलं.

डॉ. सामंत यांनी कामगारांची पगारवाढ आणि १९४७ सालच्या ‘मुंबई औद्योगिक कायदा’ यांमध्ये बदल करण्याच्या मागणीसाठी १८ जानेवारी १९८२ पासून आंदोलनाची सुरुवात केली.

मुंबई औद्योगिक कायद्यात बदल करण्याची मागणी अशासाठी करण्यात येत होती, कारण या कायद्यान्वये ‘राष्ट्रीय गिरणी कामगार संघटने’व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही गिरणी कामगार संघटनेला अधिकृत संघटना म्हणून मान्यता नाकारण्यात येत होती.

जवळपास २ लाख कामगार संपावर

डॉ. सामंतांनी सुरु केलेल्या या आंदोलनाला गिरणी कामगारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि जवळपास २ लाख कामगारांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला. या आंदोलनाने देशभरातील वातावरण तापलं. मुंबईतील कापड गिरण्या ठप्प झाल्या. इतर उद्योगांवर देखील त्याचा वाईट परिणाम झाला. अनेक ठिकाणी पोलीस आणि कामगार यांच्यामध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. कहर तर तेव्हा झाला जेव्हा हवालदारांनी देखील आपल्या वेतनवाढीसाठी संघटना तयार केली.

मुंबईत घडणाऱ्या या घटना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची झोप उडविण्यासाठी पुरेशा होत्या. पण इंदिरा गांधींनी महाराष्ट्र सरकारला आदेश दिले होते की काहीही झालं तरी, डॉ.सामंतांसमोर झुकायचं नाही आणि त्यांची एकही मागणी पूर्ण करायची नाही. डॉ. सामंतांची मागण्या मान्य केल्या तर इतर उद्योगांशी संबंधित कामगार संघटना देखील आंदोलनाच्या पवित्र्यात उतरतील अशी भीती त्यांना वाटत होती.

संप मोडून काढण्यासाठी बाळासाहेबांनी केलेला प्रयत्न फसला

महाराष्ट्र शासनाने बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला हाताशी धरून हा संप फोडण्याचे प्रयत्न केले होते. स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनीच सप्टेंबर १९८२ मध्ये मुंबईतील कामगार मैदानावर सभा घेऊन कामगारांना इशारा दिला होता,

“कामगारांनी सामंतांना सोडून शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र यावं, आपण कामगारांना न्याय मिळवून देऊ”

असं आवाहन बाळासाहेबांनी केलं होतं. मात्र त्यांच्या या इशाऱ्याचा  कामगारांवर आणि संपावर कुठलाही परिणाम झाला नाही.

कामगारांचा हा संप जवळपास २ वर्षे चालला. संपामुळे अनेक गिरणी मालकांनी आपल्या गिरण्या बंद करून त्या मुंबईच्या बाहेर नेल्या. त्यांनी गिरणगावातील आपल्या जमिनी अव्वाच्या-सव्वा किमतीत बिल्डरांना विकल्या. गिरणी कामगार बेरोजगार झाले, पण सरकारने आपली भूमिका बदलली नाही. ‘डॉक्टर साहेब’ सामंतांना आपल्या आयुष्यातील कदाचित सर्वात महत्वाच्या संघर्षात पराभवाचा सामना करावा लागला.

तरीही कामगारांमधील लोकप्रियता घसरली नाही !

डॉ. सामंतांचा हा संप फेल गेला असला आणि अनेक कामगारांना बेरोजगार व्हावं लागलं असल तरी कामगारांमधील त्यांची लोकप्रियता मात्र बिलकुल कमी झाली नव्हती. कारण १९८४ साली जेव्हा इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देश निवडणुकांना समोरा गेला, त्यावेळी राजीव गांधी यांच्या नेत्तृत्वाखालील काँग्रेसला न लोकसभेत ‘न भूतो, न भविष्यती’ यश मिळालं.

या लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधकांचा पुरता सफाया झाला होता. मात्र अशा परिस्थितीत देखील डॉ. सामंत दक्षिण मुंबईतून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. खासदार म्हणून काम करताना त्यांनी सातत्याने कामगारांच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला.

निर्घृण हत्येने दुखद अंत.

डॉ. सामंत नव्वदच्या दशकात देखील कामगार चळवळीत सक्रीय राहिले. पुढे १६ जानेवारी १९९७ रोजी ४ बंदुकधारी मोटारसायकलस्वारांनी त्यांच्यावर तुफान गोळीबार करून त्यांची  हत्या केली. असं सांगतात की त्यांच्या मृत शरीरातून १७ गोळ्या बाहेर काढण्यात आल्या होत्या.

काही लोकांनी ही राजकीय हत्या असल्याचं सांगितलं, तर काहींनी हत्येचा संशय गिरणी मालकांवर घेतला. पुढे त्यांच्या हत्येत अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हात असल्याचं समोर आलं. डॉ. सामंत गेले आणि त्यांच्या जाण्यामुळे कामगारांनी आपला लढवय्या सेनापती गमावला.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.