कुमार गौरवने पहिल्याच चित्रपटाला नकार दिल्याचा मंदाकिनीने परफेक्ट बदला घेतला

अचानकपणे मिळालेले यश चिरंजीव नसतं असं म्हटलं जातं! अभिनेता कुमार गौरव च्या बाबतीत हे अगदी खरं झालं. १९८१ साली कुमार गौरव आणि विजेता पंडित यांचा ‘लव्ह स्टोरी’ हा सिनेमा सुपर डुपर हिट ठरला.

कुमार गौरवचे वडील राजेंद्र कुमार यांनी हा चित्रपट निर्माण केला होता. नवीन फ्रेश जोडी, आर डी बर्मन यांचे मधुर संगीत, अमित कुमार चा फ्रेश आवाज आणि सोबतीला लता मंगेशकर यांचा स्वर! चित्रपट सुपरहिट ठरला. रातोरात कुमार गौरव मोठा स्टार बनला. त्याचा स्टारडम वाढला. फिल्म मॅगझिन मधून त्याच्या छायाचित्रांना वाढती मागणी येऊ लागली. तरुणींना तो खूप आवडला होता.

त्या काळात कॉलेजला जाणाऱ्या मुलींचा तो पहिला ‘क्रश’ होता. मिडिया ने नवा राजेश खन्ना अशी त्याची इमेज करायला सुरुवात केली.

अनेक नव्या नायिका त्याच्या सोबत काम करायला उत्सुक होत्या. पहिल्याच सिनेमातील हे दणदणीत यश त्याच्या डोक्यात गेलं! त्याने त्यानंतर जाहीर करून टाकलं की ,” मी यानंतर फक्त प्रस्थापित नायिकांसोबतच काम करेन. नवोदित नायिकांसोबत मी काम करणार नाही!”

याच काळात निर्माता दिनेश बन्सल एक चित्रपट बनवत होते ‘शिरी फरहाद’ हिंदी सिनेमात अतिशय लोकप्रिय असलेले हि प्रेम कथा ते नव्याने रुपेरी पडद्यावर आणणार होते. यासाठी त्यांना कुमार गौरव अभिनेता म्हणून हवा होता. यास्मिन नावाची एक अभिनेत्री या चित्रपटाची नायिका असणार होती. अतिशय कोवळी, गोरी आणि डोळ्याने घारी असलेली ही अभिनेत्री हिंदी सिनेमात कुमार गौरव सोबत काम करण्यासाठी उत्सुक होती.

आपल्या पहिल्याच सिनेमाचा नायक कुमार गौरव असल्याने ती प्रचंड खुश होती. परंतु तिच्या आनंदावर विरजण पडले. कुमार गौरवने सांगितले,” मी या नवोदित अभिनेत्री सोबत काम करणार नाही!” लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. दिनेश बंसल यांनी हर तऱ्हेने कुमार गौरवला समजावून सांगितले पण कुमार गौरव ऐकायला तयार नव्हता. त्याने चित्रपट नाकारला. त्याच्या नकारा नंतर दिनेश बन्सल यांचा देखील हा सिनेमा बनवण्याचा इंटरेस्ट कमी झाला.

सर्वात नाराज झाली अभिनेत्री यास्मिन. चित्रपटात येण्याचे तिचे स्वप्न कुमार गौरवच्या या निर्णयाने एका क्षणात भंग पावले. पुन्हा ती आपल्या गावी परत केली.

काळ मोठा विचित्र असतो. तो क्षणात राजाला रंक करत असतो आणि रंकाला राजा करत असतो. असाच काहीसा प्रकार घडला. ‘लव स्टोरी’ या चित्रपटानंतर कुमार गौरव यांचा एकही चित्रपट चालला नाही. कुमार गौरवने अनेक हीरोइन सोबत काम केले पण यश त्याला कायम चकवा देत राहिलं. याच काळात राजकपूर आपल्या ‘प्रेम रोग’ या चित्रपटाच्या नंतर नवीन चित्रपटाच्या तयारीला लागले होते. या सिनेमासाठी त्यांना उत्तर भारतातील एक अभिनेत्री हवी होती. जी गोरी असेल, मांसल असेल, आणि घाऱ्या डोळ्याची असेल.

अभिनेत्री यास्मिन हिला हे सर्व गुण आपल्यात आहे याची जाणीव झाली. तिने राज कपूरला कॉन्टॅक्ट केले. राज कपूर यांनी तिची ‘स्क्रीन टेस्ट’ घेतली आणि तिला आपल्या चित्रपटाची नायिका बनवले. चित्रपट होता ‘राम तेरी गंगा मैली’. या चित्रपटात तिचा नायक होता राज कपूर यांचा मुलगा राजीव कपूर. हिमालयाच्या पहाडी वातावरणातील ही लव स्टोरी प्रचंड लोकप्रिय ठरली. राज कपूर ने यास्मिन हिचे नाव बदलून मंदाकिनी ठेवले. भरपूर अंग प्रदर्शन तसेच स्तनपानाचे शॉट देऊन मंदाकिनी रातोरात सुपरस्टार बनली.

तिचा टीआरपी प्रचंड वाढला. अनेक निर्माते तिला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी चढाओढ करू लागले. इकडे कुमार गौरव च्या यशाचा आलेख फार खाली आला. मागच्या चार वर्षात त्याच्या एकाही सिनेमाला यश मिळाले नाही. हिट सिनेमाच्या तो प्रतीक्षेत होता. त्यासाठी त्याला यशस्वी अभिनेत्री हवी होती. त्यावेळी त्याला आठवण झाली दिनेश बंसल यांची! त्याने “मंदाकिनीला माझी नायिका बनवा आणि चित्रपट दिग्दर्शित करा” असे सांगितले.

कुमार गौरव चा प्रस्ताव घेऊन दिनेश बन्सल मंदाकिनीकडे गेले.

तिला स्टोरीचा प्लॉट आवडला आणि ज्यावेळेला दिले नायकाचे नाव विचारले त्यावेळेला ती प्रचंड संतापली. दिनेश बंसल आता तिला वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला “कुमार गौरवने स्वतः तुला नायिका म्हणून घ्यायचे ठरवले आहे.” त्यावेळी मंदाकिनी प्रचंड चिडली आणि म्हणाली,” त्याची ही अक्कल त्यावेळेला कुठे गेली होती? मी मुळीच त्याच्यासोबत कुठलाही चित्रपट करणार नाही. एक तर तुम्ही नायक बदला. अगदी नवोदित नायक देखील मला चालेल पण कुमार गौरव सोबत मी काम करणार नाही!”
अशा प्रकारे मंदाकिनीने आपल्यावर झालेल्या अन्यायाचा असा बदला घेतला. एक वर्तुळ वेगळ्या अर्थाने पूर्ण झाले!

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.