फिल्डमार्शल माणेकशॉ कलामांना म्हणाले, “राष्ट्रपतीजी माझी एक तक्रार आहे “

पैशाने माणसं श्रीमंत होतात आणि कर्तृत्वाने माणसं मोठी होतात. आपल्या देशात अशीच मोठी माणसं होऊन गेली आहेत. त्यांचं नाव जरी काढलं तरी मनात त्यांच्याविषयी अपार आदर निर्माण होतो. हा किस्सा अशाच दोन माणसांचा. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम आणि फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यात घडलेला.

सॅम माणेकशॉ आणि डॉ. अब्दुल कलाम यांनी देशासाठी फार मोठं योगदान दिलं. थोडक्यात दोघांबद्दल माहिती सांगायची झाली तर..

सॅम माणेकशॉ यांचा जन्म पंजाब येथील अमृतसर येथे. वडिलांच्या विरोधात जाऊन त्यांनी डेहराडून येथील भारतीय मिलिटरी अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी भारतीय मिलिटरी अकॅडमी मधून विद्यार्थ्यांची जी पहिली तुकडी बाहेर पडली त्यामध्ये सॅम माणेकशॉ यांचा समावेश होता.

१९३४ मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांची सेकंड लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली. माणेकशॉ यांनी भारतीय सैन्यात ४० वर्ष आपली सेवा दिली. दुसरे महायुध्द तसेच भारत – पाकिस्तान दरम्यान १९४८, १९६५ आणि १९७१ साली जी युद्ध झाली त्या युद्धांमध्ये सॅम माणेकशॉ यांचा सहभाग होता. १९७३ साली माणेकशॉ यांना फिल्ड मार्शल पद मिळाले.

सॅम माणेकशॉ यांचं देशासाठी कर्तृत्व अतुलनीय तर दुसरीकडे डॉ. अब्दुल कलाम.

भारताचे ११ वे राष्ट्रपती. अग्निपंख लावून वैज्ञानिक दृष्ट्या संशोधन करणारा एक शास्त्रज्ञ. वैज्ञानिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी सर्वांसाठी एक वस्तुपाठ आहे. अमेरिकेतील नासा मध्ये त्यांनी ४ महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले होते. १९९८ साली भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या या दोन थोर व्यक्तिमत्त्वांच्या भेटीचा हा एक किस्सा.

सॅम माणेकशॉ यांनी कार्यालयीन निवृत्ती घेतल्यानंतर ते तामिळनाडू येथील कुन्नूर शहरात राहत होते. प्रकृती ठीक नसल्याने जवळच असणाऱ्या एका मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ते अॅडमिट होते. तेव्हा भारताचे राष्ट्रपती होते अब्दुल कलाम. अब्दुल कलाम यांचा त्यावेळी कुन्नूर ला दौरा होता. यावेळी त्यांना कळालं, की

जनरल माणेकशॉ मिलिटरी हॉस्पिटलमध्ये आहेत.

देशाचे राष्ट्रपती असल्याने अब्दुल कलाम यांचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. पण तरीही त्यांनी माणेकशॉ यांची भेट घेण्यासाठी रोजच्या दिनक्रमात असलेला ठराविक वेळ राखून ठेवला.

वेळ काढून अब्दुल कलाम यांनी सॅम माणेकशॉ यांची भेट घेतली. पंधरा मिनिटं या दोघांनी एकमेकांशी गप्पा मारल्या. कलाम यांनी माणेकशॉ यांच्या तब्येतीची विचारपूस केली. निघायला थोडा वेळ शिल्लक असताना कलामांनी माणेकशॉ यांना विचारले.

“तुम्हाला कशाची आवश्यकता आहे का? मी तुम्हाला काही मदत करू शकतो?”

यावर माणेकशॉ यांनी लगेच कलामांना सांगितले, “हो महोदय, माझी एक तक्रार आहे.” माणेकशॉ यांच्या उत्तराने कलामांना आश्चर्य वाटले. त्यांनी तत्परतने नेमकी काय तक्रार आहे हे माणेकशॉ यांना विचारले. तेव्हा माणेकशॉ यांनी उत्तर दिलं,

“तुम्ही स्वतः वेळात वेळ काढून माझ्या भेटीला आला आहात. पण मी देशाच्या राष्ट्रपतींना उठून सॅल्युट सुद्धा करू शकत नाही, ही माझी तक्रार आहे.”

सॅम माणेकशॉ यांनी दिलेलं उत्तर ऐकून अब्दुल कलाम निःशब्द झाले. त्यांनी भरून आलेल्या मनाने सॅम माणेकशॉ यांच्या हातावर हात ठेवला. माणेकशॉ आणि कलाम दोघांचेही डोळे पाण्याने डबडबले होते. समाधानाने कलाम यांनी माणेकशॉ यांचा निरोप घेतला.

या भेटी दरम्यान अब्दुल कलामांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून माहिती मिळाली की, माणेकशॉ यांच्या नियमातील काही अडचणीमुळे गेल्या २० वर्षांपासून फिल्ड मार्शल पदाची पेन्शन मिळाली नाही. हे कळताच दिल्लीला जाऊन त्यांनी एका आठवड्यात माणेकशॉ यांची सर्व थकीत पेन्शन मंजूर केली.

नंतर १.२५ कोटींचा चेक त्यांनी संरक्षण खात्याच्या सचिवांतर्फे विशेष विमानाने माणेकशॉ यांच्यापर्यंत पोहोचवला.

भिडूंनो, या थोर व्यक्तिमत्त्वांची गोष्ट इथेच संपत नाही. कलामांनी त्यांचं कर्तव्य केलं. जेव्हा पेन्शन चा चेक सॅम माणेकशॉ यांना मिळाला तेव्हा त्यांना निश्चित आनंद झाला. जी रक्कम त्यांना मिळाली होती ती सर्व रक्कम स्वतःजवळ न ठेवता सॅम माणेकशॉ यांनी आर्मी रिलीफ फंडासाठी दान केली.

तर हा होता सॅम माणेकशॉ आणि डॉ. अब्दुल कलाम यांचा किस्सा. सध्याच्या काळात अशा ग्रेट व्यक्तिमत्त्वांची देशाला खरी गरज होती. अधिक काही न बोलता शेवटी निःस्वार्थी वृत्तीच्या या दोघा महान व्यक्तींना मनोमन प्रणाम !

हे ही वाच भिडू.

2 Comments
 1. Prakash Deshmukh says

  No,
  The claim about pension is wrong.
  You can check and recheck from reliable sources.
  I can provide you links to prove its wrong.
  Go for fact check and you get your answer.

 2. Rahul Kadam says

  Israel madhe मुलांना school madhe Bahirji Naik yanncha dhada shikvtat ka?

Leave A Reply

Your email address will not be published.