३१ हजार कोटींचा मालक असणारा मुंबईचा आमदार !!

राजकारणी म्हटल्यावर पैसा आलाच. किंबहुना पैसा असल्याशिवाय राजकारण करताच येत नाही. जर तो राजकारणी बिल्डर असेल तर? ते ही भारतातला सर्वात श्रीमंत बिल्डर !!

नाव मंगलप्रभात लोढा

भाजपचे दक्षिण मुंबईच्या मलबार हिलचे सलग सहाव्यांदा आमदार बनलेले मंगल प्रभात लोढा यांचा लोढा ग्रुप ३१ हजार कोटींचा मालक बनला आहे आणि सलग दुसऱ्यांदा भारतातील सर्वात श्रीमंत बिल्डर्सचा मान पटकावला आहे.

मंगल प्रभात यांचा जन्म राजस्थान मधील जोधपुरचा. वडील गुमन माल लोढा हे स्वातंत्र्य सेनानी आणि न्यायाधीश होते. नंतर जनसंघातून राजकारणात ही सक्रीय होते.मंगल प्रभात यांनी जोधपुर युनिव्हर्सिटीतनंं बीकॉम आणि कायद्याची पदवी घेतली आणि ते राजस्थान हाय कोर्टात वकिली करू लागले.

काही दिवसांनी गुमनमल लोढा यांची न्यायाधीश म्हणुन राजस्थान हायकोर्टात बदली झाली या मुळे मुलगा  मंगल प्रभातची अडचण वाढली. ज्या कोर्टात बाप न्यायाधीश आहे तिथेच आपण वकिली करणे योग्य नाही असे त्यांना वाटू लागले आणि त्यांनी हायकोर्टात न जाण्याचा निर्णय घेतला.

१९८१ साली ते मुंबईत आले मुंबईत आपण एखादा व्यवसाय केला तर तो चांगला चालेल असं विचार मनात आला आणि वकिली मागे पडली. बांधकाम व्यवसाय सुरु केला.

नाव दिलं लोढा ग्रुप!

भांडवल कमी असल्याने सुरवात मुंबईच्या बाहेर नव्याने तयार होणाऱ्या शहरीकरणातून सुरु केली. छोटी छोटी कामे सुरवातीला केली.चाळी बांधल्या,घरे बांधली आणि व्यवसाय पुढे नेला. कामाचा दर्जा चांगला असल्याने ग्रुप नावारूपाला आला. गुंतवणूक करणारे वाढले भांडवल वाढले आणि हळू हळू लोढा ग्रुप मोठे प्रोजेक्ट करू लागला.

एके काळी मुंबईच्या बाहेर काम करणारा लोढा ग्रुप आता मुंबई सहितच अनेक मोठ्या शहरात मोक्याच्या ठिकाणी महागड्या सदनिका,इमारती ,रहिवाशी सोसायट्या बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज लोढा बिल्डर्सची एक सदनिका कोटीच्या घरात जाते.

राजकारणात एन्ट्री 

मधल्या काळात मंगल प्रभात यांचे राजकारण ही चालू झाले. मंगल प्रभात यांच्यासाठी राजकारण अजिबात नवीन नव्हते वडील स्वातंत्र्य चळवळीत असल्याने घरात तसे वातावरण होते. वडील गुमनमल लोढा १९६९ ते १९७१ पर्यंत राजस्थान जनसंघाचे अध्यक्ष होते. पुढे १९७२ते ७७ पर्यंत आमदार ही राहिले.

मंगलप्रभात ही कॉलेज जीवनापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सभासद होते. मुंबईत आल्या नंतर काही काळातच मंगल प्रभात भाजपच्या संपर्कात आले होते. मुंबई भाजपच्या आतल्या वर्तुळात त्यांचे मोठे नाव होते.

पुढे १९८९ साली वडील गुमनमल लोढा लोकसभेला निवडून आले. वडिलांच्या या विजयाने मुलाला कॉन्फिडन्स दिला का काय माहित नाही पण, मंगल प्रभात राजकारणात लक्ष घालू लागले. आयुष्यात बर्‍यापैकी स्थैर्य आल्याने ही चैन त्यांना परवडणारी होती.

१९९५ साली भाजप सेना युती जोरात होती मंगल प्रभात यांना भाजपने मलबार हिल मधून उभे केले.

गेली चार टर्म आमदार असणारया कॉंग्रेसच्या बळवंत देसाईना मंगल प्रभात यांनी पाडले आणि तेव्हा पासून ते या मतदारसंघातून सहावेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मंगल प्रभात प्रखर हिंदुत्ववादी आहेत त्यांनी आजवर अनेक मुद्यांना हात घातला आहे.

मोहमद अली जिनां यांचे मुंबईतील जिना हाउस पाडण्याची मागणी असो ,की माहितीचा अधिकार सभागृहात लावून धरणे असो. मंगल प्रभात यांनी आमदार म्हणून ते केलं.

मंगल प्रभात आज भाजपचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत त्यांना महाराष्ट्रातील अनेक लोक ओळखत ही नाहीत. तर भिडूनो मंगल प्रभात यांना इतक महत्व देण्याच्या कारण असं आहे की भाजप दीर्घ काळासाठी  जेव्हा महाराष्ट्रात सातेत नव्हता तेव्हा पक्षाला आर्थिक बाजूने सांभाळणारे मंगल प्रभात लोढा होते.

लोढा यांनी १९९९ ते २०१४ पक्ष जेव्हा सातेत नव्हता तेव्ह खिश्यातले पैसे घालून पक्षाची आर्थिक बाजू सांभाळली अशी राजकीय गोटात चर्चा आहे.

काल हुरुन रिपोर्ट आणि ग्रोही इंडियाने ‘ग्रोही हुरुन इंडिया रियल इस्टेट रिच लिस्ट २०१९” जारी केली. या यादीमध्ये लोढा यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. लोढा ग्रुपचे एकूण वार्षिक उत्पन्न ३१ हजार ९३० कोटी रूपये इतके झाले आहे. गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये लोढा यांनाच पहिलं स्थान देण्यात आलं होतं.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.