आंब्याचे गुणकारी फायदे.

सदरहू विषय मांडण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे नुकतच गुरूवर्य संभाजी भिडे यांनी आंबे खाल्याने अपत्यप्राप्ती होत असल्याचं विधान केलं. या विधानावर चौफेर टिका झाली. काहींनी हे विधान मिडीया तोडून मोडून तावून सुलाखून सांगत असल्याचं सांगितलं. मात्र गुरूवर्य संभाजी भिडे यांचा सदरचे विधान करत असल्याचा व्हिडीओ देखील उपलब्ध झाला.

सदरच्या घडामोडी चालू असताना फळांच्या राजावर अन्याय अत्याचार सुरू झाले. खरच आंब्यामुळे काय होते  का याची चौकशी रसिक आपआपल्या डॉक्टरांकडे करु लागले म्हणूनच आपल्या वाचकांची आंब्याच्या रसाबाबत असणारी हि रसिकता संपवण्याच्या ध्येयानं आम्ही घेवून आलो आहोत खरच आंब्याने काय होत का अर्थात आंब्याचे गुणकारी फायदे. 

१) पित्तशामक 

आंबा हे फळ पित्तशामक आहे. आंबा खाल्यामुळे शरिरातील पित्त कमी होत असल्याचं डॉक्टर सांगतात. कोणतं फळ पित्तशामक असावं हे ओळखावं कस तर, जे फळ जास्त खाल्याने हगवण लागते असं फळ पित्तशामक असतं. 

२) रोगप्रतिकारक शक्ती वाढते 

आंबा फळामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. डॉक्टरांच्या मते एक साधारण आकाराचा आंबा हा त्याच आकाराच्या काजू किंवा बदामाएवढी उर्जा शरिरास मिळवुन देतो. आंब्यामुळे शरिरातील नसा, स्नायू, ट्यिश्यू मजबूत होतात. 

३) दृष्टी सुधारण्यास मदत होते. 

आंब्यामध्ये व्हिटामिन ए, बीटा कॅरोटिन व अल्फा कॅरोटिन असते. यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. आंब्यामुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होते. 

४) रक्तदाब संतुलित राहतो. 

तज्ञांच्या मते ताज्या आंब्यातून शरिरात पोटॅशियमचा पुरवठा होतो. १००० ग्रॅमच्या आंब्यातून १५६ ग्रॅम पोटॅशियम मिळते. पोटॅशियममुळे शरिराचे रक्तदाब संतुलित राहण्यासाठी मदत मिळते. 

५)  अॅनिमियापासून बचाव  

ताज्या आंब्यामध्ये तांब्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे शरिरातील लाल पेशी वाढण्यास मदत होते. परिणामी रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. 

आंब्याचे घरगुती उपाय ( सदरचे उपाय स्वत:च्याच घरात करण्यात यावेत ) 

आंब्याच्या कोयीचे तेल हे केसांसाठी उपयुक्त असते. केस गळत असतील अथवा केस पांढरे झाले असतील तर आंब्याची कोयीचा बाहेरील भाग काढून आतले बी तीळाच्या अथवा खोबऱ्याच्या तेलात मिक्स करावे. ते तेल डोक्याला लावल्यास केस गळायचे थांबतात अस घरगुती तज्ञ सांगतात. 

आंब्याच्या झाडांची पाने दाराला तोरण लावण्यासाठी उपयोगी येतात त्याचप्रमाणे ती पाने कोमट पाण्यात उकळून त्यांचा काढा देखील उपयोगात आणला जावू शकतो. सदरचा काढा पिल्यास रक्तदाब कमी होत असल्याचं सांगितल जात पण हा सल्ला घरातल्या जेष्ठाकडून घ्यावा. बोल भिडूच्या दारात भांडण आलेली चालत नाहीत याची नोंद वाचकांनी घ्यावी. 

याव्यतिरिक्त आंब्याचे विशेष असे स्थान नसल्याचं तज्ञ डॉक्टर कळवतात.