मुख्यमंत्री बदलत राहिले पण माणिकरावांची खुर्ची हलली नाही.

गोष्ट आहे २०१० सालची. वर्धा येथे सोनिया गांधींचा मेळावा होता. आदल्या दिवशी नागपूरमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी ही पत्रकार परिषद घेणार होते. अजून माईक वगैरे सेट करणे सुरु होतं. नेते मंडळीच्या आपापसात अनौपचारिक गप्पा सुरु होत्या. माणिकराव चतुर्वेदींना म्हणत होते,

“मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्षाला निधीच देत नाहीत. मंत्र्यांकडून प्रत्येकी १० लाख रुपये गोळा करून हा कार्यक्रम आयोजित करावा लागला आहे . “

या दोघांचं हे बोलणं बरोबर माईकने टिपलं आणि थेट नॅशनल मीडियावर झळकलं. थेट लोकसभे पर्यंत याविषयावर आवाज उठला. सोनिया गांधींच्या सभेसाठी काँग्रेस मंत्र्यांकडून बळजबरीने पैसे गोळा करते असा थेट आरोप झाला.  हे वादग्रस्त वक्तव्य करणारे माणिकराव ठाकरे चांगलेच अडचणीत आले. अशोक चव्हाणांपासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडे त्यांच्याबद्दल नाराजी होती.

माणिकराव ठाकरेंची प्रदेशाध्यक्षपदावरून गच्छंती होणार याबद्दल सगळ्यांची खात्री बसली. मात्र योगायोग म्हणावा कि आणखी काय पण फक्त काहीच दिवसात आदर्शच प्रकरण आलं. अशोक चव्हाण यात पुरते अडकले. पुढे त्यांना राजीनामा द्यावा लागला.

अशोक चव्हाण गेले. या आधी विलासराव होते, अशोक चव्हाणांच्या नंतर पृथ्वीराज चव्हाण आले, २०१४च्या लाटेत त्यांचं देखील सरकार गेलं. माणिकरावांच्या खुर्चीला धक्का देखील लागला नाही.

बाळासाहेब , राज उद्धव या ठाकरेंनी महाराष्ट्राचं राजकारण निश्चित गाजवलं पण त्यांच्याशी कोणतंही नातं नसलेला हा सेल्फ मेड ठाकरे काँग्रेस पक्ष गाजवत राहिला .

मूळचे यवतमाळ दारव्हाचे. वयाच्या २४-२५ व्या वर्षी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली आणि राजकारणात धडाक्यात एंट्री केली. कॉलेजच्या जीवनापासून एनएसयुआय मार्फत काँग्रेसमध्ये सक्रिय होते. पक्षात कशी प्रगती करायची याच बाळकडू वेळीच मिळालं होतं. हुशार माणिकरावांनी जिल्हापरिषदेवरून आमदारकीची शिडी वेगाने पार केली.

१९८५ साली ते पहिल्यांदा आमदार बनले.

आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये विदर्भाच्या ग्रामीण भागातून आलेल्या या तरुण आमदाराने विधानसभेत चांगलीच छाप सोडली. सत्ताधारी पक्षातले असून त्यांनी विधानसभेत प्रश्ने विचारण्याचा सपाटा लावला. विरोधकांनी अखेर त्यांची सभापतींकडे तक्रार केली. तेव्हाचे अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांना या बद्दल स्पष्टीकरण द्यावे लागले.

महाराष्ट्राच्या विधिमंडळ इतिहासातील हा एकमेव प्रसंग असावा. यावरूनच माणिकराव ठाकरे या नावाची जादू लक्षात येईल.

त्यांची धडाडी बघून लवकरच त्यांना महाराष्ट्र युवक काँग्रेसच अध्यक्षपद देण्यात आलं. पुढच्या टर्म मध्ये माणिकराव हे पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील झाले. पद पण साधंसुधं नाही तर गृह राज्य मंत्रीपद. 

१९९३सालच्या मुंबई बॉम्बस्फोटमध्ये देश हादरला तेव्हा माणिकराव गृहराज्यमंत्री होते. ते सांगतात, या बॉम्बस्फोटानंतर मी सगळी यंत्रणा कामाला लावली. वेळेत सर्वत्र मदत पोहचवली.पोलीस दलात सुधारणा करण्याचे काम माझ्याकडे आले होते, माझ्या परीने कार्यक्षमतेने मी ते पूर्ण केले.

किल्लारी भूकंपावेळी मुंबईत नियंत्रणकक्ष सुरु करायची जबाबदारी देखील मुख्यमंत्र्यानी माणिकराव ठाकरेंच्याकडे सोपवली होती. याकाळात संसदीय कामकाज मंत्री म्हणून त्यांनी दोन्ही सभागृह सांभाळण्याचं काम देखील केलं. त्या पाच वर्षांच्या काळात माणिकराव राज्यातले मोठे नेते म्हणून नावारूपास आले.

पुढे काँग्रेसची सत्ता गेली तेव्हा विरोधी बाकावर बसून त्यांनी युती सरकारला हादरवण्याचं काम जोरात केलं. आर आर पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत त्यांनी सभागृह गाजवलं.

वेळोवेळी योग्य निर्णय घेणे ही माणिकरावांची खासियत राहिली होती. पवारांच्या लाडक्या माणसांच्या यादीत त्यांचं नाव होतं तरी राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा माणिकराव त्या पक्षात गेले नाहीत. विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले. याचा फायदा देखील झाला.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनल्यावर त्यांच्या विश्वासातल्या नेत्यांच्या यादीत माणिकराव देखील झळकू लागले. पुन्हा मंत्रिपद पटकावलं. पण जेव्हा विलासराव जाऊन सुशीलकुमार आले तेव्हा ज्या २२ मंत्र्यांना नारळ देण्यात आलं त्यात माणिकराव देखील होते.

माणिकरावांच्यावर कोसळणाऱ्या संकटाची यादी थांबली नव्हती. २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना संजय राठोड यांनी पराभूत केलं. जातीच्या समीकरणात बंजारा मतांचा फटका त्यांना बसला.

पण त्यांचं सुदैव असं की विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदी परतले. त्यांनी माणिकरावांना विधानपरिषदेवर घेतलं. इथून माणिकरावांनी मागे वळून पाहिलं नाही. राज्यात मोठमोठे लोकनेते, सहकारातले दिग्गज असतानादेखील राजकारणाच्या मानाने कमी वय आणि अनुभव असून देखील त्यांना २००८ साली काँग्रेसच प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं.

काँग्रेसमध्ये राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या खालोखाल किंवा कधी कधी डोईजड देखील ठरेल असे हे प्रदेशाध्यक्षाचं पद. वसंतदादा, प्रतिभा ताई पाटील, सुशीलकुमार शिंदे , नासिकराव तिरपुडे, रामराव आदिक अशा वजनदार नेत्यांनी हे पद भूषवलं.

सहसा मुख्यमंत्र्यांवर अंकुश ठेवायचा म्हणून दिल्लीतून या नेत्याची निवड केली जाते.

 ते प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. पुढे २६/११ वेळी त्यांचं पद गेलं, अशोक चव्हाण आले ते गेले, पृथ्वीराज चव्हाण आले त्यांची पण खुर्ची गेली. तब्बल सात वर्ष प्रदेशाध्यक्ष पदावर राहण्याचा विक्रम माणिकराव ठाकरेंनी केला. सोनिया गांधींच्या नंतर राहुल गांधी आले तरी माणिकरावांची प्रदेशाध्यक्ष पदाची पकड मजबूत होती. 

काँग्रेसच्या पक्षसंघटनेत सर्वात विक्रमी पदावर राहण्याचा चमत्कार माणिकराव ठाकरेंनीच करून दाखवला.

मात्र या काळात त्यांच्यावर अनेक आरोप देखील झाले. काँग्रेसची राज्यात झालेल्या वाताहतीचे खापर त्यांच्या माथ्यावर फोडण्यात आले. कधी पक्षाच्या निधीत घोळ घातला म्हणून तर कधी पैसे घेऊन पक्षातील पदे वाटली असे आरोप होत राहिले. त्यांच्या काळातील तिन्ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्च्या अस्थिर करण्यात माणिकरावांनी आपली शक्ती वाया घालवली असच मानलं गेलं.

हे सगळं घडत असताना माणिकरावांचा आपल्या मतदारसंघातील पकड कधीच निसटून गेला होता. २००४ सालच्या पराभवानंतर त्यांनी निवडणूक लढवायचं थांबवलं. दिल्लीच्या श्रेष्ठींच्या प्रमाणे ड्रॉईंग रूम पॉलिटिक्स करायचं असा समज त्यांनी स्वतःबद्दल करून घेतला.

राज्याच्या निवडणूक सांभाळाव्या लागत असल्यामुळे मी विधानसभा लढवणार नाही असं त्यांनी जाहीर देखील केलं होत.

प्रतिष्ठेचा प्रश्न करत त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांशी भांडून मुलासाठी लोकसभा, विधानसभा तिकीट आणलं पण दोन्ही वेळी पराभव स्वीकारावा लागला.

मोठंमोठ्या घोषणा एका बाजूला करत असताना २००८ साली ८२ आमदार निवडून आलेली काँग्रेस माणिकरावांच्या डोळ्यादेखत रसातळाला गेली. २०१४च्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा देखील दिला होता पण पक्षाने तो स्वीकारला नाही. अखेर एक वर्षानंतर त्यांना हटवून अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं.

पुढच्या काळात त्यांना विधानपरिषदेवर घेतलं नाही. माणिकराव नाराज झाले. लोकसभेवेळी वाजत गाजत त्यांनी यवतमाळ मधून उमेदवारी दाखल केली मात्र त्यातही पराभव झाला. अगदी राज्यपाल निर्देशित विधानसभा आमदारकी साठी सेटिंग लावण्यापर्यंत वेळ त्यांच्यावर आली.

कोणताही मोठा गॉडफादर नसताना विदर्भाच्या ग्रामीण भागातून येऊन माणिकरावांनी केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद होती मात्रदिल्लीच राजकारण करतानाही गावाकडची पकड सोडू नये हे माणिकराव विसरले आणि त्याचा त्यांना मोठा फटका बसला.  

जेव्हा कधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा सुरु झाली की नवीन प्रदेशाध्यक्ष कोण याच्या संभाव्य यादीत पुन्हा माणिकरावांचं नाव चमकत राहते. काही काळापासून बॅकफूट वर असलेले माणिकराव पुन्हा फ्रंट फूट वर येऊन बॅटिंग करताना दिसतात. काँग्रेस आपल्या सर्वाधिक अनुभव असणाऱ्या या नेत्याला पुन्हा संधी देईल का हाच सर्वात मोठा प्रश्न नेहमी पडत राहतो.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.