रक्ताचा एक थेंबही न सांडवता खटिंग यांनी तवांग भारतात सामील केलं होतं…

भारताला अनेक युद्धांचा सामना करावा लागला. सॅम माणेकशॉ, कॅप्टन विक्रम बत्रा, अनुज नायर अशी शेकडो नावे या युद्धांचे नायक म्हणून उदयास आली आणि इतिहासाच्या पानात त्यांची नोंद झाली. त्याचवेळी काही नावे विस्मृतीच्या अंधारात कुठेतरी हरवून गेली. युद्धातील त्यांच्या योगदानाच्या कथा तर दूरच, अनेकांना त्यांचे नावही माहीत नाही.

मेजर रालंगनाव बॉब खटिंग हे असेच एक नाव. तेच, खटिंग, ज्यांच्या नावावर रक्त न सांडता तवांग भारतात सामील करण्याचा विक्रम आहे.

खटिंग यांना त्यांच्या कामाबद्दल खूप सन्मान मिळायला हवा होता पण त्यांना हवा तसा सन्मान मिळाला नाही. आज आपण त्यांच्या या भीमपराक्रमाबद्दल जाणून घेऊया.

फेब्रुवारी १९१२ मध्ये खटिंग यांचा जन्म मणिपूरच्या तंगखुल नागा समुदायात झाला. खटिंग हे लहानपणापासूनच कुशाग्र होते. त्याची बौद्धिक क्षमता पाहून त्याच्या पालकांनी त्यांना खूप काही शिकवले. गुवाहाटीच्या बिशप कॉटन कॉलेजमधून ग्रॅज्युएशनची पदवी मिळवणारे तंगखुल नागा समुदायाचे ते पहिले व्यक्ती बनले.

अभ्यास करण्याचे महत्त्व त्यांना समजले. यामुळेच शिक्षण संपल्यानंतर त्यांनी मुलांना शिकवण्याची योजना तयार केली आणि आसाममधील बारासिंगा, दरम येथे शाळा उघडली. त्यांच्या प्रतिभेने आणखी प्रभावित होऊन एका ब्रिटीश अधिकाऱ्याने त्यांची उखरुल हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती केली.

या प्रवासात आपण सैन्याचा एक भाग बनून रणांगणावर जाऊ, असे खटिंग यांना क्वचितच वाटले असेल. पण, दुसरे महायुद्ध सुरू होताच परिस्थिती अशी बनली की त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. खाटिंगसाठी सैन्यात भरती होणे सोपे नव्हते.

त्यांची उंची फक्त 5 फूट 3 इंच होती. पण, प्रयत्न करणाऱ्यांचा पराभव होत नाही, असं म्हणतात. खटिंग यांनी प्रयत्न केले आणि अखेर त्यांना यश मिळाले.

1939 मध्ये, दुसरे महायुद्ध जगभर वाढत असताना, 27 वर्षीय खटिंग ब्रिटीश सैन्यात भरती झाले आणि त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. 1941 मध्ये, त्यांना किंग्स कमिशन मिळाले आणि ते 19व्या हैदराबाद रेजिमेंटमध्ये (नंतर 7 वी कुमाऊं रेजिमेंट) सहभागी झाले. दुसऱ्या महायुद्धात बर्मा आघाडीवर शत्रूचा मुकाबला करण्यासाठी खटिंग यांना मणिपूर सेक्टरमधील ‘व्ही फोर्स’ ऑपरेशनचे स्थानिक कर्णधार म्हणून पाठवण्यात आले होते.

या मोहिमे दरम्यान त्यांनी तंगखुल तरुण आणि नेत्यांना ज्या प्रकारे संघटित केले, ते सर्वांसाठी एक उदाहरण बनले. जपानी सैन्याने वेढा घातलेल्या शांगशाकच्या लढाईत सुमारे 50 पॅरा-ब्रिगेड्सना वाचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

खटिंग यांच्या योजनांचा परिणाम असा झाला की जपानी सैन्याला माघार घ्यावी लागली. दुसऱ्या महायुद्धातील योगदानाबद्दल ब्रिटिश लष्कराने त्यांना मिलिटरी क्रॉस (MC) देऊन सन्मानित केले.

दुसऱ्या महायुद्धानंतर खटिंग यांनी लष्कराची नोकरी सोडली आणि 1947 मध्ये मणिपूरला परतले. पुढे, त्यांचे जवळचे मित्र आणि तत्कालीन मणिपूरचे महाराज कुमार, कुमार प्रियब्रत सिंग यांच्या सांगण्यावरून, ते पर्वतीय प्रशासनाचे प्रभारी मंत्री झाले.

पुढे जेव्हा मणिपूर हे भारतीय राज्य बनले तेव्हा 1950 मध्ये ते आसामच्या तत्कालीन राज्यपालांच्या विनंतीवरून आसाम रायफल्समध्ये सामील झाले आणि आसाम-तिबेट भूकंपामुळे बेजार झालेल्या भागात त्यांनी मदतकार्य केले.

पण त्यांच्या कारकिर्दीत सगळ्यात जास्त उल्लेखनीय कामगिरी म्हणजे तवांग भारतात सामील केले.

ते वर्ष 1950 होते, जेव्हा आसामचे राज्यपाल जयरामदास दौलतराम यांच्या आदेशानुसार तत्कालीन नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी (NEFA) चे सहाय्यक राजकीय अधिकारी म्हणून खटिंग यांनी तवांगच्या भारतात विलीनीकरणाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.

200 सैनिकांसह, मॅकमोहन रेषेच्या बाजूने बोमडिला भागातील तिबेट झोंगच्या पहिल्या सीमा चौकीपर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी झाले. 1951 मध्ये, तवांग भारताशी जोडण्याच्या मोहिमेत त्यांना अखेर यश आले.

पूर्वी तवांग स्वतंत्र तिबेट प्रशासनाचा एक भाग होता. विशेष म्हणजे खटिंग यांनी रक्त न सांडता तवांग भारतात घेतले होते. त्यासाठी त्यांनी साथीदारांसह तवांगमध्ये मोर्चा काढला. गावातील ज्येष्ठांशी बोलले, तिबेटी अधिकाऱ्यांना भेटले आणि तिबेटी प्रशासनाची कार्यशैली समजून घेतली. याशिवाय त्यांनी मोनपा आदिवासी समाजाशी मैत्री केली आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या, हेच त्यांच्या यशाचे मोठे कारण ठरले.

तवांग भारताला जोडल्यानंतर, खटिंग यांनी भारतीय सीमावर्ती प्रशासकीय सेवा (IAFS) चे पहिले अधिकारी, नागालँडचे मुख्य सचिव आणि परदेशात आदिवासी समुदायाचे पहिले भारतीय राजदूत म्हणून काम केले. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

12 जानेवारी 1990 साली खटिंग यांचं निधन झालं मात्र, तवांगच्या यशासाठी त्याला योग्य तो सन्मान मिळाला नाही.  कालांतराने त्यांचं स्मारक बांधण्यात आलं खरं पण त्यांनी केलेलं भरीव काम आजही अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहे.

  हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.