आयपीएसची नोकरी सोडून मणिपूरची ‘लेडी सिंघम’ निवडणुकीच्या मैदानात उतरलीये

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा मधल्या विधानसभा निवडणुकां बरोबरच मणिपूरमध्येही विधानसभा निवडणुका आहेत. मणिपूरमध्ये ६० जागांसाठी २ टप्यात मतदान होणार आहे. ज्यातला एक टप्पा आज म्हणजे २८ फेब्रुवारीला पार पडला तर दुसरा टप्पा ५ मार्चला होणार आहे. 

मात्र बातम्यांमध्ये मणिपूरची चर्चा कुठेतरी कोपऱ्यात एखादी दुसरी होत असते. कारण  भारतातला नॉर्थइस्ट एरिया कायमच दुर्लक्षित राहिला आहे. मग तो विकासाच्या दृष्टीनं असो किंवा राजकारणाच्या. आता नाही म्हंटल तरी यामागचं कारण कुठेतरी तिथली पुरुषप्रधान संस्कृती सुद्धा असू शकते. जरी तिथल्या महिलांची संख्या पुरुषांच्या बरोबरीनं बाकीच्या राज्याशी कम्पेअर केली तर जास्तच आहे. 

त्यात मणिपूरमध्ये महिला मतदारानाची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. म्हणजे एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, मणिपूरमध्ये सध्याच्या पहिल्या टप्प्यात महिला मतदारांची संख्या १० लाख ४९ हजार  ६३९ आहे तर पुरुष मतदाराची संख्या ९ लाख ८५ हजार ११९ आहे. पण असं असून सुद्धा राज्यात महिला नेतृत्वाचा मुद्दा कायम ऐरणीवर असतो.

 आजपर्यंत मणिपूरला कुठलंच भक्कम अस महिला नेतृत्व मिळालेलं नाही. 

पण सध्या राज्यात हेच चित्र बदलणार असल्याची जोरदार चर्चा सुरुये. यामागचं कारण म्हणजे यास्कुल विधानसभा मतदारसंघ जिथून  मणिपूरची एक ‘लेडी सिंघम’ उमेदवार म्हणून उभीये. या लेडी सिंघम म्हणजे ब्रिन्दा थौनाओजम. वृंदा जेडीयूच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढतायेत.

वृंदा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ४३ वर्षाच्या ब्रिन्दा आयपीएस ऑफिसर आहेत. ज्या आपल्या शार्प इमेजसाठी ओळखल्या जातात. ब्रिन्दा या चर्चेत आल्या जेव्हा चंदेल जिल्ह्याच्या स्वायत्त जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लौखोशी जू यांना त्यांच्या इंफाळ मधल्या घरातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांसह अटक करण्यात आली. यामध्ये अनेक बडे अधिकारी आणि बड्या नेत्यांची सुद्धा नाव होती.

ब्रिन्दा यांना त्या आरोपींना सोडण्यासाठी राज्यातल्या सर्वोच्च स्तरावरून कॉल आले होते, परंतु त्यांनी सोडण्यास नकार दिला.  त्यांच्यावर राजकीय दबाव सुद्धा आला. पण ब्रिन्दा घाबरणाऱ्यातल्या नव्हत्या. 

या ड्रग प्रकरणाचा छटा लावल्यामुळं त्यांचा गौरव सुद्धा झालाय. पण न्यायालयानं पुढे या प्रकरणातल्या आरोपींची न्यायालयातून सुटका केली, ज्यांनंतर ब्रिन्दा यांनीसुद्धा आपल्याला मिळालेला शौर्य पुरस्कार परत केला. ब्रिन्दा यांनी आरोप केला होता कि, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी आरोपींच्या बाजूने हस्तक्षेप  केला होता. 

दरम्यान काही काळानंतर ब्रिन्दा यांचा कल राजकारणाकडे वळाला, ज्यामुळे त्यांनी सरकारी नोकरी सोडली आणि राजकारणात एन्ट्री केली. ब्रिन्दा भाजपचे विद्यमान आमदार आणि मणिपूरचे विद्यमान कायदा मंत्री थोकचोम सत्यब्रत सिंह यांच्या विरोधात  निवडणूक लढवत आहेत. मणिपूरमध्ये जेडीयू स्वबळावर निवडणूक लढवतेय.

ब्रिन्दा यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, मणिपूरला अंमली पदार्थांपासून मुक्त करणे हा तिचा राजकारणात येण्याचा उद्देश आहे. तसेच पुरुषांचं वर्चस्व असलेल्या मणिपूरच्या  राजकारणाचा कल बदलणार असल्याचा दावा त्या करतायेत. ब्रिन्दा बऱ्याचदा सरकार विरोधी चळवळींमध्ये पाहायला मिळतात. ब्रिन्दा यांची सोशल मीडियावर सुद्धा  प्रचंड ‘फॅन फॉलोइंग’ आहे. त्या अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

आता शेवटी निकाल मणिपूर वासियांच्या हातात आहे, पण ब्रिन्दा यांच्या विजयामुळे मणिपूरच्या जनतेला एक धाकड महिला आमदार मिळणार अश्या चर्चा रंगायला लागल्यात.

 हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.