त्यांनी ४३ गावांतील आदिवासींना स्वतःच्या पायावर उभं केलं आहे

सर्वसामान्यपणे आपल्याकडे भागानुसार बघायचं म्हंटले तर कोकणात मासेमारी आणि भात शेती, पश्चिम महाराष्ट्रात ऊस शेती आणि त्यावर आधारित साखर उत्पादन, तिथून सोलापूर आणि मराठवाडा या भागात गेलो तर ज्वारी, बाजरी, तूर अशा गोष्टी आणि पुढे विदर्भांत कापूस, संत्रा या पिकांचं उत्पादन जास्त बघायला मिळतं. हे मागच्या अनेक वर्षांपासून चालतं आलेलं आहे.

पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की मासेमारी हि फक्त कोकणातच नाही तर तिकडे विदर्भात पण होत आहे तर?

होय हे खरयं. विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या भागातील आदिवासी गावांमध्ये मासेमारी हा व्यवसाय आहे, आणि यातून हा समाज आता स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. याला कारण ठरलं आहे ते म्हणजे अलीकडच्या काही वर्षात इथं शेकडो तलावांचं झालेलं पुनरुज्जीवन, आणि हे काम शक्य करणारं एक मुख्य नाव म्हणजे,

तलाव संवर्धक मनीष राजनकर.  

विदर्भात आणि त्यातही विशेषतः भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ‘मालगुजारी तलाव’ या नावानं ओळखले जाणारे अनेक छोटे-मोठे तलाव अस्तित्वात आहेत. साधारण तीनशे पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असलेले हे तलाव गोंड राजांच्या कालखंडात बांधण्यात आल्याचं सांगण्यात येत.

त्या काळी गोंड राजे जंगल कापून गाव वसवणार्‍या आणि तलाव बांधणार्‍या समाजाला, लोकांना वेगवेगळ्या पदव्या आणि जमिनी बक्षीस म्हणून द्यायचे. यात कोहळी, पोवार, गोंड अशा बऱ्याच समाजांनी या तलावांसाठी काम केलं. हे एक प्रकारचं इंजिनिअरिंगचं होतं.

पुढे या तलावांची देखरेख करणं, तलावांमध्ये पाणी वाहून येतं त्या पाटांची देखरेख, तलावात साचलेला गाळ उपसणं अशी सगळी कामं तलाव बांधणार्‍या या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी करत असत.

त्यामुळे हळूहळू या तलावांच्या आजूबाजूनं आणि तलावांमध्ये जैवविविधता वाढू लागली. यात वेगवेगळ्या प्रकारच्या पाणवनस्पती, वेगवेगळ्या प्रकारचे मासे, जलचर असं सगळं एक विश्वास देणार चित्र दिसायला लागलं. त्यातून एक निसर्गचक्र आकारास आलं. त्यासोबतच तलाव बांधणीच ज्ञान देखील तिथंल्या स्थानिक लोकांना मिळतं गेलं.

मनीष ‘बोल-भिडू’शी बोलताना सांगतात, 

भंडारा जिल्ह्याच्या १९०१ च्या गॅझेटनुसार या भागात असे तब्बल १२ हजार तलाव अस्तित्वात होते.

मात्र स्वातंत्र्यानंतर परिस्थिती बदलत गेली… 

हे सगळं दिसणार चित्र स्वातंत्र्यानंतरच्या काळात बदलल्याचं बघायला मिळतं. ब्रिटिश भारतातून गेल्यावर हे सगळे मालगुजारी तलाव सरकार दरबारी जमा झाले. मालगुजारी नाव जावून माजी मालगुजारी तलाव म्हणून ओळख मिळाली.

तलावांमधून पाण्याचा उपसा सातत्यानं वेगवेगळ्या कारणांसाठी होऊ लागला, जे पाणी जगण्यासाठी वापरलं जात होतं त्या पाण्याला आता व्यावसायिकरण प्राप्त झालं होतं.

मासेमारी व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी या तलावांमध्ये अनेक प्रकारचे विदेशी मासे सोडण्यात आले. सुरुवातीला या नव्यानं टाकलेल्या माशांनी भरपूर फायदा करून दिला. लोकांच्या हातात पैसा आला. पण या विदेशी माशांनी तिथल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या देशी माशांना अक्षरशः संपवून टाकलं.

पुढे औद्योगिक क्रांतीनंतर गाळ उपसायच्या नावाखाली मोठ-मोठे मशीन तलावांमध्ये येऊ लागले, त्यातून अगदी मुरमाचा भाग पण खरवडला सुरुवात झाली. आधी तलावांमध्ये टिकून राहणारं पाणी या मशीनींच्या खोदकामामुळे जिरायला लागलं किंवा वाहून जायला लागलं. पाणी देखील प्रदूषित झालं आणि सगळं तंत्रच बिघडलं. यातून एकेक करत भंडारा आणि गोंदियातले बहुतांश तलाव नष्ट होत होते.

मनीष सांगतात एकेकाळी जिथं १२ हजार तलाव अस्तित्वात होते ती संख्या आता अवघी २ हजार ७०० वर आली.

यातूनच आधी पक्षी प्रेमी असलेल्या आणि नंतर तलाव प्रेमी बनलेल्या मनीष यांनी स्थानिक लोकांच्या आणि विशेषतः तरुणांच्या मदतीनं तलाव संवर्धनाचं काम हाती घेण्याचं ठरवलं. पण त्यासाठी आधी त्यांनी एकेका तलावाचा जाणीवपूर्वक अभ्यास केला, माशांचा अभ्यास केला. तिथल्या पर्यावरणाला ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक अंगानं समजून घेतलं.

त्यातूनच त्यांची पारंपरिक ज्ञानावर उत्तम पकड असलेल्या पतिराम तुमसरे यांच्याशी ओळख झाली. ‘ढिवर’ या परंपरागत मासेमारी करणार्‍या समाजाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले. मनीष वेगवेगळ्या तलावांच्या अभ्यासासाठी, निरीक्षण-नोंदींसाठी पतिरामांसोबत जाऊ लागले. त्यांच्यामते पतिराम भाऊंचं पारंपरिक ज्ञान अफाट होतं.

पुढे २००८ साली मनीष आणि पतिराम यांनी ‘भंडारा निसर्ग आणि संस्कृती अभ्यास मंडळ’ या संस्थेमार्फत गोंदियामधील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जांभळी गावातल्या ‘नव तलाव’ या ठिकाणी प्रत्यक्षात काम सुरू केलं. मनीष सांगतात, या तालुक्याची निवड करण्याचं कारण म्हणजे इथं सर्वाधिक मालगुजारी तलाव होते आणि आहेत.

सुरुवातीला त्यांनी तलावाच्या आजूबाजूला असलेलं गवत आणि इतर पाणवनस्पती काढून टाकल्या, सोबतच शिल्लक असलेल्या देशी माशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली. माशांना वाढीसाठी लागणाऱ्या हायड्रिला वर्टिसिल्टा, सेराटोफिलम डिमर्सम, वेलीसनेरिया स्पायरलिस आणि फ्लोटिंग प्लांट यांची पुनर्लागवड केली. अशा प्रकारे एक झाल्यानंतर दुसरा तलाव हातात घेतला जाऊ लागला.

या दरम्यान मनीष यांनी भंडारा आणि गोंदियामधील १२ सहकारी मत्स्य संस्थासोबत संपर्क करून त्यांच्यासोबत काम सुरु केलं. देशी माशांच्या प्रजनन वाढवण्यासाठी या संस्थांचं मार्गदर्शन घेण्यात येऊ लागलं. २ वर्षातच याचे परिमाण लोकांना स्वतःच्या डोळ्यांनी दिसून यायला लागले.

पतिराम तुमसरे सांगतात,

या सगळ्या प्रयत्ननामुळे देशी झाडांच्या संख्येत बऱ्यापैकी वाढ झाली होती. पुरेसं आणि पोषक अन्न, सोबतच सुरक्षा यामुळे माशांचं उत्पादन चांगलचं वाढलं. आधी घनोद गावच्या तलावात जवळपास ९८ किलो मासे पकडले जात होते, आज हाच आकडा ६३० किलोंच्या घरात आहे. अर्जुनी मधल्या तलावातुन देखील १२० किलोपासून उत्पादन वाढून २४९ किलो झालं.

या सगळ्या कामात शालू कोल्हे यांच्या माध्यमातून ढिवर समाजातील महिलांचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग होता, इतकचं नव्हे तर माशांचं उत्पादन वाढल्यानंतर बचत गट सुरु करून त्यातून ठोस उत्पन्नाचं साधन देखील महिलांना मिळालं.

यातून इथली लोक स्वतःच्या पायावर पुन्हा उभी राहिली.

२०१६ मध्ये इतर ५ तलावांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात देखील काहीसे असेच परिणाम दिसून आले होते. आज पर्यंत ४३ गावांमधील अश्या ६३ तलावांच्या परिस्थितीमध्ये मनीष आणि पतिराम तुमसरे, शालू कोल्हे अशा सहकाऱ्यांनी मिळून बदल केला आहे. जे कि पुढच्या कमीत कमी ३०० वर्षांसाठी कायम राहील हे नियोजन डोक्यात ठेवून…

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.