मनमोहन सिंग यांचे एकेकाळचे लाडके मंत्री आता त्यांना घरचा आहेर देतायत

काँग्रेसचं टेन्शन संपत संपेना झालंय. म्हणजे ऐन निवडणुकीच्या टायमाला प्रचाराची धावपळ, त्यात पक्षांतर्गत भांडणं, नेतेमंडळींचे रुसवे फुगवे हे तर आहेच, आणि ते सुटत नाहीत तर भलताचं वाद त्यांच्या पुढ्यात येऊन थांबतोय.

आता याच उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकावरून वाद सुरु झाला होता. त्यांनी हिंदूंची तुलना दहशतवादी संघटनांसोबत केली असल्याचं म्हंटल होत. यातून पेटलेला वाद पार काँग्रेस हायकमांडच्या गळ्याशी आला होता.

आता खुर्शीदांच्या या पुस्तकावरून सुरु झालेला वाद थंड होत नाही तर आता मनीष तिवारी यांच्या पुस्तकाने काँग्रेसच्या अडचणीत वाढ केलीये. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तकात कोणा दुसऱ्या पक्षावर किंवा व्यक्तीवर हल्ला नाही तर थेट स्वतःच्या काँग्रेस पक्षावरचं हल्ला केलाय. त्यातल्यात्यात हाईट म्हणजे ज्या मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते त्याच मंत्रिमंडळाच्या लक्तरे त्यांनी चव्हाट्यावर मांडलीत.

तर झालं असं कि, मनीष तिवारी यांनी ’10 Flash Points; 20 Years – National Security Situations that Impacted India’ हे पुस्तक लिहिलं. जे अजून बाजारात आलं नाही, पण लवकरच ते लॉन्च केलं जाणारं आहे. पण तिवारी यांनी हे पुस्तक मार्केटमध्ये येण्याआधी एक ट्विट केलं. ज्यात त्यांनी म्हंटल कि, हे पुस्तक यूपीए सरकारने दोन दशकांत बाळगलेल्या मौनावर आहे.

मग काय होणार होत वाद पेटला. असं म्हंटल जात कि, या पुस्तकात त्यांनी काँग्रेसच्या मनमोहन सिंग सरकारवर जोरदार टीका केलीये. पाकिस्तानने मुंबईवर केलेला हल्ला आणि काँग्रेस सरकार त्यावर उत्तर देत नसल्याच्या मुद्द्यावरून ही टीका करण्यात आली आहे.

मनीष तिवारी यांनी आपल्या पुस्तकात तत्कालीन काँग्रेस सरकारच्या म्हणजेच मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या अपयशाचा उल्लेख केलाय. ज्यात त्यांनी म्हटलं कि,

२६/११ च्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कारवाई करायला हवा होता. भारत सरकारने कारवाई न करणे हे त्याच्या कमकुवतपणाचे लक्षण होते. जेव्हा पाकिस्तानला निरपराधांचे रक्त सांडल्याचे दु:ख वाटत नव्हते, तेव्हा गप्प बसून संयम दाखवणं कोणती ताकद नव्हती, तर ते दुर्बलतेचे लक्षण होते. २६/११ नंतर भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करायला हवी होती.

मनीष तिवारी यांनी आपल्या या पुस्तकात मुंबईतील २६/११ हल्ल्याची तुलना अमेरिकेतील ९/११ हल्ल्याशी केली. ९/११ च्या हल्ल्यानंतरच अमेरिकेने अफगाणिस्तानात पाऊल ठेवून तिथली जमीन बॉम्बच्या हल्ल्याने हदरवुन टाकली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार २६/११ हा असा काळ होता जेव्हा प्रतिउत्तराची कारवाई दाखवायला हवी होती.

तिवारी यांनी असही म्हंटलं कि, मुंबई हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाला पाकिस्तानात कारवाई करायची होती, पण तत्कालीन यूपीए सरकारने तशी परवानगी दिली नाही.

आता एखादा काँग्रेसचा मंत्रीच काँग्रेसला घरचा आहेर देतोय म्हंटल्यावर भाजप थोडीना गप्प बसणार आहे. मनीष तिवारीच्या या पुस्तकानंतर भाजपनेही काँग्रेस मनीष तिवारींना घेरायला सुरुवात केली आहे.  केंद्रीय कृषिमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले कि, हे सगळ्या जगाला माहितेय कि,  तत्कालीन सरकारने ही संपूर्ण घटना कश्या प्रकारे हाताळली होती. आणि पंतप्रधान मोदींनी दहशतवादा विरोधात झिरो टॉलरन्सची भूमिका स्वीकारली आहे,  त्यामुळे यावर राजकारण व्हायला नको.

सोबतचं भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ट्विट केले की, मनीष तिवारी यांनी २६/११ नंतर यूपीए सरकारच्या कमकुवतपणावर टीका केली ती बरोबरच आहे. काँग्रेस त्यावेळी २६/११ साठी हिंदूंना दोषी ठरवण्यात आणि पाकिस्तानला वाचवण्यात व्यस्त होती.

आता तसं पाहायचं झालं तर, मुंबई हल्ल्या दरम्यान काँग्रेस कचाट्यात सापडलं होत. यावेळी आरोप करण्यात आला होता कि, मुंबई दहशतवादी हल्ल्याने घाबरलेय, आणि तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील फक्त कपडे बदलून विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. 

आणि मनीष तिवारी यांनी आपल्याच पक्षाला घेरण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पंजाबमधील राजकीय अस्थिरतेबाबत ते म्हणाले होते की, ज्यांच्याकडे पंजाबची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांना ते समजत नाही. याशिवाय कन्हैया कुमारच्या काँग्रेस प्रवेशावरही तिवारी यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

आता तिवारी यांच्या पुस्तकाचा वाद कुठपर्यंत पेट घेतोय, हे तर पाहणं महत्त्वाचं ठरणारचं आहे. पण यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढणार याची फूल गॅरंटी.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.