हा सिनेमा मनीषा कोईरालाच नाही तर तिच्या ड्युप्लिकेटला देखील फसवून बनवलेला..

ते वर्ष होत २००२. जागतिकीकरण येऊन दहा वर्षे उलटली होती. भारतात केबल वगैरेंनी जोर धरला होता. दूरदर्शनचे रामायण महाभारत हम लोग बुनियाद वगैरे इतिहासजमा होऊन सास बहू रियालिटी शोचा जमाना आला होता.  म्युजिक चॅनल वर कांटा लगा सारखी गाणी वाजत होती. रात्री फॅशन टीव्ही चोरून पाहिला जात होता.

एकूणच काय तर आपण वयात येऊ लागलो होतो. याच आपल्या वयाला आणि आपल्या भावनांना हात घालणारा एक सिनेमा आला,

एक छोटीसी लव्ह स्टोरी 

थोडीशी आऊटडेटेड होत चाललेली मनीषा कोईराला या सिनेमाची हिरोईन होती. रणवीर शौरी तिच्या बॉयफ्रेंडचा रोल करत होता. पण मेन हिरो होता एक पंधरा वर्षांचा मुलगा. नाव होतं आदित्य सील. 

एक मिसरूड फुटलेला मुलगा आपल्या आज्जी सोबत राहत असतो. त्याच्या समोरच्या फ्लॅटमध्ये मनीषा कोईराला राहत असते. तिच्यावर हा गडी दुर्बीण लावून बसलेला असतो. अगदी कपडे बदलण्यापासून बॉयफ्रेंड बरोबरचे उद्योग यावर या पोराची नजर असणे, तिच्या प्रेमात पडणे, वगैरे वगैरे स्टोरी. तिला पाहण्यासाठी सकाळी दूध घालायला जाणे असे स्टोकिंगशी रिलेटेड सगळे उद्योग त्याचे करून झालेले असतात.   

रणवीर शौरी आणि मनीषा कोईराला यांच्यात सिन सुरु झाला कि हा फोन करून त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम देखील करत असतो. मनीषाला कळल्यावर त्याला मुद्दाम जळवण्याचे प्रकार करते, पुढे ते दोघे डेटवर हि जातात. असं बरच काय काय या सिनेमात दाखवलं होतं.

त्याकाळच्या मानाने हा बराच बोल्ड सिनेमा होता. स्टोकिंग, मास्टर्बेशन सारखे विषय हाताळले होते, वयात येणाऱ्या मुलांचे संवेदनशील विश्व दाखवण्याचा हा प्रयत्न होता. एका रशियन सिनेमावर आधारित हा सिनेमा बनला होता. पण याची मांडणी उथळ होती. अनेक सीन्स भडकाऊ होते.

अगदी सेन्सॉर बोर्ड पासून सामाजिक संघटनांच्या भावना दुखावल्या. विरोध सुरु झाला, मनीषा कोईरालाचे पोस्टर जाळण्यात आले.

हा सिनेमा म्हणजे आर्टच्या नावावर खपवलेली बीपी आहे असं बोललं गेलं.

पण या पुढे जाऊन एक वेगळीच कॉंट्रोव्हर्सी समोर आली. ज्या मनीषा कोईरालामुळे हे वाद सुरु झाले होते तिला फसवून हे सिन शूट केले आहेत असा दावा केला. लोकांना प्रश्न पडला कि मनीषा कोईरालाला फसवून कस काय तिचे सिन शूट केले असतील?

या सगळ्या मागे होता एक छोटीसी लव्ह स्टोरीचा दिग्दर्शक के.शशिलाल नायर.

खरं तर हा एकेकाळी नॅशनल अवॉर्ड जिंकलेला चांगला दिग्दर्शक. मिथुनचा परिवार, जॅकी श्रॉफचा क्रोध, अंगार,ग्रहण, शाहरुख खानच्या होम प्रोडक्शन वाला वन टू का फोर असे अनेक सिनेमे त्याने बनवलेले. अंगार साठी तर नाना पाटेकरला बेस्ट व्हिलनचा फिल्मफेअर, कादर खानला बेस्ट डायलॉग असे दोन चार फिल्मफेअर मिळाले याच सिनेमाच्या स्पेशल इफेक्ट साठी नायरने नॅशनल अवॉर्ड जिंकला होता.

असले भारी सिनेमे बनवणारं हे बेणं जरा जास्तच आगाऊ होतं. त्याने जेव्हा मनीषा कोईरालाला भडकाऊ सीन्स करायला सांगितले तेव्हा तिने त्याला नकार दिला होता. पण याने मनीषाची एक ड्युप्लिकेट आणली आणि तिच्या कडून काही सीन्स शूट केले. यात बरंच एक्स्पोज करण्यात आलं होतं. न्यूड सिन देखील होते. 

मनीषाला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा तिचा रागाचा पारा चढला. तिने शशीलाल नायरला कोर्टात खेचलं. नायर महाचाप्टर होता. तो म्हणाला,

“मनीषाच्या संमतीनेच तिच्या बॉडी डबलला वापरलं होतं. गेल्या काही दिवसात तीच वजन वाढलं असल्यामुळे आम्हाला तिच्या ऐवजी ड्युप्लिकेटचा सहारा घ्यावा लागला होता.”

या ड्यप्लिकेटची वेगळीच कथा होती.

तीच नाव जेसिका चोक्सी. या चोक्सी बाई होत्या १९ वर्षांच्या. अकरावीत शाळा सोडलेल्या जेसिकाला शशीलाल नायरने दहा हजार रुपये देऊन या सिन साठी तयार केलेलं. तीच म्हणणं होत की मला देखील या सीन्सची कल्पना नव्हती. शूटिंग सुरु झाल्यावर त्यांनी आणखी दोन हजार रुपये वाढवून दिले व ते प्रसंग चित्रित केले. मला वडील नाहीत, आईला कॅन्सरच्या उपचारासाठी पैसे हवेत, भाऊ काही काम करत नाही म्हणून मी शूटिंग तयार साठी तयार झाले.

अनेक गोंधळ झाले. कसाबसा हा सिनेमा रिलीज झाला. सीडी डीव्हीडी मधून सगळ्या देशाने तो बघून काढला. 

मनीषा कोईराला म्हणते या सिनेमातून मला माझे अभिनय कौशल्य दाखवायला मिळेल, पुरस्कार जिंकता येतील या अपेक्षेने मी सिनेमा साइन केला होता. पण दिग्दर्शकाने मला फसवलं. या सिनेमामुळे माझ्या करियरला कधीही न भरून येणार सेटबॅक बसला.

जेसिका चोक्सीने काही बी ग्रेड टाईपच्या सिनेमात काम केलं. एका गुजराती नाटकात देखील काम केलं. ती आजही सांगते की तेव्हा जे मी केलं ते फक्त पैशांसाठी केलं आणि मला त्याची लाज वाटत नाही. 

जेसिका काहीही म्हणो, तिला आजही छोटीसी लव्ह स्टोरीमधली मनीषाची ड्युप्लिकेट म्हणूनच ओळखलं जातं. 

हे सगळं झालं पण तो पिक्चरचा मेन हिरो आदित्य त्याच काय झालं? 

आदित्य सील हा वर्ल्ड तायक्वांदो चॅम्पियन होता. जाहिरातींसाठी मॉडेलिंग वगैरे तो करत होता. पुढे सिनेमातच करियर करायचं त्यानं ठरवलं. गेल्या काही वर्षांपासून त्याने सिनेमा आणि वेब सिरीज मध्ये जम बसवलाय. स्टुडन्ट ऑफ द इयर २, तुम बिन २ सारखे मोठे सिनेमे त्याने केलेत. इंदू कि जवानीमध्ये तर तो कियारा अडवाणीचा हिरो झालाय. 

एकूण काय तर शशीलाल नायर, मनीषा कोईराला, जेसिका चोक्सी या सगळ्यांना छोटीसी लव्ह स्टोरीचा फटका बसला पण छोट्या आदित्यलाच या सिनेमाचा सगळ्या अर्थाने फायदा झाला हे  नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.