म्हणुन मनीषा कोइरालाने संजय दत्तचे फोटो तिच्या कपाटात लपवले होते

अनिल कपुर बेडवर आनंदाने उड्या मारत असतो. सायकल घेऊन तो फेरफटका मारायला निघालेला. आणि मध्येमध्ये एक सुंदर चेहरा आपल्या हृदयाची धडधड वाढवत असतो. तिला या गाण्यात सारखं सारखं बघावंसं वाटत असतं. केस मोकळे सोडलेले, फक्त डोळ्यांनी बोलणारी, चेह-यावर निखळ हास्य असणारी ती मुलगी मनात घर करुन राहते.

अनिल कपुर गुणगणुत असलेलं गाणं नकळत आपल्याही ओठांवर येऊ लागतं. ते गाणं म्हणजे,

‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा…’

एव्हाना लक्षात आलं असेल हि मुलगी कोण आहे ते. हि आहे अभिनेत्री मनीषा कोइराला.

१६ ऑगस्ट १९७० रोजी मनीषाचा नेपाळमधील काथमांडू येथे जन्म झाला. मनीषाचे आजोबा विशेश्वर प्रसाद हे नेपाळचे पंतप्रधान तर मनीषाचे बाबा प्रकाश हे राजकारणात कॅबिनेट मंत्री म्हणुन सक्रीय होते. कुटूंबाची राजकीय पार्श्वभुमी असली तरीही मनीषाला डाॅक्टर व्हायचं होतं. परंतु मनीषाला माॅडेलिंगच्या अनेक ऑफर आल्या.

माॅडेलिंग करता करता डाॅक्टर होण्याचं स्वप्न बाळगलेल्या मनीषाला मनोरंजन क्षेत्राविषयी आकर्षण वाटु लागले आणि तिने अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला

१९८९ साली ‘फेरी भेटुलासे’ या नेपाळी सिनेमात छोटीशी भुमिका करुन मनीषाने अभिनेत्री म्हणुन पदार्पण केले. बाॅलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणुन सिनेमा मिळवण्यासाठी मनीषाला २ वर्ष वाट पाहावी लागली. १९९१ साली ‘सौदागर’ सिनेमातुन तिने हिंदी सिनेसृष्टीत दमदार पदार्पण केले. ‘सौदागर’ मध्ये एकीकडे दिलीप कुमार तर दुसरीकडे राजकुमार सारखे दोन दिग्गज नट होते.

परंतु या दोन प्रतिभावंत नटांसमोर मनीषाने प्रभावी अभिनय करुन स्वतःची दखल घ्यायला सर्वांना भाग पाडलं. इथुन पुढे मनीषाचा एक यशस्वी अभिनेत्री म्हणुन प्रवास सुरु झाला. 

१९९० च्या दशकात मनीषाची क्रेझ एवढी प्रचंड होती की, मनीषाने एका मुलाखतीत सांगीतलं होतं, ‘माझे फॅन्स मला रक्ताने पत्र लिहून पाठवायचे.’ फॅन्सना घायाळ करणारी अदाकारी करणा-या मनीषाचा स्वप्नातला राजकुमार कोण होता माहितीय ? त्याचं नाव संजय दत्त.

गेल्या वर्षी मनीषा आणि संजय दत्त जोडीचा ‘प्रस्थानम’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाच्या वेळेस एका मुलखतीत मनीषाने हा खुलास केला. 

मनीषा म्हणते,

“संजय दत्तवर माझं एकतर्फी प्रेम होतं. शाळेमध्ये असल्यापासुनच मी संजय दत्तची मोठी फॅन होती. १९८१ साली संजुचा राॅकी रिलीज झालेला तेव्हा मी ११ वर्षांची होते. संजय दत्त हा एकमेव कलाकार ज्यासाठी मी अक्षरशः वेडी होते. माझ्या घरातील एका कपाटात संजूचं पोस्टर मी लावलं होतं. तसंच आईने बघु नये म्हणुन कपाटातच संजूचे अनेक फोटोग्राफ्स लपवुन ठेवले होते.”

एका शुटींगदरम्यान मनीषाने संजूला हा किस्सा सांगीतला. तेव्हा संजूने गंमतीत मनीषाला विचारलं,”मग आता तुझं आधीसारखं माझ्यावर प्रेम नाही?” तेव्हा मनीषाने उत्तर दिलं,”नाही, आता तु माझा चांगला मित्र आहेस. आणि मला अशी कोणतीही गोष्ट करायची नाहीय ज्यामुळे तु अडचणीत येशील.”

मनीषा कोइराला आणि संजय दत्त यांनी ‘कारतुस’, बागी, ‘यल्गार’, ‘खौफ’ आणि गेल्या वर्षी ‘प्रस्थानम’ यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केले. योगायोग म्हणा किंवा विरोधाभास, संजय दत्तच्या आयुष्यावर आधारीत ‘संजू’ या बायोपीकमध्ये मनीषाने संजय दत्तची आई नर्गिसची भुमिका साकारली. 

मनीषाने अभिनय क्षेत्रातील करियरमध्ये ब्रेक घेऊन २०१० साली सम्राट दहाल या व्यावसायिकाशी लग्न केलं. परंतु दोनच वर्षात दोघं एकमेकांपासुन वेगळे झाले. याच वर्षी २०१२ साली मनीषाला कॅन्सरचं निदान झालं.

यानंतर भारतात आणि परदेशात तिने कॅन्सरवर उपचार केले. कॅन्सरमधुन ठणठणीत झाल्यावर तिने अनेक शाळा, काॅलेज, हाॅस्पीटलमध्ये प्रेरणादायी व्याख्यानं दिली. २०१७ साली ‘डियर माया’ या सिनेमातुन मनीषाने बाॅलिवूडमध्ये कमबॅक केलं. यानंतर ‘संजू’, ‘प्रस्थानम’, ‘लस्ट स्टोरीज’ अशा सिनेमांमधून तसेच वेबसिरीजमध्ये मनीषाने रंगवलेल्या भुमिका नावाजल्या गेल्या. 

व्ययक्तिक आयुष्यात कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाशी सामना करणारी मनीषा भारतीय सिनेमांमध्ये स्वतःचं वेगळं स्थान आजही टिकवुन आहे. तिच्याकडे पाहुन ओठांवर एकच गाणं गुणगुणावंसं वाटतं ते म्हणजे,

एक लडकी को देखा तो ऐसा लगा

जैसे खिलता गुलाब

जैसे शायर का ख्वाब

जैसे उजली किरन

जैसे वन मै हिरन

जैसे मंदिर मै हो इक जलता दिया

 

1 Comment
  1. संजोग+पिसे says

    काय पण नशीब आहे संजय दत्तचं…

Leave A Reply

Your email address will not be published.