मांजरेकर विरुद्ध नागराज ! 

उन्हाळा कडक होत चाललाय. गर्मी वाढत चाललीय. चटके बसताहेत. निवडणुकीची उत्सुकता वरचेवर ताणली जातेय. आयपीएल मध्ये थरार चालू आहे. त्यातच टीव्हीवर आणखी एक चुरशीचा सामना सुरु होतोय. कोण होणार करोडपती  आणि बिग बॉस २ सुरु होताहेत.

त्याचे सूत्रधार असणार आहेत महेश मांजरेकर आणि नागराज मंजुळे. 

बिग बॉस मराठीत होऊ शकतो या गोष्टीवरच मुळात फार लोकांचा विश्वास नव्हता. मराठीत हा शो करायला कुणीच तयार होणार नाही. कलावंत नकार देतील. प्रेक्षक पाहणार नाहीत अशा अनेक शंका होत्या. त्यामुळे बिग बॉस मराठीत खूप उशिरा आलं. पण बिग बॉस पाहिलं गेलं. कलाकार आपणही काही कमी नाही या आवेशात आपलं खाजगी जीवन चव्हाट्यावर आणत होते. लोकही त्या खाजगी गोष्टीवर तेवढ्याच शिवराळ भाषेत चर्चा करत होते. एकूण बिग बॉसचा पहिला हंगाम सोशल मिडीयावर जोरात गाजला. अर्थात त्यात सूत्रधार महेश मांजरेकर यांना पण अधून मधून सोशल मिडियाच्या टिकेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर धनी व्हावं लागलं. पण सूत्रधार म्हणन मांजरेकर एकदम परफेक्ट वाटले. बिग बोस सारख्या शो ला मराठीत दुसरा सूत्रधार डोळ्यासमोर येत नाही. जो दरारा, रुबाब पाहिजे तो इतर कुठल्या नटात दिसत नाही. त्यामुळे मांजरेकर बिग बॉसचे सूत्रधार म्हणून एकदम सूट आहेत. 

आता परीक्षा आहे नागराज मंजुळेची.

कोण होणार करोडपतीच्या नव्या हंगामाचा सूत्रधार म्हणून नागराज मंजुळे पहिल्यांदा एका टीव्ही शो मध्ये येतोय. चित्रपट माध्यमातला आजचा सर्वात यशस्वी दिग्दर्शक. अभिनेता म्हणूनही तो नाळ मध्ये दिसला. पण सूत्रधार म्हणून पहिली वेळ. त्यात सगळ्यात जास्त चर्चा सुरु आहे ती भाषेची. नागराज शुद्ध मराठी बोलणार का? तो न म्हणणार का ण म्हणार अशी चर्चा काही नतद्रष्ट लोकानी सुरु केलीय. अर्थात हे होणारच होतं. पण नागराजची खरी परीक्षा आहे ती अमिताभ बच्चन यांच्या पेक्षा तो या शो मध्ये काय वेगळं करणार आहे? केबीसी म्हणजे अमिताभ हे समीकरण भारतात घट्ट आहे. अगदी शाहरुख खानलाही हा शो जमला नाही. माघार घ्यावी लागली. पुन्हा अमिताभ सूत्रधार झाले.  

कोण होणार मराठी करोडपतीच्या निमित्ताने सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे सूत्रधार, निवेदक यांच्या दिसण्या बाबत, भाषे बाबत असलेला न्युनगंड दूर झाला. नाहीतर गोरा गोमटा कुणीतरी निवेदक असला पाहिजे हे ठरलेलं होतं. त्यात भाषा एकदम पुणेरी वळणाची पाहिजे असा उगीच आग्रह. नागराजच्या निमित्ताने सर्व सामान्य लोकांची भाषा या शो मध्ये ऐकायला मिळेल का याची सगळ्यांना उत्सुकता असेल.

याआधी मराठी करोडपतीचे सूत्रधार होते सचिन खेडेकर आणी स्वप्नील जोशी. पैकी स्वप्नील जोशी करोडपतीचा सूत्रधार म्हणून लोकांना मुळीच आवडला नाही. अशा शो मध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याचं उत्तर सूत्रधाराला माहित असेल असं प्रेक्षकांना वाटलं पाहिजे. निदान तसा अभिनय सूत्रधाराला करता यायला पाहिजे. सचिन खेडेकर यांची मराठी भाषेवरची हुकुमत, त्यांचं अभ्यासू व्यक्तीमत्व लोकांना आवडलं होतं. पण टीआरपीच्या गणितात ते बसलं नव्हतं.     

आता नागराज आणि मांजरेकर हे दोन महत्वाचे मराठी दिग्दर्शक एकमेकांसमोर येताहेत. टीव्ही मालिकेचे सूत्रधार म्हणून.

त्यात शोकांतिका ही आहे की दोन क्रिएटीव्ह मराठी दिग्दर्शक दोन परदेशी कल्पनेवरच्या खेळाचे सूत्रधार. खरतर या दोघांनाही अस्सल मराठमोळी संस्कृती असणारा शो सहज डिझाईन करता आला असता. असो. जगात काय चाललंय ते आपण सांगू शकत नाही. मराठीत तर काहीतरी भलतच चालू असतं. प्रसाद ओक, सुबोध भावे दिग्दर्शन करतात, रवी जाधव, संजय जाधव अभिनय करतात. आपलं काम सोडून भलत्या कामात इंटरेस्ट ही मराठी कलावंतांची खासियत आहे. त्यात ते यशस्वी होताहेत ही चांगली गोष्ट आहे.

पण मांजरेकर आणी नागराजच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शकाचं glamour कोणत्या पातळीवर पोचलंय याचा अंदाज येतो. दिग्दर्शक सेलिब्रिटी झालेत ही आनंदाची गोष्ट आहे. आता त्याचं सेलिब्रिटी असणं टीव्हीला किती फायदा करून देनार आहे ते मी मध्ये कळेलच.

तुम्हाला काय वाटत लोक कुणाचा शो जास्त बघतील?

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. ROHIT BORLIKAR says

    मध्यंतरी ‘झुंज’ नावाचा एक खूप चांगला गेम शो मराठीत आला होता – श्रेयस तळपदे ने त्याचे सूत्रसंचालन केले होते आणि बहुधा तोच त्या कार्यक्रमाचा सह-निर्माता सुद्धा होता !

Leave A Reply

Your email address will not be published.