JNU मध्ये मनमोहनसिंगांच्या विरुद्ध काळे झेंडे फडकवणाऱ्याच पुढ काय झालं??
१४ नोव्हेंबर २००५. स्थळ जेएनयु दिल्ली.
देशाचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग विद्यापीठात आले होते. निमित्त होतं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पुतळ्याच्या उद्घाटनाचं. त्यांचं भाषण होणार होतं. विद्यार्थी जमले होते. कार्यक्रमस्थळी पंतप्रधानांच आगमन झालं, इतक्यात एका कोपऱ्यातून जोरदार गोंधळ सुरु झाला. सगळ्यांच लक्ष तिकडे गेल.
ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेचे सदस्य निदर्शने करत होते.
मनमोहन सिंग हाय हाय, मनमोहन सिंग गो बॅक
नारे लावले जात होते. इतकच काय त्यांना काळे झेंडे दाखवले गेले. काही मुलांनी तर आपले अंगात घातलेले काळे शर्ट काढून ते मनमोहन सिंगाच्या दिशेने फडकवले.
अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामूळे वातावरण तंग झाले. थेट पंतप्रधानाना काळे झेंडे दाखवणे ही मोठी गोष्ट होती. घटनास्थळी हजर असलेल्या पोलिसांनी विद्यार्थ्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला मात्र विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. त्यांनी आपल्या घोषणांनी विद्यापीठ दणाणून सोडला.
पोलिसांनी आपल्या बळाचा वापर केला.
झटापट सुरु झाली. काही एनएसयुआय(कॉंग्रेस पक्षाशी सलंग्न असणारी विद्यार्थी संघटना)चे कार्यकर्ते देखील यात सामील झाले. नक्षलवाद्यांनां विद्यापीठातून बाहेर हाकलाचे नारे देत तेही आंदोलनकर्त्यांना भिडले.
पोलिसांनी कशीबशी स्थिती काबू मध्ये आणली. डॉ. मनमोहन सिंग यांनी शांतपणे आपले भाषण पूर्ण केले. नेहरूंच्या लोकशाहीवादी भूमिकेचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. आपल्या भाषणाची सुरवातच त्यांनी एका विचारवंताच्या खास वाक्याने केली.
“तुम्ही जे म्हणत आहात त्याच्याशी मी सहमत होऊ शकत नाही, पण तुमच्या बोलण्याच्या अधिकारांची मी मरेपर्यंत रक्षा करेन “
टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. नेहमी अबोल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमोहनसिंगांनी या एका वाक्यात सभा जिंकली होती.
पुतळयाच अनावरण झालं. पंतप्रधान आले तसे निघून गेले.
काही दिवसापासून भारतीय आणि अमेरिकन हवाई दलाच्या संयुक्त सरावाला विरोध म्हणून ही निदर्शने केली गेली. शिवाय १९९१ साली जागतिकीकरण आणणाऱ्या डॉ. मनमोहनसिंग यांच्या आर्थिक धोरणांविषयी देखील या विद्यार्थ्यांचा आक्षेप होता.
ऑल इंडिया स्टुडट फेडरेशनच्या चार विद्यार्थ्यांना अटक झाली. इतरांना विद्यापीठाने नोटीस बजावली. पंतप्रधान भाषणात मोठंमोठं बोलले याच्या उलट प्रशासन कारवाई करत आहे अशी चर्चा jnu कँमप्समध्ये झाली.
दुसऱ्या दिवशी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरुना बीबी भट्टाचार्य यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला. स्वतः मनमोहन सिंग यांनी विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नका असे निर्देश दिले. या आंदोलनामागे सरकार व विद्यार्थ्यांच्यामधील विसंवादहेच मूळ कारण आहे आणि ते सुधारण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
अटक झालेल्या कार्यकर्त्यांचीही सुटका झाली. पंतप्रधानांनी फक्त जोरदार भाषण करून सभाच जिंकली नाही तर दुसऱ्यादिवशी आपल्या कृतीने विद्यार्थ्यांचीही मने जिंकली.
एकेकाळी मनमोहनसिंग यांना काळा झेंडा दाखवणारा, डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणारा संदीप सिंग आज कॉंग्रेस पक्षाशी निगडीत झाला आहे. राहुल गांधी पक्षाध्यक्ष असताना त्यांची भाषणे तोच लिहून देत असे. सध्या कॉंग्रेस पक्षाच्या स्ट्रेटेजी ठरवणाऱ्यामध्ये त्याचा समावेश आहे.
हे ही वाच भिडू.
- नेहरूंच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव मनमोहन सिंगांनी नाकारला होता !
- कॉंग्रेसच्या मनमोहनसिंग यांनी देखील “एक नोटबंदी” केली होती ती पण लपवून…
- मनमोहनसिंग यांची दोन लाखांची उधारी..!
- डॉ.मनमोहन सिंह यांच्या भेटीचे वो सत्तर मिनिट