मनमोहनसिंग यांची दोन लाखांची उधारी..!
१९९९ सालच्या लोकसभा निवडणुका. सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात होती. कारगिल युद्धातील विजय, वाजपेयींच सर्वसमावेशक नेतृत्व यामुळे भाजपच पारड जड होत.
दोन्ही पक्षाच्या राजकीय पंडिताकडून अनेक डाव प्रतीडाव टाकले जात होते.
दक्षिण दिल्लीचा लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला होता. बलराज मधोक, मदनलाल खुराना असे अनेक दिग्गज इथून निवडून आले होते. गेल्या काही वर्षापासून भाजपने सुषमा स्वराजना हा मतदारसंघ राखून ठेवला होता.
दक्षिण दिल्ली मध्ये भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेसकडून डॉ. मनमोहनसिंग यांना उभा करण्यात आलं. आयुष्यातली पहिलीच निवडणूक ते लढत होते.
अर्थमंत्री म्हणून जबरदस्त कामगिरी केलेले डॉ. मनमोहन सिंग यांची लोकप्रियता काही कमी नव्हती. हायव्होल्टेज लढत होणार म्हणून सगळ्यांची उत्सुकता वाढली होती. मात्र अचानक सुषमा स्वराज यांनी यावेळी दक्षिण दिल्ली ऐवजी कर्नाटकातल्या बेल्लारीमध्ये फॉर्म भरला. कारण तिथे उभ्या होत्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी.
इकडे दक्षिण दिल्लीला स्वराज यांच्या जागी विजयकुमार मल्होत्रा भाजपा कडून मनमोहनसिंग यांच्या विरोधात उतरले. विजय मल्होत्रा हे भाजपाचे माजी अध्यक्ष होते. एक काळ असा होता लालकृष्ण अडवाणीना तिकीट मिळवण्यासाठी विजयकुमार मल्होत्राकडे शिफारस घेऊन जावे लागले होते.
असे हे दोन्ही तुल्यबळ नेते. निवडणूक अटीतटीची होती.
निवडणुकीच्या धामधुमीत एक दिवस मनमोहनसिंग यांचा जावई विजय तंखा जेष्ठ लेखक पत्रकार खुशवंतसिंग यांना भेटायला आला. पेशाने प्राध्यापक असलेल्या विजयचे खुशवंतसिंग यांच्याशी घरगुती संबंध होते. थोड्याशा अवघडलेल्या अवस्थेत त्यान आपल्या येण्याचं कारण सांगितलं. सासऱ्याच्या निवडणूक प्रचाराला काही टॅक्सी भाड्याने घायच्या होत्या त्यासाठी थोडे पैसे लागणार होते.
खुशवंतसिंगनी विचारलं किती रुपये?
विजयनी सांगितलं दोन लाख. खुशवंतसिंगना आश्चर्य वाटलं.
” पूर्ण भारताला परकीय गंगाजळीच्या संकटातून वाचवणाऱ्या मनमोहनसिंगला प्रचाराला एवढ्या छोट्याशा रकमेची गरज पडावी? “
आता एवढ्या मोठ्या माणसाला मदत करता येते म्हणून त्यांनी लगेच पैसे काढून दिले आणि विसरूनही गेले.
निवडणुका झाल्या. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या डॉ. मनमोहनसिंग यांचा तीस हजार मतांनी पराभव झाला.
विजयकुमार मल्होत्रा जिंकले होते. सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या काँग्रेसचाही दारूण पराभव झाला होता.
काही दिवसांनी खुशवंतसिंग यांना एक फोन आला. स्वतः मनमोहनसिंग फोनवर होते. त्यांनी भेटण्यासाठी वेळ मागून घेतली. खुशवंतसिंगनी त्यांच्या सोयीची वेळ सांगितली. त्यांना काही कळेना की आता मनमोहनसिंग कशासाठी येत आहेत. दिलेल्या वेळी ते भेटायला आले.
आल्या आल्या मनमोहनसिंगनी खिशातून एक पाकीट काढून खुशवंतसिंग यांच्या हाती दिल. त्यात दोन लाख रुपये होते. ते म्हणाले,
“मैने इस्तेमालही नही किये.”
एवढी वर्ष राजकारणात काढूनही हा माणूस अजून मास्तरच राहिला आहे याची खूणगाठ खुशवंतसिंगनी बांधली.
हे ही वाच भिडू.
- नेहरूंच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव मनमोहन सिंगांनी नाकारला होता !
- एकेकाळी मनमोहन सिंग यांनी जिन्नांचं कपाळ फोडलं होतं!!!
- मायलेकराच्या भांडणात झाला होता अटलजींचा पराभव !
- काँग्रेसमधला नेता ज्याने जवाहरलाल नेहरूंना पराभवाचं तोंड दाखवलं !