डॉ. मनमोहनसिंगांनी पंतप्रधान इंदिरा गांधींना देखील त्यांची चूक दाखवून दिली होती..

डॉ.मनमोहनसिंग. सध्यस्थितीतील देशभरातला सर्वात विद्वान आणि तितकाच सज्जन माणूस. पण आपलं दुर्दैव म्हणजे ते जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांच महत्व कळलचं नाही. तरीही त्यांनी जाता जाता सांगितलंच होतं की इतिहास माझी दखल जरूर घेईल.

ते पाय उतार झाल्याच्या पाच- सहा वर्षातच इतिहासाला त्यांची किंमत कळत आहे.

नोटबंदी जेव्हा जाहीर झाली तेव्हा त्यांनी पंतप्रधान मोदींना ऐतिहासिक चूक आहे असं जाहीरपणे सांगितलं होतं, यावेळी देखील कोरोनाच्या संकटाला कसे सामोरे गेले पाहिजे आणि सरकारच्या काय चुका होत आहेत याच पत्र त्यांनी पंतप्रधानांना पाठवलंय.

मनमोहनसिंग यांच्या सारखा जेष्ठ अर्थतज्ञ जेव्हा सूचना देतो तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा देखील त्याचा सन्मान करतात. ही आजकालची गोष्ट नाही, इंदिरा गांधींच्या बाबतीत देखील असंच घडलं होतं.

मनमोहनसिंग यांचा जन्म पंजाबमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. फाळणीची झळ सोसली. ते लहानपणापासूनच हुशार होते. गुरांच्या गोठ्यात अभ्यास करून त्यांनी जगातील सर्वात नावाजलेल्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवला. तिथे अर्थशास्त्राची डॉक्टरेट पूर्ण केली. सर्वात मानाचा गोल्ड मेडल जिंकला.

इंग्लंड अमेरिकेत मोठ्या पगाराची नोकरी मिळत असताना भारतात परत आले.

पंजाब विद्यापीठामध्ये प्राध्यापकाची नोकरी पत्करली. जवळपास आठ नऊ वर्षे तिथं काम केल्यावर त्यांना युनोमधून ट्रेड व डेव्हलपमेंट विभागात काम करण्याची संधी मिळाली. आपल्या देशातील या जगद्विख्यात होत असलेल्या तरुण अर्थतज्ञाची ख्याती तत्कालीन वाणिज्य ललित नारायण मिश्रा यांच्या कानावर पडली. त्यांनी मनमोहनसिंग यांना भारतात बोलावून घेतले.

नव्यानेच सुरू झालेल्या दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये इंटरनॅशनल ट्रेड हा विषय शिकवण्याची जबाबदारी दिली.

लवकरच भारतीय अर्थमंत्र्यांचे मुख्य सल्लागार या अत्यंत महत्वाच्या पदावर मनमोहन सिंग यांची नियुक्ती झाली.

त्याकाळात पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. त्यांनी पुढे अर्थमंत्रालयाच्या सेक्रेटरीपदी नेमण्यात आले. तेव्हा पासून भारताच्या प्रत्येक आर्थिक निर्णयात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे डॉ. मनमोहन सिंग यांचा महत्वाचा सहभाग आहे.

गोष्ट आहे १९८० सालची. जनता सरकारचा मोठा पराभव करून इंदिरा गांधींचे पुनरागमन झाले होते. काँग्रेस परत सत्तेत येईल हे कोणालाच वाटत नव्हते पण इंदिरा गांधींनी हा चमत्कार करून दाखवला.

या विजयानंतर झोकात संसदेत पुनरागमन करणाऱ्या इंदिराजींचे लोकसभेत भाषण होणार होते. त्यांनी आपल्या भाषणाचा मसुदा आपले आर्थिक सल्लागार मनमोहन सिंग यांना दाखवला. त्यातील एक मुद्दा डॉक्टरसाहेबांना खटकला. ते इंदिराजींना नम्रपणे म्हणाले,

मैडम, विदेशी मुद्रा भंडार बहुत अच्छी हालत में है, इसलिए अगर भाषण में ये बात आई, तो बड़ी किरकिरी हो जाएगी. जनता सरकार से आपकी भले जो भी शिकायतें हों, पर ये बात सच है कि वो भरपूर विदेशी मुद्रा भंडार छोड़ गए हैं.’’ 

पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भाषणातील चूक काढण्याचं धाडस मनमोहन सिंग यांनी दाखवलं. पण त्या चिडल्या नाहीत. त्यांनी डॉ. सिंग यांच्या स्पष्टवक्तेपणाचं कौतुकच केलं आणि आपली चूक सुधारली.

विरोधकांवर टीका म्हणून देखील खोटेपणा करण्यासाठी व इतर कोणाला करू देण्यासाठी मनमोहन सिंग तयार नव्हते हेच या प्रसंगातून कळतं आणि आपल्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिलेली छोटीशी चूक देखील सुधारण्याचा मनाचा मोठेपणा कसा असावा हे इंदिराजींकडे बघून कळतं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.