सेव्हिंग खात्यावरचे पैसे दामदुप्पट झाले आणि मनमोहनसिंग यांना टेन्शन आलं

जर काही न करता तुमच्या अकाऊंटमधले पैसे डबल झाले तर? मग काय लॉटरीच की! आपण नवीन गाडी, नवीन मोबाईल, दोस्तांना पार्टी,  गर्लफ्रेंडला गिफ्ट, आईला नवीन साडी काय आणि काय काय. लई प्लॅन असतात. अहो साधं पँटेच्या खिशात एखादी 100 ची नोट गावली तर खुश होणारे आपण.

अशीच लॉटरी आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना लागली होती.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. आपल्या अनेक राजकीय विरोधकांना मागे टाकून नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान बनले होते. मंत्रिमंडळाची रचना करताना आपल्या पक्षातल्या स्पर्धकांना त्यांनी बाहेर बसवण्याचे व्यवहार चातुर्य दाखवलं होतं.

राव यांचा सर्वात मोठा निर्णय म्हणजे राजकारणाबाहेरच्या डॉ. मनमोहन सिंग यांना थेट अर्थमंत्री बनवणे.

मनमोहनसिंग म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठातील गोल्डमेडल मिळणारे अर्थतज्ञ. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, भारताच्या प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष, संयुक्त राष्ट्र, आयएमएफ, वर्ल्ड बँक या सारख्या जागतिक संस्थांवर काम करण्याचा अनुभव असलेले मुरब्बी प्रशासक.

नरसिंह राव पंतप्रधान बनले तेव्हा देशाची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक बनली होती. फक्त ७ दिवस पुरेल इतकीच विदेशी मुद्रा रिजर्व बँकेकडे होती. लवकर पावले उचलली नाहीत तर कर्जबाजारी होऊन अख्खा देश कोसळून पडेल अशी वेळ आली होती.

याच कारणामुळे नरसिंहराव यांनी डॉ. मनमोहनसिंग यांना अर्थमंत्रालय सांभाळण्याची विनंती केली होती.

सुरवातीला मनमोहनसिंग राजकारणात येण्यास इच्छूक नव्हते मात्र पंतप्रधानांनी त्यांना त्यांच्या कारभारात क9नट हस्तक्षेप करणार नाही याचे आश्वासन दिले. राजकारण होणार नाही याची खात्री पटल्यावर मनमोहनसिंग यांनी अर्थमंत्री पद स्वीकारलं.

त्यांनी आल्या आल्या मोठे निर्णय घेण्याचा धडाका लावला. भारतातील लायसन्स व परमिट राज बंद करण्यासाठी पावले उचलली.

जुलै 1991 साली मनमोहनसिंग यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ऐतिहासिक ठरला. या अर्थसंकल्पात भारतात आर्थिक उदारीकरणाला परवानगी दिली होती. बाजार खुला करण्यात आला होता. भारतीय चलनाचे अवमूल्यन करण्यात आले

प्रचंड मोठा विरोध असूनही मनमोहनसिंग यांनी हे निर्णय घेतले व पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांनी देखील त्यांना खंबीर पाठिंबा दिला.

जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर आर्थिक सुधारणांचं अडलेलं चाक धावायला सुरू झाले.

हे सगळं झालं मात्र एक दिवस डॉ. मनमोहनसिंग नरसिंहराव यांना भेटायला आले. त्यांना बघितल्यावर रावांना जाणवलं की काही तरी गडबड आहे. मनमोहनसिंग यांचा चेहरा उतरलेला होता. नरसिंहराव यांनी त्याना काय झालं म्हणून विचारलं.

मनमोहनसिंग खाली मान घालून म्हणाले,

“मी जिनेव्हा येथे काम करत होतो तेव्हा तिथल्या बँकेत माझा पगार जमा होत होता. कधी लागले नाहीत म्हणून मी ते पैसे काढले नाहीत. हे सगळे पैसे डॉलर मध्ये होते. पण आता रुपयाचं अवमूल्यन केल्यामुळे ही रक्कम जवळपास दुप्पट झाली आहे. मी मुद्दामहून केलेलं नाही.”

अर्थमंत्र्यांनी स्वतःच्या अकाऊंट मधले पैसे वाढवण्यासाठी रुपयाचं अवमूल्यन केलं असा आरोप विरोधक करतील याच मनमोहनसिंग यांना टेन्शन आलं होतं.

मात्र नरसिंहराव हसले. त्यांनी सांगितलं काही प्रॉब्लेम नाही, माझा तुमच्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे.

पण मनमोहनसिंग यांना ते पैसे नको होते. त्यांनी नरसिंहराव यांना या पैशाच काय करायचं अस विचारलं. त्यांनी सल्ला दिला की हे जादाचे पैसे पंतप्रधान रिलीफ फंड मध्ये जमा करा. डॉ. मनमोहनसिंग खुश झाले.

त्यांनी ते पैसे रिलीफ फंड ला दिले, त्यांच्या डोक्यावरचं टेन्शन उतरलं.

डॉ. मनमोहनसिंग हा भारतीय राजकारणातला संत माणूस आहे असं का म्हणतात ते हे या एका उदाहरणावरून  पटते.

हा किस्सा जयराम रमेश यांनी आपल्या “To the brink and back” या पुस्तकात सांगितला आहे.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. Suyog says

    भिडू असं copy paste karaycha nay, direct link share करायची…made my day😂
    Btw Amazing Article!❤️💯

Leave A Reply

Your email address will not be published.