मनमोहन सिंगांचा तो फोटो व्हायरल केल्याबद्दल मुलगी भाजपला म्हणते, झू मध्ये आलेले नाही आहात

देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. पण आता त्यांचा एक फोटो व्हायरल होतोय. ज्यामुळे समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या शंका कुशंका काढल्या जातायत.
आणि या सगळ्या घटनेला मनमोहन सिंग यांच्या मुलीने जबाबदार धरलं आहे, भाजपचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांना.
डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती मंगळवारी अचानक बिघडली होती. त्यांना श्वास घेण्यात अडचण येत होती आणि छातीत सतत दाब येत असल्याची तक्रार होती. यानंतर त्यांना तत्काळ एम्सच्या सीएन टॉवरमध्ये दाखल करण्यात आले होते. यावर देशाचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, एम्स मध्ये जाऊन गुरुवारी मनमोहन सिंग यांची भेट घेतली.
पण भेट घ्यायला येताना ते एका फोटोग्राफरला घेऊन आले होते.
यावर मनमोहन सिंग यांच्या कन्या दमनदीप यांनी ThePrint ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की,
या मंत्र्यांनी जेव्हा एका फोटोग्राफर सहित खोलीत प्रवेश केला तेव्हा, त्यांच्या आई खूप अस्वस्थ झाल्या. त्यांनी फोटोग्राफरला बाहेर जाण्यासाठी आग्रह केला तेव्हा त्या फोटोग्राफरने पूर्णपणे दुर्लक्ष केले. माझे पालक खूपच कठीण परिस्थितीला तोंड देत आहेत. ते वृद्ध आहेत.
कोणत्या प्राणीसंग्रहालयात ठेवलेले प्राणी नाहीत.
माझे वडील डेंग्यूने ग्रस्त आहेत आणि त्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे म्हणून आमचा स्पष्टपणे आग्रह आहे की, बाहेरून येणाऱ्या लोकांवर बंदी घालावी. लसीचे दोन डोस घेऊनही, एप्रिलमध्ये आलेल्या दिल्लीत आलेल्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाचा सामना करावा लागला होता.
आरोग्यमंत्र्यांची भेट घेणे आणि आमच्या वडिलांविषयी चिंता व्यक्त करणे चांगले होत. पण, माझे पालक त्यावेळी फोटो काढण्याच्या स्थितीत नव्हते.
डॉ. मनमोहन सिंग यांना झाली होती कोरोनाची लागण
डॉ. मनमोहन सिंग, हे २००४ ते २०१४ पर्यंत पंतप्रधान होते. त्यांना या वर्षी कोरोना विषाणूची लागण झाली. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना १९ एप्रिल रोजी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर २९ एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. मनमोहन सिंग यांना साखरेचा त्रास आहे. माजी पंतप्रधान सिंग यांच्यावर दोन बायपास शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत.
त्यांची पहिली शस्त्रक्रिया १९९० मध्ये युनायटेड किंगडममध्ये करण्यात आली, तर त्यांची दुसरी बायपास शस्त्रक्रिया २००९ मध्ये एम्समध्ये करण्यात आली. गेल्या वर्षी मे महिन्यातही त्यांना ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ही बातमी सतत अपडेट केली जात आहे.
हे ही वाच भिडू