मनमोहनसिंग यांची भविष्यवाणी खोटी ठरवत HDFC भारतातील सर्वात आघाडीची बँक बनली

आर्थिक मंदी, त्यात आलेलं नोटबंदीच संकट, गेल्या काही काळापासून सुरु असलेला कोरोनामुळे बँकिंगक्षेत्राला हादरे बसत आहेत. सगळ्या जगातच हे संकट आलं आहे. पण विशेषतः भारतीय बँका जास्तच गटांगळ्या खात आहेत.

या आर्थिक संकटात आपल्या देशात ज्या काही बँका मजबूत स्थितीत आहेत त्यात सर्वात आघाडीची बँक म्हणजे HDFC.

हौसिंग डेव्हलपेन्ट अँड फायनान्स कार्पोरेशन या भारदस्त नावाच्या बँकेची स्थापना हसमुखभाई पारेख या गुजराती व्यक्तीने केली होती. १० मार्च १९११ साली सुरत मध्ये जन्मलेल्या हसमुखभाईंचं बालपण मुंबईच्या एका छोट्याशा चाळीत गेलं. त्यांचे वडील पतपेढ्यांमध्ये काम करायचे. त्यामुळे लोन,मॉर्गेज, कॅपिटल या बँकिंग टर्म्सच बाळकडू त्यांना अगदी लहान वयातच मिळालं होतं.

जात्याच चलाख आणि हुशार असलेल्या हसमुखभाईंनी प्रचंड शालेय जीवनात प्रचंड मेहनत घेतली. वेळप्रसंगी पार्टटाइम नोकरी केली पण आपलं ग्रॅज्युएशन चांगल्या मार्कानी पास केलं.

स्वातंत्र्यापूर्वीचा काळ. ब्रिटिशांच्या या राज्यात चांगले शिक्षण मिळवण्याचा एकच उपाय होता तो म्हणजे इंग्लंडला जाणे. हसमुखभाईनी सुद्धा मनात जिद्द ठेवली होती की काहीही करून जगातल्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जायचं. त्यांच्या आईचा त्यांना मोठा पाठिंबा होता. आपल्या मुलाची जिद्द पूर्ण व्हावी म्हणून त्या माउलीने रात्रंदिवस एक करून पैसे साठवले.

हसमुखभाईनी मेहनतीने लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश मिळवला.

स्कॉलरशिप मिळवली. तिथे जाऊन बँकिंग आणि फायनान्स विषयात चांगल्या मार्काने डिग्री मिळवली. आपलं व आपल्या आईच स्वप्न साकारकरून हसमुखभाई १९३६ साली भारतात परत आले.

तस बघायला गेलं तर त्यांना इंग्लंड व अमेरिकेत चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकत होती, पण देशप्रेम आणि गांधींच्या स्वातंत्र्यलढ्या मुळे वाहत असलेलं स्वदेशीच वारं यामुळे हसमुखभाई यांनी आपल्या मायभूमीतच नोकरी शोधण्याचा निर्णय घेतला.

मुंबईला परतल्यावर त्यांना हरकिसनदास लख्मीदास या स्टोक ब्रोकिंग फर्ममध्ये नोकरी मिळाली. या सोबतच हसमुखभाई सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये पार्ट टाइम लेक्चरर म्हणून देखील काम करू लागले.

या दोन्ही नोकऱ्यांमध्ये त्यांना खूप काही शिकवलं. स्टॉक ब्रोकिंगच्या व्यवसायात अनेक व्यवहार कसे चालतात याचा अनुभव त्यांना आला तर शिक्षकाच्या नोकरीमध्ये अर्थशास्त्र व वित्तक्षेत्रातील नवनवीन ट्रेंड याचा अभ्यास त्यांचा कायम राहिला. इकॉनॉमिक पॉलिसी बद्दल त्यांची व्याख्याने देखील आयोजित केली जाऊ लागली.

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. या नव्या देशात राज्यकर्त्यांना प्रत्येक गोष्ट नव्याने उभी करायची होती, उद्योगधंदे निर्माण करून रोजगार उपलब्ध करायचा होता. धरणे, कालवे यांपासून अनु अयोग्य, अंतराळ अभ्यास यांक्षेत्रात आपण पाऊल टाकत होतो.

या सगळ्या नव्या विकास पर्वत बँकिंग क्षेत्र मागे कसे राहणार होते? १९५५ साली वर्ल्ड बँक, भारत सरकार व इतर फायनान्स व इंश्युरन्स कंपन्यांच्या मदतीने  Industrial Credit and Investment Corporation of India म्हणजेच आयसीआयसीआयची स्थापना झाली.

हसमुखभाई पारेख यांची या फायनान्स इन्स्टिट्यूशन मध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर पदावर निवड झाली. त्यांचा मोठा अभ्यास, त्यांचे नॉलेज याच्या बळावर आयसीआयसीआयने अगदी काही काळातच मोठी प्रगती केली. दहा पंधरा वर्षात त्यांची आयसीआयसीआयचे चेअरमन बनवण्यात आले.

त्याकाळात हसमुखभाई पारेख यांच्या शब्दाला सरकरी धोरणांमध्ये देखील मोठं महत्व होतं. भारताने पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार या शेजारी देशांना घेऊन एक कॉमन मार्केट बनवण्याची त्यांची सूचना चांगलीच गाजली आणि पुढच्या काही वर्षात ती अंमलात देखील आणली गेली. खाजगी वित्त कंपनीत असूनही त्यांचे विचार राष्ट्रवादाला पूरक असेच होते.

१९७६ साली ते ICICIच्या चेअरमन पदावरून निवृत्त झाले.

हसमुखभाईंनी आयुष्यात मानमरातब, पैसा त्यांनी खूप कमावला होता. पण त्यांच्या बायकोच लवकर निधन झाल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं नाही. त्यांना मुलं देखील नव्हती. एकाकी आयुष्य आपल्या कामांनी त्यांनी भरून काढलं. वयाच्या ६७ नंतर सगळं जग कायमच निवृत्त होतं पण हसमुखभाईंनी निवृत्ती नंतर दुसरी इनिंग सुरु केली.

HDFC च्या स्थापनेच स्वप्न.

तस बघायला गेलं तर हा आणीबाणी आणि लायसन्सराजचा काळ. इंदिरा गांधींनी १४ बँकांचे राष्ट्रीयकरणं केले होते. आपल्या देशाची समाजवादी विचारसरणी डावीकडे झुकू लागली होती. मोठे आर्थिक स्थित्यन्तर घडून येत होते. या आर्थिक बदलाला सामोरे जाण्यास देशाच्या नागरिकांना सज्ज करणे हि महत्वाची बाब होती.    

हसमुखभाईंनी फक्त hdfcच्या स्थापनेमागे एक उदात्त हेतू होता, भारतातल्या दहा लाख लोकांना स्वतःच पक्क घर बांधून देणं. हौसिंग डेव्हलपेन्ट अँड फायनान्स कार्पोरेशन हि घरबांधणीसाठी लोकांना पैसे उभे करून देणारी एक मॉर्गेज कंपनी असणार होती. त्याच्या स्थापनेच्या संदर्भात त्यांनी तेव्हाचे चीफ फायनान्स सेक्रेटरी असलेल्या डॉ.मनमोहन सिंग यांची भेट घेतली.

मनमोहन सिंग हे ऑक्सफर्डचे गोल्ड मेडल मिळवलेले जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ होते. फायनान्स सेक्रेटरी म्हणून देशाच्या आर्थिक नाड्या त्यांच्याच हातात होत्या. हसमुखभाई जेव्हा एचडीएफसीच्या स्थापनेविषयी त्यांच्या भेटीला आले तेव्हा त्यांना हा प्रस्ताव पसंद पडला नाही.

ते म्हणाले,

“भारतात आजवरचा हा हाऊसिंग फायनान्सचा पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी होईल का हे कोणीही सांगू शकत नाही.”

मनमोहन सिंग यांनी हात वर केल्यामुळे हसमुखभाई निराश झाले. सरकारी मदत मिळणार नाही हे पक्के होते. पण त्यांनी परदेशी गुंतवणूकदारांकडून निधी उभा केला होता. आता प्रतीचे दोर कापले गेले होते. त्यांनी हे धाडस करायचं ठरवलं.

डॉ.मनमोहन सिंग यांचा अंदाज चुकीचा ठरला. एचडीएफसीचा प्रयोग यशस्वी झाला. अगदी काही काळातच मध्यमवर्गीय भारतीयांनी एचडीएफसी फायनान्सची कल्पना उचलून धरली.

हसमुखभाई यांच्या मनात मनमोहन सिंग यांच्याबद्दल कधीच कटुता नव्हती. उलट रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बनल्यावर मनमोहन सिंग त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी यायचे तेव्हा हसमुखभाई त्यांची मदतच करायचे असं खुद्द मनमोहन सिंग यांनी एकेठिकाणी सांगितलेलं आहे .

हसमुखभाई यांना कोणी मुलबाळ नव्हते मात्र त्यांचा पुतण्या दीपक पारेख हाच त्यांचा वारसदार ठरला. एचडीएफसीच्या स्थापनेपासून तो सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत होता. त्यांच्या मदतीने पारेख यांनी हिंदुस्थान ऑइल एक्स्प्लोरेशन कंपनी, गुजरात रुरल हाऊसिंग फायनान्स या अशा अनेक कंपन्यांची स्थापना केली.

ज्या मनमोहन सिंग यांनी HDFCच्या स्थापनेला विरोध केला होता ते १९९१ साली देशाचे अर्थमंत्री बनले, अनपेक्षितपणे त्यांनी जागतिकीकरणाचा स्वीकार करून देशाची बंद असलेली आर्थिक कवाडे खुली केली. त्यांच्या धोरणांच्या मदतीनेच HDFC दीपक पारेख यांच्या नेतृत्वाखाली बँक बनली.

१८ नोव्हेम्बर १९९४ रोजी हसमुखभाई पारेख यांचे निधन झाले. मृत्यू पूर्वी भारत सरकारने त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदमभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचीत सन्मान केला होता पण आजही करोडो भारतीयांना फायनान्स क्षेत्रात खंबीर बनवणारी एचडीएफसी बँक त्यांच्या कार्याचे खरे स्मारक आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.