ज्यांचं ऐकून विखे सेनेत आले; त्या जोशींनीच विखेंना पोटनिवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला

विखे-पाटील घराणं हे राजकारणातील मोठं नाव. विखे-पाटील घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे. राजकारणाबरोबर सहकार, समाजकारण या क्षेत्रात विखे-पाटील घरणाच्या नाव पुढे आहे. बाळासाहेब विखे पाटील तर तब्बल आठ वेळा लोकसभेचे खासदार राहिले. ते मूळचे काँग्रेसचे होते. ते नेहमी आपण समाजवादी विचाराचे आहोत असे सांगायचे. 

बाळासाहेब विखेनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा राजकारणात प्रवेश केला. त्यांच्या राजकारणाची सुरुवात ९० च्या दशकात झाली. १९९५ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर शिर्डी  विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते जिंकले. 

१९९५ मध्ये राज्यात पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजप सरकार स्थापन झालं.

मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले होते. जोशी यांनी शिवसेनाचा विस्तार राज्यभर करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले होते. राज्यातील ग्रामीण भागात विस्तार करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील सक्षम नेते शिवसेनेकडून शोधण्यात येत होते. 

राधाकृष्ण विखे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मुख्यमंत्री मनोहर जोशी राधाकृष्ण विखेंना ‘शिवसेनेत या’ अशी गळ घालत होते. शिवसेनेत तुमचा योग्य तो सन्मान करण्यात आणि तुम्हाला काम करण्याची योग्य संधी देऊ असा शब्द दिला होता. तसेच पक्ष बदलल्यानंतर विधानपरिषदेवर घेण्याचीही तयारी दर्शवली. राधाकृष्ण विखेंना ही ऑफर आवडली होती. त्यामुळे राधाकृष्ण विखेंनी शिवसेनेत जायचा निर्णय घेतला. 

शेवटी मनोहर जोशी यांचे म्हणणे ऐकून राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेत आले 

पक्षांतर बंदीचा कायदा आला होता. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर काँग्रेस पक्ष सोडायचा, यानंतर मनोहर जोशी यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना अगोदर मंत्री करायचं आणि नंतर विधानपरिषेदेवर निवडून आणायचे ठरवले होते. 

मंत्री झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत राधाकृष्ण विखे हे दोन्ही पैकी कुठल्या तरी एका सभागृहाचे सदस्य व्हायला पाहिजे होते.

शिवसेना भाजपचं सरकार असल्याने राधाकृष्ण विखे पाटील विधपरिषदेवर सहज निवडून गेले असते. मात्र विधानसभेची  निवडणूक परत सहा महिन्यात जिंकणं इतकं सोपं नसतं. त्यात धोकाही असतो. तुम्ही राजीनामा दिल्याने लगेच निवडणूक लागली म्हणून मतदार चिडण्याची शक्यता असते. यामुळे राधाकृष्ण विखे विधानपरिषेदेवर जातील असं बोललं जात होत.

मात्र, बाळासाहेब विखेंनी याला विरोध केला. ते राधाकृष्ण विखेंना म्हणाले, 

“विधानपरिषद म्हणजे जनतेचा जनादेश नव्हे. तुला शिवसेनेचा मंत्री व्हायचं असेल, तर प्रथम विधानसभेचा राजीनामा द्यायचा आणि मग शिवसेनेतर्फे विधानसभेसाठीची निवडणूक लढवायची. निवडणुकीला घाबरायचं नाही. ”

 

यानंतर मनोहर जोशी यांच्या सरकार मध्ये राधाकृष्ण विखेंना कौशल्य विकास आणि उद्योजकता, भूकंप पुनर्वसन खात्याचे मंत्री करण्यात आले. त्यानंतर राधाकृष्ण विखेंनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि नंतर काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी दिली. 

१९९७ झालेल्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने राधाकृष्ण विखे तर काँग्रेसने रवींद्र देवकर यांना उमेदवारी दिली होती. ही पोटनिवडणूक चुरशीची झाली.

राधाकृष्ण विखे निवडून आले. मात्र त्यांचे मताधिक्य कमी झाले होते.

राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी मनोहर जोशींनी प्रयत्न केले होते. त्यांना मंत्री पद सुद्धा दिले होते. मात्र त्यानंतर  झालेल्या पोट निवडणुकीत त्यांनी वेगळाच डाव खेळला होता. या पोटनिवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी झाली होती. धनंजय गाडेकर शिवसेनेतून बंडखोरी करून उभे राहिले होते.   

मनोहर जोशी यांनी राधाकृष्ण विखें विरोधात शिवसेनेचा बंडखोर उमेदवार उभा केला आणि त्यांना ताकत देऊन राधाकृष्ण विखेंना पाडण्याचा प्रयत्न केला होता असा दावा बाळासाहेब विखे पाटील आपल्या ‘देह वाचावा कारणी’ या आत्मचरित्रात केला आहे.

“शिवसेनेच्याही पुष्कळ नेत्यांनी, त्यांना मनोहर जोशींनी कशाप्रकारे डावलून, सत्तेपासून दूर ठेवलं होतं. त्यामुळे राधाकृष्णलाही मी सावध केलं. या निवडणुकीत राधाकृष्ण निवडून आला, पण मताधिक्य कमी झाल्याचे” बाळासाहेब विखे लिहतात. 

तर राधाकृष्ण विखे शिवसेनेत गेल्याने बाळासाहेब विखेंवर टीका होऊ लागली होती. 

‘मुलगा शिवसेनेत आणि बाप शिवसेनेपासून दूर, हे बापलेकांचं नाटक आहे’ अशी टीका नगर जिल्ह्यात सुरु होती. तर काही कारणांमुळे १९९१ मध्ये बाळासाहेब विखेंना काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आले होते. 

त्यामुळे बाळासाहेब असेही काँग्रेसपासून अलिप्त होते. त्यामुळे विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही कुठल्या तरीही राष्ट्रीय पक्षात प्रवेश करावा अशी अट घातली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब विखेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर एनडीएच्या सरकार मध्ये मंत्रिपद सुद्धा देण्यात आले होते. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.