फटाके विकणारा माणूस काय करू शकतो? जोशी सर मुख्यमंत्री बनले.

मनोहर जोशी पुर्वी दूध विकायचे, फटाके विकायचे आज पुण्यामुंबईत पार्किंगमध्ये एकावर एक गाड्या लावण्याची जी सिस्टिम आहे तसले प्रयोग आपल्याला करता येतील का याची चाचपणी देखील त्यांनी त्या काळात केली होती म्हणे.

आत्ता तुम्ही म्हणाला प्रत्येक माणसान हालाकितच काढलेलं असतय. आम्हाला पण सवयचीच झालंय आत्ता. तर जोशी सरांच काय कौतुक.

सुरवातीला आम्हालापण असच वाटलं ठिकाय, जोशी सरांनी शुन्यातून सुरवात केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेचे पहिल्या फळीतले नेते झाले. तरिही जोशी सरांच्या स्टोरीत काहितरी वेगळं आहे.

हे काहीतरी म्हणजे जोशी सरांना सापडलेलं योग्य वेळी योग्य टायमिंग साधण्याचं स्किल.

मनोहर जोशी यांचा जन्म रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावचा. पण त्यांच मुळ बीड जिल्ह्यात. बीड जिल्ह्यातून त्यांचे कुटूंब रायगड जिल्ह्यात स्थलांतरित झाले आणि पुढे मनोहर जोशी शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत स्थलांतरित झाले. घरची श्रीमंती वगैरे प्रकार नव्हता.

घरात शिक्षुकीचा व्यवसाय. शिक्षण घ्यायचं आणि कुठेतरी नोकरी करायची असा सरळ साधा मराठी मुलांसारखा विषय होता. मनोहर जोशी व्हर्नाक्युलरची परिक्षा पास झालेले.

हि परिक्षा पास होताच जोशी सरांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. त्या काळात देखील शिक्षकांना चांगला पगार मिळत होता. महिन्याला त्यांचा पगार होता पन्नास रुपये. या पगारातून ते घरखर्च भागवत. राहिलेल्या पगारातून शिक्षणाची सोय करण्याचं काम चालू होतं.

जोशी सर M.A. L.L.B झाले होते. M.A. झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली. याच दरम्यान मुंबईत गुजराती लोकांच धंद्यात वर्चस्व होतं. आपण देखील काहीतरी करु म्हणून त्यांनी वेगवेगळे उद्योग करण्यास सुरवात केली.

उद्योगाची हि साखळी अगदी व्हर्नाक्युलरची परिक्षा पास झाल्यापासून महानगरपालिकेतली नोकरी सोडेपर्यन्त चालूच होती.

याच बिझनेसच्या लाईनमधला एक बिझनेस होता तो म्हणजे कोहिनूर क्लासेस.

आजवर डझनभर उद्योग खड्यात गेले होते. त्यामुळे कोहिनूर क्लासेसकडून विशेष अशी अपेक्षा ठेवण्याचा देखील प्रश्नच नव्हता. दादर स्टेशनच्या समोरच्या एका खोलीत कोहिनूर क्लासेसना सुरवात करण्यात आली.

मनोहर जोशी हे खऱ्या अर्थाने “सर” झाले ते इथूनच.  

साल होतं १९६१. या काळात महानगरपालिकेतली नोकरी संभाळत जोशी सरांनी कोहिनूर क्लासेसची स्थापना करण्यात आली.

जोशी सर कोहिनूर बद्दल बोलत असताना सांगतात की,

आज कोहिनूरकडे पाहिलं आणि सांगितलं की कधी काळी मला दोन वेळच्या खाण्याची भ्रांत होती तर पटणार नाही. कित्येक उद्योग सुरू केले तसच कोहिनूर क्लासेस सुरू झाले होते.

क्लासेसनी जम बसवलां. तेव्हा जोशी सरांच्या सुपिक डोक्यात एक आयड्याची कल्पना आली. मराठी माणूस उद्योगात नाही, तो नोकऱ्यांच्या मागे धावतो अशी ओरड चालूच होती. दूसरीकडे आपल्याकडे शिक्षणातूनच पुढे काहीतरी करता येईल हा समज देखील मोठ्या प्रमाणात दृढ झालेला होता.

अशा वेळी मुलांना शाळा सोडा आणि उद्योग करा सांगून उपयोगाच नव्हतं. शिवाय जोशी सरांना आपल्या अपयशी उद्योगातून शहाणपणा आलेलाच. तो शहाणपणा होता तो म्हणजे काहीही करताना त्यांच मुलभूत शिक्षण घेणं. वेल्डिंगच काम करायचं आहे पण त्याबद्दल माहिती नाही, तरिही उद्योग सुरू करणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. थोडक्यात मुलांकडे सामान्य ज्ञान नाही हे ठळठळीत सत्य होतं.

झालं जोशी सरांनी एक वेगळी संकल्पना समोर आणली, आजचे जे डिप्लोमा कॉलेज किंवा ITI कॉलेज आहेत त्याचच हे खाजगी स्वरुप,

कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट.

दादरच्या खोलीत कोहिनूर क्लासेसची सुरवात झाल्यानंतर काही वर्षातच म्हणजे १९६७ साली कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली.  

उद्योगधंदा करायचा असो वा नोकरी. दोन्हीसाठी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट फायद्याची होती.

दहावीनंतर लगेचच किंवा कॉलेज करता करता. जोशीज् कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट. कारण कोहिनूरच्या विद्यार्थांना नोकरी मिळतेच.

उद्योग असो किंवा नोकरी. कॉलेज करता करता शिक्षण घेण्यासाठी कोहिनूरचा पर्याय विद्यार्थांना आवडू लागला. प्लंबर असो किंवा इलेक्ट्रिशन, टिव्ही रिपियेअर करण्यापासून ते रेडिओ दुरुस्तीपर्यन्त सर्व काही करण्याच ज्ञान कोहिनूरच्या छताखाली विद्यार्थांना मिळू लागलं.

याच दरम्यान मनोहर जोशींची ओळख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत झाली. त्यांची पहिली भेट देखील इटरेस्टिंग अशीच होती. त्याबद्दल बोलभिडू वर पुन्हा कधीतरी.

बाळासाहेबांच्या भेटीनंतर जोशी सरांचा पॉलिटिकल आलेख वाढू लागला. सेनेच्या राडा प्रवृत्तीत जोशी सरांसारखी व्हाईट कॉलरचं मुल्य अधिक होतं. त्यातूनच जोशी सरांची किंमत वाढत गेली. तशीच किंमत इकडे कोहिनूरची देखील वाढत होती.

कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूची पकड बसल्यानंतर आजूबाजूंच्या शहरात शाखा सुरू झाल्या.

सेटअप बसला आणि साल १९७९ साली जोशी सरांचे कोहिनूर बांधकाम व्यवसायात उतरले. दादर सारख्या परिसरातच पहिली निवासी बिल्डिंग बांधून मुहूर्त करण्यात आला. त्यानंतर मात्र कोहिनूरने बरेच मोठ्ठे प्रोजेक्ट हातात घेतले. कोहिनूर सिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, शॉपिंग मॉल, हॉस्पीटल्स, शाळा, कॉलेज, क्लब हाऊस असे अनेक प्रकल्प कोहिनूर पुढे उभारत गेलं.

कोहिनूरने अनेक कमर्शियल प्रकल्प उभे केले. कोहिनूर काँटिनेंटल हॉटेल, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेस नजिक असलेली कोहिनूर इलिट बिल्डींग, मुंबई सेन्ट्रल मधील १७५ बेड्सचं कोहिनूर हॉस्पिटल, खंडाळ्यातील प्रशस्त कोहिनूर बिझनस ग्रुपची इमारत,मुंबईतील कोहिनूर बिझनस स्कूलचे कॉम्प्लेक्स अशा महत्वाच्या बिल्डिंग कोहिनूरच्या खात्यात जमा आहेत.

१९८६ साली “कोहिनूर” हॉटेलिंग व्यवसायात उतरले.

एयरपोर्ट जवळ फोर स्टार १४० खोल्यांचे कोहिनूर डिलक्स हॉटेल कंपनीने बांधले त्यालाच कोहिनूर काँटिनेंटल म्हणून ओळखले जाते. त्यानंतर कुर्ला येथे कोहिनूर इलीट नावाचे सहा मजली लक्झरी हॉटेल सुरु केले. कंपनीने चेन्नई इथे कोहिनूर Asiana हे सव्वा दोन एकरात पसरलेलं १८५ सुट्स असणारे पंच तारांकित हॉटेल देखील बांधले.

१९९१ मध्ये कंपनीने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरा समोर ५०० लोकांची शमता असणारा कोहिनूर हॉल बनवला. लग्न आणि इतर समारंभ, इव्हेंन्ट, सेमिनार आणि कॉन्फरन्स तिथे होतात.

२००१ साली कंपनी उर्जा क्षेत्रात पदार्पण केले.

आज कोहिनूर पवन उर्जेच्या क्षेत्रात मोठी होत असणारी देशातील एक आघाडीची कंपनी आहे. राजस्थान मध्ये कंपनीने २००९ साली २४ मेगावॅट च्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात कंपनीच्या अनेक पवन चक्या एका दशकापासून सुरु आहेत.

२००३ साली कोहिनूर ने खंडाळा इथे प्रशस्त जागेत IMI institute of hospitality managment ही संस्था उभी केली. तेथील बिझनस स्कूल देखील २००३ पासूनच चालू करण्यात आले.

त्याच वर्षी दादर येथे कोहिनूर ने स्वत:चे सात मजली कॉर्पोरेट ऑफिस बनवले..

२००५ साली कंपनीने मुंबई मधील कुर्ला इथे ३४.४ एकरात पसरलेली कोहिनूर सिटीचे काम सुरु केले. पुढे तिथे अनेक रहिवासी इमारती, कॉर्पोरेट ऑफिसेस आणि मार्केट उभे राहिले. २००६ साली दादरचा वादात सापडलेला कोहिनूर स्क्वेअर हा प्रोजेक्ट सुरु झाला होता.

२००९ साली Sports Education Development India Limited ही अद्यावत खेळांचे प्रशिक्षण देणारी अकादमी कोहिनूरने काढली. आज SPDIL चे क्रिकेट कोचिंग मध्ये मोठे नाव आहे. क्रिकेट मधील मोठ मोठे खेळाडू तिथे प्रशिक्षण देण्यास येत असतात.

२००९ साली कंपनी मेडिकल क्षेत्रात उतरली. कंपनीने अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असे कोहिनूर हॉस्पिटल कुर्ल्यात उभं केलं. जगातील दुसरं आणि आशियातल पहिले LEED Platinium मानांकन असलेले ते हॉस्पिटल आहे. आज मनोहर जोशी यांची महाराष्ट्रभर अनेक हॉस्पिटल्स आहेत.

२०१० साली कोहिनूरने शालेय शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल काढले. याच वर्षी कोहिनूर बिझनस स्कूलची मुंबईत स्थापना झाली, कोहिनूर ने व्यवस्थापन शिक्षणात ही पाय पसरले बिझनेस स्कुल उभे केले.  याच वर्षी कोहिनूर ईलीट हे Luxurious हॉटेल कोहिनूर ने उभे केले.

२०१४ साली कोहिनूरला मुबईच्या प्रमुख दहा रियल इस्टेट ब्रॅण्डस् मध्ये नामांकन मिळाले.

दादर स्टेशनच्या समोरच्या खोलीतून कोहिनूर क्लासेसची सुरवात करण्यात आली होती. आज कोहिनूरचं साम्राज्य खूप मोठ्ठ आहे. उद्योग जगतातील मोठ्या कंपन्यामध्ये कोहिनूरचा उल्लेख होतोच.

शिक्षणासोबत सुरू झालेला प्रवास हॉस्पिटॅलिटी, रियल इस्टेट, उर्जा, मेडिकल्स असा सर्वच क्षेत्रात स्थिरावला आहे. मनोहर जोशी म्हणण्याप्रमाणे मराठी माणूस उद्योगात कमी पडता कामा नये. ते राजकारणात नसते तर त्यांच्या उद्योगक्षेत्राकडे अधिक खुल्या नजरेतून पाहता आलं असतं.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.