गोदरेज कारखान्याच्या संपात मनोहर जोशींचा जीव जाता जाता वाचला होता

७० च्या दशकात मुंबईतील कामगार संघटनांवर डॉ. दत्ता सामंत यांच एकहाती वर्चस्व यायला सुरुवात झाली होती. सामंतांच्या एका शब्दावर गिरणी कामगार संप सुरू करायचे. या संपाला शिवसेनेचा मात्र विरोध असायचा. किंबहुना रस्त्यावर शिवसैनिक असलेला कामगार आपल्या कारखान्याच्या आत गेल्यावर पूर्णपणे सामंतांचा कार्यकर्ता होऊन जायचा.

७० च्या दशकात असाच एक संप घडला होता आणि या संपात मनोहर जोशींचा जीव जाता जाता वाचला होता.

तर भारतीय कामगार सेनेची १९६८ मध्ये स्थापना झाल्यानंतरच्या दहा-बारा वर्षांच्या काळात गिरणी कामगारांवरील साम्यवादी आणि समाजवादी विचारांच्या नेत्यांचा प्रभाव हळूहळू कमी होत गेला. एकूणच कामगार चळवळीला असलेले वैचारिक अधिष्ठान काळाच्या ओघात लुप्त होऊन गेलं. आणि केवळ आर्थिक स्वरूपाच्या मागण्यांवर लढा देणाऱ्या मिलिटंट कामगार नेत्यांचा प्रभाव वाढू लागला.

डॉक्टर दत्ता सामंत यांच नेतृत्व त्यामुळेच पुढे आल होत.

गिरणी कामगारांच्या त्या ऐतिहासिक लढ्याचे नेतृत्व डॉक्टर सामंत यांच्याकडेच होतं आणि डॉ सामंतांचे शिवसेनेशी असलेलं वैर तर फार जुनं होतं. सहाजिकच गिरणी कामगारांच्या संपाला शिवसेनेचा पाठिंबा असणे शक्यच नव्हतं.

डॉ. सामंत यांचा शिवसेनेचा पहिला संघर्ष झाला १९७० च्या दशकातल्या गोदरेजच्या संपावेळी. विक्रोळी येथील गोदरेजच्या त्या कारखान्यात कम्युनिस्टांची युनियन होती. पुढे कामगार इंटकच्या झेंड्याखाली आले. काँग्रेसचे नेते राजाभाऊ कुलकर्णी यांच्याकडे या कामगारांचे नेतृत्व होत. पुढं राजाभाऊंची लोकसभेवर निवड झाली आणि त्यांच्या जागी प्रभाकर कुंटे यांनी युनियनचे काम सुरू केलं.

त्यांनी किमान आठ टक्क्यांवर बोनसची तडजोड केल्यामुळे कामगार नाराज होते. डॉ सामंत काँग्रेसमध्ये होते. त्यांनी या कामगारांच्या प्रश्नात लक्ष घालायला सुरुवात केली. मुळात गोदरेज मधल्या कामगारांना एकत्र आणण्याचं काम सुंदरम यांनी केलं होतं. कालांतराने सुंदरम यांचही गोदरेज मध्ये लक्ष कमी झालं. तेव्हा त्यांनी बी एस धुमे यांच्याशी संपर्क साधला होता.

गोदरेज मधल्या कामगारांचे आंदोलन सुरू असताना डॉ. सामंत यांच्या सभांना गर्दी व्हायला सुरुवात झाली. त्यांना तेव्हा विक्रोळी आणि भांडुप परिसरातील दि. बा. पाटील या आणखीन एका कामगार नेत्याची साथ लाभली होती. डॉ. सामंत आणि दी बा पाटील यांच्या कामाची शैली सर्वश्रुत होती आणि कामगार त्यांच्या मागे जात होते हे बघून कम्युनिस्ट संघटनांनीही पिछाडीवर राहणं पसंत केलं.

अशा वेळी शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेने संपात हस्तक्षेप करायला सुरुवात केली. दहशतवादाने शिग गाठली होती आणि कामगारांना मारहाण करण्याचे प्रकारही वाढीस लागले होते. वातावरण दिवसेंदिवस तंग होत चालला होत. अखेर नेमकी परिस्थिती काय आहे याचा अंदाज घेण्यासाठी मनोहर जोशी यांनी विक्रोळीला जायचं ठरवलं. त्या सुमारास तिथे झालेला गुंडागिरीत एका शिवसैनिकाला जबर मारहाण झाली होती.

गोदरेज मधील कामगारांच्या प्रश्नात मनोहर जोशी लक्ष घालणार आहेत हे कळल्यामुळे तिथली परिस्थिती आणखीनच स्फोटक बनली. विक्रोळी गोदरेज कारखान्याच्या परिसरात पोलीस बंदोबस्त पूर्वीपासूनच होता. पण जोशी यांच्या भेटीच्या निमित्ताने त्यात मोठी वाढ करण्यात आली. विक्रोळीला आल्यावर जोशी यांनी पहिल्यांदा त्या मारहाण झालेल्या कामगाराच्या घरी जाऊन भेट घेतली.

ते कारखान्याच्या आवारात आले. दंगल कोणत्याही क्षणी सुरू होईल असं वातावरण सुरू होतं. दगडफेक सुरू झाली. सोडावॉटरच्या बाटल्याही वापरही सर्रास सुरू होता. अचानक काही कामगारांनी मनोहर जोशी यांनी लक्ष करायला सुरुवात केली. डॉक्टर सामंत यांचे पाठीराखे आणि स्थानिक शिवसैनिक यांचा तुंबळ हाणामारी सुरू झाली.

घटनास्थळी असलेले पोलीस निरीक्षक चांदगुडे यांनी मनोहर जोशी यांना कारखाना परिसरातून दूर नेण्याचा निर्णय घेतला. प्रयत्नांची शिकस्त करून एका पोलिस व्हॅनमधून जोशींना बाहेर पाठवलं. पण कामगारांचा जमाव इतका पेटलेला होता की त्यांनी चांदगुडे यांनाच दगडांनी ठेचून ठार मारलं. त्यावेळी झालेल्या धुष्मचक्रीत आणखीन दोन पोलीस हवालदार ही मारले गेले होते.

शिवसेना आणि डॉ. सामंत यांच्यातल्या संघर्षाला या भीषण हिंसाचाराची काळीकुट्ट पार्श्वभूमी होती.

हे हि वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.