मनोहर पर्रीकर ॲडल्ट फिल्म बघायला गेले तेव्हा..

आजकालचे राजकारणी तोलून मापून बोलतात. सोशल मीडियाच्या जगात आपल्या अर्थाचा अनर्थ करायला लाखो ट्रोल बसलेले असतात. कधी कुणाची भावना दुखावते तर कधी कोणाची संस्कृती भ्रष्ट होते.

पण राजकारणात असूनही बिनधास्त वागण्यासाठी आणि तितक्याच बिनधास्त बोलण्यासाठी फेमस आलेले नेते म्हणजे कै.मनोहर पर्रीकर

कधीकधी पणजीच्या सिग्नलवर स्कुटरवरून ऑफिसला निघालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अनेकांनी पाहिले आहेत. अगदी कोणाच्या लग्नात गेले तरी रांगेत आपले ताट घेऊन उभा राहण्राह माणूस देशाच्या संरक्षण मंत्रीपदापर्यंत पोहचलेला मोठा नेता होता. त्यांच्या साधेपणावर आणि स्वच्छ चारित्र्यावर कधी विरोधकांनी देखील बोट दाखवलं नव्हतं.

अशाच या साध्या सज्जन मनोहर पर्रीकरांच्या लहानपणीच्या खोडकरपणाचा एक किस्सा.

साधारण सत्तरच्या दशकातली गोष्ट असेल. गोव्यात एकदा कोणता तरी इंग्रजी सिनेमा आला होता. आज आपण सहज घरात बसून हा सिनेमा पाहू पण त्याकाळी या सिनेमातील काही सिन अडल्ट समजले जातील असे होते.

मनोहर पर्रीकर तेव्हा शाळकरी वयातले होते. त्यांना हा सिनेमा नेमका काय आहे हे पाहण्याची उत्सुकता होती.

त्यांनी आपल्या मोठ्या भावाला सोबत येण्यासाठी तयार केलं. तो यापूर्वी असा सिनेमा पाहून आला असावा. अनुभव असल्यामुळे तो जरा धाडसी देखील होता. दोघेही लपतछपत थिएटरमध्ये पोहचले. तिकीट घेतलं आणि सिनेमा हॉल मध्ये घुसले.

ते पोहचले तो वर सिनेमा सुरु झाला होता. थिएटरमधले दिवे मालवले गेले होते. त्या दोघांनी अंधारात आपली खुर्ची शोधली आणि मोठ्या डोळ्यांनी सिनेमा पाहू लागले. इंग्रजी असल्यामुळे त्या काळात तो समजणे शक्य नव्हतं, तरी पडद्यावरची चित्रे पाहून त्यांनी मनाचं समाधान मानलं.

इंटव्ह्ल झाला. थिएटरमधले दिवे लागले. काहीजण वेफर्स समोसा आणायसाठी बाहेर जाऊ लागले. पर्रीकर आणि त्यांचा भाऊ तिथेच बसून होता. सहज शेजारच्या खुर्चीकडे लक्ष गेलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. पर्रीकरांच्या शेजारी राहणारे काका काकू देखील या सिनेमाला आले होते आणि त्यांच्या अगदी जवळच बसले होते.

मनोहर पर्रीकरांना घाम फुटला, हातपाय थंड पडले. त्या काका काकूंनी देखील त्यांना पाहिलं होतं. पर्रीकर आणि त्यांचा भाऊ इंटरव्हल सुरु असतानाच थिएटरमधून पळाले. त्यांनी अक्षरशः धूम ठोकली, मागे वळूनही पाहिलं नाही.

मोठी पंचाईत झाली होती. आपण अडल्ट सिनेमा पाहायला गेलो होतो हे काका काकू शंभर टक्के घरी सांगणार आणि आईबाबांना कळल्यावर आपली प्रचंड धुलाई होणार याचा विचार करूनच दोघे प्रचंड घाबरले. चूक तर झाली होती पण हे निस्तरणार कसं हा विचार पर्रीकरांच्या डोक्यात घुमत होता.

अखेर त्यांना एक आयडिया सुचली. स्वतःहूनच आई कडे गेले आणि सांगितलं की

“मी आणि दादा एक सिनेमा बघायला गेलो होतो. पण तो घाणेरडा सिनेमा होता म्हणून आम्ही निम्म्यातून बाहेर पडलो. जाताना आम्हाला शेजारच्या काकू भेटल्या. त्या देखील हा सिनेमा पाहायला आल्या होत्या.”

पर्रीकरांच्या आईने त्यांना थोडं फार रागवलं. तुम्हाला कळत नाही का कसला सिनेमा आहे ते वगैरे वगैरे. पण मार काही पडला नाही. ते चुकून त्या सिनेमाला गेले होते यावर त्यांच्या आईचा विश्वास बसला होता. मनोहर पर्रीकरांची आयडिया उपयोगाला आली.

पण खरी गंमत तर पुढे घडली. दुसऱ्या दिवशी त्या शेजारच्या काकू घरी तक्रार सांगायला येणार त्याच्या आधीच पर्रीकरांच्या आईने त्यांना गाठलं आणि तुम्ही अश्लील सिनेमे पाहायला जाता याबद्दल खरडपट्टी काढली.

स्वतः मनोहर पर्रीकर यांनी एके ठिकाणी दिलखुलासपणे हा किस्सा सांगितला आहे.  

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.