पर्रिकरांनी ठरवलेलं, काहीही झालं तरी लालकृष्ण अडवाणींना पंतप्रधान होऊ द्यायचं नाही

गोष्ट आहे २०११ सालची. लालकृष्ण अडवाणी यांची जनचेतना यात्रा सुरु होती. एकेकाळी रामरथ यात्रा काढून दोन खासदारांच्या भाजपला त्यांनी सत्तेच्या खुर्चीवर त्यांनी नेलं होतं. संधी आली तेव्हा त्याग करून वाजपेयींना पंतप्रधान होण्याची विनंती केली. हाच चमत्कार या जनचेतना यात्रेतून करून २०१४ साली पंतप्रधान होण्याचं स्वप्न त्यांना पूर्ण करायचं होतं.

तेव्हाचे मनमोहन सिंग सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बेजार झालेले होते. एका मागोमाग घोटाळे समोर येत असल्यामुळे त्यांची प्रचंड नाचक्की झाली होती. याचा फायदा उठवून भाजप सहज सत्तेत येणार याची शक्यता दिसत होती. याच लोकभावनेला साद घालण्यासाठी अडवाणी पुन्हा यात्रेसाठी उतरले होते.

जनचेतना यात्रा गोव्यामध्ये पोहचली होती. या यात्रेला कव्हर करण्यासाठी राणा अयुब हि पत्रकार देखील गोव्याला आली होती. ती या जनयात्रेसोबत भारतभर प्रवास करत होती.

अडवाणी गोव्यात ज्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये उतरले होते तिथे त्यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी पत्रकारांना संबोधित केलं आणि प्रवासाने दमलेले असल्यामुळे जास्ती प्रश्नोत्तरे न घेता पत्रकार परिषद विसर्जित केली. इतर स्थानिक पत्रकार गेले, राणा अयुब प्रमाणे दिल्लीहून आलेले पत्रकार तेवढे उरले.

तिचे काही प्रश्ने होते त्यामुळे अडवाणींनी तिला आपल्या स्यूटमध्ये बोलावलं. ती जेव्हा तिथे पोहचली तेव्हा  ते आपली कन्या प्रतिभा अडवाणी, त्यांचे जवळचे सहकारी रविशंकर प्रसाद, अनंत कुमार आणि वेंकैय्या नायडू गप्पा मारत बसले होते.

अडवाणींना राणा अयुब अली आहे हे निरोप देण्यासाठी एक कार्यकर्ता आत गेला. तिचे सहज लक्ष गेले तर तिथे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर देखील अडवाणी आपल्याला बोलावतील म्हणून प्रतीक्षा करत उभे होते. राणा अयुबला धक्काच बसला शिवाय तिला थोडस शरमल्यासारखं झालं. पर्रीकर देखील अवघडले होते. दोघांनी एकमेकांना हॅल्लो म्हटलं आणि वाट बघत उभे राहिले.

इतक्यात आत निरोप घेऊन गेलेला कार्यकर्ता बाहेर आला आणि त्याने राणा अयुबला अडवाणींना भेटण्यासाठी नेलं. मनोहर पर्रीकर तसेच दाराबाहेर उभे राहिले.

राणा अयुब म्हणते त्या दिवशीचा पर्रीकरांचा चेहरा मी कधीच विसरू शकत नाही. ते जरी गोव्याच्या मध्यमवर्गीयांचे हिरो असले, रांगेत उभे राहण्याचा साधेपणा त्यांच्या जवळ असला तरी त्या दिवशी अडवाणींनी त्यांचा तो केलेला अपमान होता आणि स्वाभिमानी पर्रीकर सहाजिकच दुखावले गेले होते.

हे सगळं घडण्यासाठी काही वर्षांपूर्वीची एक घटना कारणीभूत होती.

लालकृष्ण अडवाणी यांची त्याकाळी भाजप वर एकहाती सत्ता होती. २००४ सालच्या पराभवानंतर पक्षाने पंतप्रधानपदाचा उमेदवार अडवाणींनाच केलं होतं. मात्र इतर घटक पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांना आपली कट्टर हिंदुत्वाची इमेज वाजपेयींप्रमाणे  थोडीशी मवाळ करावी लागणार होती. याच नादात ते पाकिस्तान दौऱ्यावर गेले आणि तिथे मोहम्मद अली जिना यांच्या कबरीवर डोके ठेवताना त्यांनाच उल्लेख खरा पुरोगामी असा केला.

यावरून भारतात वादळ उठलं. काँग्रेसने तर टीका केलीच पण भाजपमध्ये देखील अनेकांना हि गोष्ट आवडली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तर त्यांच्यावर उघड टीका केली. अडवाणींनी राजीनामा दिला थोड्या दिवसानंतर पुन्हा परत घेतला. हे सगळं झालं पण सर्वसामान्य भाजप कार्यकर्ता मात्र त्यांच्यापासून थोडासा नाराजच झाला.

याच घटनेच्या पार्श्वभूमीवर २००९ साली मनोहर पर्रीकर आपल्या स्थानिक वर्तमानपत्राच्या मुलाखतीमध्ये अडवाणींची तुलना जुनाट बुरसटलेल्या लोणच्याबरोबर केली. जुन्या नेत्यांनी नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे असही ते म्हणाले.

हि मुलाखत देशपातळीवर गाजली. अडवाणी या उघड टीकेमुळे प्रचंड नाराज झाले.

मनोहर पर्रीकरांनी मला असं म्हणायचं नव्हते, ६५ पेक्षा जास्त वयाच्या नेत्यांनी तरुणांच्या हाती नेतृत्व सोपवले पाहिजे इतकाच माझा मतितार्थ होता हे सांगितलं. पण अडवाणींसोबत त्यांचे संबंध बिघले ते तेव्हा पासून.

वर उल्लेख केलेला पर्रीकरांच्या अडवाणींनी केलेल्या अपमानाला हे सगळे संदर्भ होते.

आता कट टू २०१३

गोव्या मध्ये भाजपच अधिवेशन भरलं होतं. झाडून देशभरातले नेते गोळा झाले होते. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी, रणनीती आखणे हे महत्वाचे निर्णय होणार होते. पण यापेक्षाही भाजपची सत्ता आली तर भावी पंतप्रधान कोण होणार हे ठरणार होतं. अडवाणींचेच एकेकाळचे शिष्य म्हणवले जाणारे मोदी त्यांच्या विरुद्ध उभे राहिले होते.

अडवाणींच्या बाजूने मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग, यशवंत सिन्हा, सुषमा स्वराज, अनंत कुमार असे मोजके नेते होते.

तर मोदींच्या बाजूने तरुण भाजप नेते होते. यात प्रमुख नाव अरुण जेटली, राजनाथ सिंह यांचं तर होतंच मात्र आणखी एक नेता होता जो काहीही करून अडवाणींना पंतप्रधान पदाचा उमेदवार होऊ द्यायचं नाही म्हणून शड्डू ठोकत मोदींच्या पाठीशी उभा होता.

ते होते तेव्हाचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर.

त्यांच्याच राज्यात हे निर्णायक अधिवेशन भरत होतं . आपली सगळी रसद पर्रीकरांनी मोदींच्या मागे उभी केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लाडके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोहर पर्रीकरांनी संघाची ताकद देखील मोदींच्या बाजूने वळवण्यात यश मिळवलं होतं. देशात मोदींबद्दल जनभावना बनत होतीच पण पक्षात त्यांचं वजन वाढवण्यास जेटली आणि पर्रीकर या दोन नेत्यांचा पाठींबा कारणीभूत ठरला.

लालकृष्ण अडवाणींना आपलं भवितव्य कळालं. ते त्या अधिवेशनाला गेलेच नाहीत. एकमुखी मोदींची निवड झाली.

अडवाणींचा अस्त होऊन मोदी युगाचा प्रारंभ झाला.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.