मनोहर पर्रीकरांनी मदत करणाऱ्या मोदींची अवैध बांधकामं उध्वस्त केली होती…

मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रिकर. अर्थात गोयंकरांचो भाई. साधेपणा आणि प्रामाणिकपणा ही पर्रिकरांची पहिली ओळख आणि गोव्याचे आयआयटीयन मुख्यमंत्री अशी त्यांची दुसरी ओळख. आपल्या साधेपणामुळे सहज कधी तरी ते मुख्यमंत्री असताना देखील स्कुटरवरुन जाताना दिसायचे. तर आपल्या प्रामाणिकपणामुळे ते कधी बँकेत कर्जासाठी मुलाखत देखील द्यायला जायचे.

त्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा या गोष्टी केवळ दिखावा नव्हत्या तर त्या त्यांच्या जगण्याचा भाग होत्या.

या सगळ्या दरम्यान पर्रीकरांना निरनिराळ्या मार्गांनी लाच देऊन त्यांची प्रतिमा डागाळण्याचेही अनेक प्रयत्न झाले पण पर्रीकर कशालाच बधले नाहीत.

त्यांच्या प्रामाणिकपणाचा आणि तत्वनिष्ठ राजकारणाचा किस्सा गोवेकर आजही सांगतात.   

मनोहर पर्रीकरांच्या धाकट्या मुलाला एकदा स्ट्रोक्सचा प्रचंड त्रास सुरू झाला. जीव वाचवायचा असेल तर तातडीने मुंबईला न्यायला हवं असं डॉक्टरांनी सांगितलं.

त्यावेळी मोदी नावाच्या एका उद्योगपतीने पर्रिकरांना मदत केली. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये माणूसकीच्या नात्याने मदत करत आहे म्हंटल्यावर पर्रिकरांनी देखील ती मदत स्विकारली. स्पेशल विमानाने मुलाला मुंबईला नेण्यात आलं. मात्र विमानातुन नेताना रुग्णाला स्ट्रेचरवरून न्यायचं असल्यामुळे विमानातील सहा सीटस् काढण्यात आल्या होत्या. ऐनवेळी त्यांचे पैसे मोदींने भरले. पर्रीकरांच्या मुलाचा जीव वाचला.

मात्र या मोदींनी वेगळाच उद्देश डोक्यात ठेवून पर्रिकरांना मदत देवू केली होती.

मोदींचे गोव्याच्या मांडवी नदीत अनेक कॅसिनो आहेत आणि तिथे त्यांनी काही अवैध बांधकामे केली होती. ती बांधकामे पाडण्याचे आदेश पर्रीकरांनी दिले होते. मात्र आता आपल्यामुळे पर्रीकरांच्या मुलाचा जीव वाचला आहे. त्यामुळे हा आदेश ते रद्द करतील अशा खात्रीने मोदी त्यांना पर्रिकरांना भेटायला गेले.

झालं, इकडे कॉंग्रेसला याची कुणकुण लागली आणि आता पर्रीकर जाळ्यात सापडणार असं त्यांना वाटू लागलं. पण झालं उलटंच. पर्रीकरांनी मोदींना स्पष्ट सांगितले की,

एक बाप या नात्याने मी तुमचे आभार मानतो पण मुख्यमंत्री म्हणून मी माझा निर्णय बदलणार नाही.

पर्रिकरांना बेकायदेशीर कामांची चीड तर होतीच. शिवाय अशा माणसाची आपण मदत घेतली याबद्दल त्यांना स्वतःचाच राग आला होता. पण त्या संध्याकाळीच मुख्यमंत्री कार्यालयातुन आदेश सुटले आणि मोदींची सर्व अवैध बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आली. एवढंच नव्हे तर पर्रिकरांनी त्या सहा सीटच्या भाड्याचे पैसे देखील मोदींना देऊन टाकले.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.