भिकू ने गेम फिरा दियेला हैं बोलो या सरदार खानने कह के लेना शुरू किया है बोलो..

सत्या मधला मनोज बाजपायीने केलेला भिकू म्हात्रे मला अजिबात आवडला नव्हता. खूप आक्रस्ताळा अभिनय वाटला होता. त्या आधीच्या `दौड` मध्ये उलट छोट्याश्या भूमिकेत मस्त शोभला होता तो. खरंतर सत्या सुद्धा मला खूप वेगळा असा चित्रपट तेव्हाही वाटला नव्हता.

लोकांनी जणू अर्धसत्य, अर्जुन, अंकुश, कालचक्र, गँगवॉर, दंगा फसाद बघितलेच नव्हते या थाटात सत्या बघितला की काय वाटत होतं. पण मनोज आणि त्याचा भिकू हिट होता हे एका अर्थी बरं सुद्धा म्हणायला हवं. कारण ज्या वेळी सत्या आला त्यावेळी म्हणजे १९९८ मध्ये बॉलिवूड मध्ये अण्णा, अक्षय, अजय देवगण च्या चित्रपटांना तोच तोच पणा येऊन (याच काळात अक्कीचे अनेक फ्लॉप आहेत.) प्रेक्षकही कंटाळले होते.

रामू काहीतरी नवं घेऊन यायचा. आणि त्याच्या चित्रपटातून एखाद्या `प्रशिक्षित` method actor ने गाजावं ही गोष्ट इतर चांगल्या अभिनेत्यांना नक्की हुरूप देणारी होती.

“मनोजच्या लोकप्रियतेमुळे माझ्या आणि इरफानसारख्या लोकांना मग जास्त वाट पहावी लागली नाही. मनोजने जणू आमच्यासाठी दरवाजे उघडले.” – के के मेनन.

सत्या नंतर निदान मुंबईच्या प्रेक्षकांमध्ये मनोजची सॉलिड हवा झाली होती. आणि त्याची पुढची फिल्म आली उर्मिला मातोंडकर बरोबर रामूनेच केलेली `कौन`.

कौन एक लो बजेट आणि त्या काळात नक्कीच प्रायोगिक वाटणारा चित्रपट होता. लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया होत्या. मला तरी चित्रपट, उर्मिला आणि मनोज प्रचंड आवडले होते. मनोजने जरी थोडा शाहरुख टाईप मॅम मॅम करत अभिनय केला असला (दोघेही बॅरी जॉनचे शिष्य) तरी त्याचं पात्र त्याने कौनचं रहस्य आणि ताण वाढेल असं उत्तम वठवलेलं आहे.

मनोजने माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या आणि मी मनातल्या मनात शाबास जवान आगे बढो म्हणत त्याला कौतुकाची थाप दिली. मनोज बाजपायी हा माणूस बहोत गुल खिलायेगा याची खूणगाठ मनाशी बांधून `कौन` दोन तीनदा पाहिला.

त्याच वर्षी मग आला त्याचा मोस्ट अमेझिंग चित्रपट..

 शूल.

रामूने निर्माण केलेला आणि त्याच्याकडे कधी हरकाम्या असणाऱ्या ई निवासला दिग्दर्शनाची संधी देण्यासाठी बनवलेला हा सिनेमा. घिसिपिटी कहाणी असूनही प्रत्येक प्रसंगात खिळवून ठेवणारा शूल हा प्रचंड घणाघाती सिनेमा होता..rather आहे. भ्रष्ट यंत्रणा, तिने निर्माण केलेले बच्चू यादव सारखे नालायक आणि समाजाला वेठीला धरणारे पुंड या विरुद्ध एकाकी लढाई लढणारा समरप्रताप मनोजने ज्या शिद्दतने रंगवला आहे.

सगळीकडून मदत नाकारला गेलेला समर थकून एका बागेतल्या बाकड्यावर बसतो. बाजूला बसलेल्या वृद्ध कॉन्स्टेबलला विचारतो, आप पुलिस मे क्यू भरती हुए?

त्याचं उत्तर ऐकून समर निराश होतो. तत्वासाठी पोलिसाची नोकरी करणारे आपण एकटेच आहोत का? ही लढाई कधी संपेल का? असे अनेक प्रश्न क्षणार्धात समरच्या चेहऱ्यावर तरळतात. क्या बात! दिग्दर्शक लेखकाला अभिप्रेत असलेला अर्थ समजून तो समर्थपणे अभिनयाद्वारे व्यक्त करणं हेच तर एका उत्तम अभिनेत्याचं काम असतं.

शूल गाजला तो सयाजी शिंदे यांच्या बच्चू यादवमुळे पण मनोजचा समरप्रताप मला तरी भयंकर आवडला. It has stayed with me through all these years.

आता मनोज खूप मोठी झेप घेईल असं वाटत असताना त्याचे `दिल पे मत ले यार` आणि `घात` असे दोन वाईट चित्रपट आले. वाईट या करता की शूल ने मनोजला एका हिरोच्या पातळीवर नेलं असताना दिल पे मत ले मधला loser असणारा राम सरण आणि तसाच घात मधला कृष्णा पाटील हे त्याच्या स्टार पदाकडे चालू असलेल्या वाटचालीला अडथळा ठरले.

एक अभिनेता म्हणून मनोजचा निर्णय योग्य असला तरी एक स्टार बनण्याच्या उत्तम संधीला त्याने तिकडे घालवलं. (माझ्यासारखे लोक खास मनोज बाजपायीचा चित्रपट बघायला म्हणून जाणारे होते, आम्हाला मनोज मध्ये नवा नाना पाटेकर दिसत होता कदाचित. या दोन्ही चित्रपटांनी निराशा केली.)

त्या नंतर बच्चन बरोबर त्याचा बहुचर्चित अक्स आला.

मला वाटतं मनोज हा दिग्दर्शकाचा अभिनेता आहे. अक्स हा जॉन वूच्या फेस ऑफ वरून प्रेरित होता. पण वेगळ्याच पातळीवर. आणि त्या काळातला हिंदी सिनेमाचा प्रेक्षक हे असलं काही पाहण्याच्या तयारीत नव्हता. विशेषत: बच्चनची भूमिका. मनोजच्याच नंतरच्या प्रसिद्ध भूमिकेचा डायलॉग म्हणायचा झाला तर पब्लिक थिएटर बाहेर येऊन `ये क्या बवासिर बना दिया हो` म्हणत असे.

पुढच्या वर्षी, २००२ ला आलेल्या `रोड` मध्येही त्याने चाबुकच काम केलेलं. पण मनोजला एक सत्या किंवा गेला बाजार एक शूल हवा होता.

या काळात नेमकं काय झालं माहीत नाही पण तो दिसायचा कमी झाला. २००३ मध्ये आलेल्या उर्मिलाने गाजवलेल्या `पिंजर` मध्येही त्याने सुरेखच काम केलेलं आहे. पण … भिकू म्हात्रे ठंडा पड गयेला हैं असं वाटत होतं. नंतर तो एल ओ सी कारगिल मध्ये, वीर झारा मध्ये दिसला. त्याचं कामही उत्तम होतं पण ज्या शाहरूख बरोबर त्याने संघर्षाच्या काळात दिल्लीत काम केलेलं, त्याच्या बरोबरीचा बनण्याच्या ताकदीचा एकेकाळचा मुंबै का किंग कुठेतरी हरवून गेला होता. जणू ती स्पर्धा त्याने सोडून दिली होती.

माझ्यासाठी मनोज बाजपायी हा विषय संपला होता. इरफान येत होता. के के चमकत होता. चलता हैं. दुनिया हैं.

अनेक वर्ष सरकत राहिली. अजय देवगणने रामू बरोबर चांगले सिनेमे केले. रणबीर कपूर येऊन गाजू लागला होता. नानाने दुसरी खेळी चालू केली होती. आणि या तिघांना घेऊन प्रकाश झा ने केलेला राजनीती आला होता. रणबीर, नाना साठी म्हणून राजनीती टाकला.

महाभारताची रूपक पात्रं असलेल्या या multi starrer मध्ये मनोजला मी तरी बऱ्याच दिवसांनी पहात होतो. दुर्योधनावर बेतलेला वीरेंद्र प्रताप साकार करत होता तो. येणेंप्रमाणे चालू होतं सगळं. मी रणबीरला बघण्यात गुंग. बाकी अजय, मनोज, अर्जुन काही करोत. राजकारणातले शह प्रतिशह चालू असतात. वीरेंद्र प्रतापला जामच डिवचलं जातं. आणि तो एका भाषणाला उभा रहातो.

आपल्याच नादात जंगलात पाला पाचोळा तुडवत चालवताना चमकून समोर पाहावं आणि..एका मोठ्या सोनेरी पिवळ्या धम्मक नागाने शांतपणे आपली नजरबंदी करत त्याचा अप्रतिम देखणा फणा जमिनीपासून हळूहळू वर उभारावा तद्वत वीरेंद्र प्रताप माईक वर करकरीत आवाजात म्हणतो..

“करारा जवाब मिलेगा… करारा जवाब मिलेगा…”

किती अडवाल आणि किती झाकून ठेवाल अस्सल हिऱ्याला?

त्या क्षणापर्यंत इतर कलाकारांच्या गर्दीत असणारा मनोज क्षणार्धात तिकडून एका वेगळ्याच उंचीवर जातो. गेला आणि मग तिकडेच राहिला.

भिकू अपना सजा काट के आयेला था. और अब पहले से भी bad ass babua बन कर आयेला था.

आता कसली चिंता नव्हती. कारण स्टार बनायची चिंता किंवा प्रेशर नव्हतं. ना त्याला ना आम्हाला. आता बस त्याला timing ने खेळायचं होतं.

दोन वर्षांनी तो खेळला.

सरदार खान. गँग्ज ऑफ वासेपूर.

मनोजचं ते हात पाठी बांधून चालणं. नजरेतला खुनशीपणा. बाईला बघून डोळ्यातून काकवी पाडणं. क्या बात! रामाधीर सिंगला मारणं हेच जीवन कर्तव्य असलेला हा सरदार खान.

एका प्रसंगात तो कसम पैदा करने वाले की चित्रपटाचं गाणं लाऊडस्पिकरवर लावून, सिनेमाची जाहिरात करतोय असं भासवत थेट रामधीरच्या गल्लीत जातो. सरदार खान हा माणूस गाणं बजावण या पासून कोसो दूर. त्यामुळे त्या गाण्यावर त्याचे ते विजोड हातवारे, अशा गाण्यावर काहीतरी अभिनय करायचा म्हणून सामान्य भारतीय माणूस कसं विचित्र काही करेल…मनोज अगदी तेच करतो.

गँग्ज जरी नवाझने गाजवला तरी माझ्यासाठी मनोजचा सरदार खान is just iconic. जेव्हा पेट्रोल पंप वर त्याच्यावर गोळीबार होतो तेव्हा चवताळलेल्या वाघासारखा त्याचा अभिनिवेश…Take a bow!

स्पेशल छब्बीस, नाम शबाना, शूट आऊट वडाला मध्ये त्याने रोल्स खणखणीत वाजवले. आता वेब सिरीज, ओटिटी ही नवी माध्यमं त्याला आणि त्याच्या सारख्या गुणी कलावंतांना उपलब्ध झालीयेत. फॅमिली मॅन, सायलेन्स, भोसले मधून तो गाजतोय. देर आये दुरुस्त आये. एके काळी एन एस डी ला चार वेळेला नाकारला गेलेला, बिहारच्या बेलवा नावाच्या खेड्यातून आलेला,सुट्टीत शेतात राबणारा हा पोरगा… आज तीन राष्ट्रीय, चार फिल्मफेअर आणि पद्मश्री पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे.

भिकू ने गेम फिरा दियेला हैं बोलो या सरदार खानने कह के लेना शुरू किया है बोलो.

प्रेक्षकांना मनोजचा उत्तम अभिनय पहायला मिळतोय.

या सगळ्यात एका चित्रपटाचं नाव मी घेतलं नाहीये. कारण किती लोकांना तो चित्रपट आवडेल माहीत नाही. माझ्यासाठी मात्र तो चित्रपट नसून मनोज बाजपायी या माणसाने प्रोफेसर रामचंद्र शिरस या भूमिकेत प्रेक्षकांच्या काळजावर केलेले वार आहेत. त्याचं हळुवार बोलणं, चालणं, गरज नसताना आलेला गिल्ट, एकाकी दुर्बलता.. बास.. अलिगढ एक अनुभव आहे. ज्याला झेपेल त्याने घ्यावा.

मनोज बाजपायी प्रसिद्धी माध्यमांसमोर बुजणारा माणूस आहे. पण त्याच्या एका मुलाखतीत त्याने सांगितलेला किस्सा इकडे लिहितोय. त्याला एक पुरस्कार मिळणार होता म्हणून त्याने आपल्या आईला त्या समारंभाला नेलं होतं. नॉमिनेशन वगैरे सोपस्कार झाल्यानंतर मनोजला पुरस्कार देण्यात आला. मनोज परत आल्यावर त्याची आई म्हणाली,

“देखो बेटा. वो जिनको पुरस्कार नहीं मिला है. उनको बस इसी कारण से कभी कम ना समझना.”

  • गुरुदत्त सोनसूरकर

#HappyBirthdayManojBajpayi

#CinemaGully

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.