भल्या भल्या लिजंड खेळाडूंना जमलं नाही पण तिवारीने राजकारणात आल्या आल्या सिक्सर ठोकला

३ फेब्रुवारी २०२१. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग कृषी बिला विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलकांना पाठींबा देण्यासाठी ट्वीट करतात. त्यानंतर राजकारणी, अभिनेत्यासह मैदान गाजविणाऱ्या सचिन तेंडूलकरसह इतर खेळाडूंनी शेतकरी आंदोलन अंतर्गत प्रश्न असून ते आम्ही सोडवू अशा अविर्भावात ट्वीट करत होते. अमित शहांचे पुत्र जय शहा बीसीसीआय मार्फत हे ट्विट करायला लावत आहेत अशी टीका झाली. यामुळे प्रचंड गदारोळ झाला होता.

यावेळी अचानक क्रिकेटपटू मनोज तिवारीने कोणाचेही नाव न घेता ट्वीट केले.

भारतीय क्रिकेटपटू व सेलिब्रिटींच्या ट्विटला कठपुतळीचा खेळ म्हणत तिवारीने केलेली टीका प्रचंड गाजली. बीसीसीआय व इतर कोणाचेही नाव न घेता त्याने केलेलं ट्विट राजकीयदृष्ट्या महत्वाच मानलं गेलं होतं.

तस बघायला गेलं तर राजकारणात पडलेला मनोज तिवारी हा पहिला क्रिकेटपटू नाही.

भारतीय समाज आणि क्रिकेट वेगळे करता येणार नाही. म्हणूनच तर मैदानातील दादा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन सौरभ गांगुलीला भाजपकडून पश्चिम बंगालच्या निवडणुकीत उतरविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हा प्रयत्न असफल राहिला.

आपल्या कॉमेंट्रिने प्रेक्षकांना सगळ्यांना भुरळ घालणारे भारताचे माजी क्रिकेट खेळाडू नवज्योतसिंग सिद्धू हे सुद्धा सक्रीय राजकारणात आहे. भाजपच्या तिकिटावर अमृतसर मधून निवडून आले होता. त्यांनी यापूर्वी भाजप आणि आता काँग्रेस असा प्रवास केला आहे. त्यांच स्वप्न मुख्यमंत्रीपदाचं होतं पण अजून ते काही पूर्ण झालेलं नाही.

माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडीहे सुद्धा दोन वेळा खासदारकीसाठी उभे राहिले होते. मात्र दोन्ही वेळा त्याचा पराभव झाला आहे. कीर्ती आझाद हे पहिल्यांदा १९९३ मध्ये दिल्लीत विधनासभा जिंकले आणि नंतर दरभंगा येथून खासदार झाले.

भारताचा माजी कॅप्टन मोहम्मद अझरूद्दीन यांनीही राजकारणात आपले किस्मत आजमावले आहे. २००९ मध्ये कॉंग्रेसकडून मोरादाबादची जागा लढविली आणि खासदार झाले. भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज गौतम गंभीर हा सुद्धा राजकारणात असून खासदार म्हणून निवडून आला आहे. क्रिकेट मधून राजकारणात आलेल्यांना अजूनही मोठा पल्ला गाठता आला नाही.

या सगळ्यांनी रिटायरमेंट नंतर राजकारणात उडी मारली. पण मनोज तिवारीची गोष्टच वेगळी आहे. 

मूळचा बंगालमधल्या प्रतापगडचा. बंगालकडून खेळताना त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खोऱ्याने धाव केल्या. पुढचा सौरव गांगुली म्हणून तिथे त्याला छोटा दादा असं ओळखत होते. पण आपल्या धडाकेबाज बॅटीग करण्याच्या पद्धतीवरून वरून त्यांची इंग्लडचा फलंदाज केविन पीटरसनशी तुलना होऊ लागली.

२००६-०७ मध्ये रणजी सामन्यात ७९६ धावा काढत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अगदी गेल्यावर्षी देखील त्याने ट्रिपल सेंच्युरी मारून धमाका उडवून दिला होता.

स्थानिक सामन्यात केलेल्या कामगिरीच्या जोरावर मनोज तिवारीची निवड बांगलादेशला जाणाऱ्या भारतीय संघात झाली.  मात्र दुर्दैवाने पहिल्या सिरीजमध्ये त्याला संधी मिळाली नाही. मात्र ऑस्ट्रलिया दौऱ्यामध्ये त्याला एका मॅचमध्ये खेळवण्यात आलं.

२००८ ते २०१५ मध्ये अनेकवेळा भारतीय संघात मनोज तिवारी आत बाहेर होत राहिला. मात्र, त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये म्हणावी तशी छाप पाडता आली नाही. नाही म्हणायला त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यात घणाघाती नाबाद शतक झळकवलं होतं, तो मॅन ऑफ द मॅच देखील झाला. पण त्यानंतर जखमी झाल्यामुळे त्याला टीमच्या बाहेर बसायला लागलं.

मनोज तिवारी आयपीएलच्या पहिल्या दोन सिजनमध्ये दिल्ली डेअरडेविल्स कडून खेळला, पुढे २०११ ते २०१६ हे सहा वर्ष केकेआरचा मिडल ऑर्डर सांभाळली. तर २०१७मध्ये रायजिंग पुणे सुपरजायंट कडून खेळला आहे. 

इतर खेळाडूपेक्षा मनोज तिवारी वेगळा आहे हे सांगण्यासाठी खाली दिलेलं एकच उदाहरण पुरेसे आहे.

गेल्या वर्षी म्हणजे २०२०  मध्ये ऐन आयपीएलच्या हंगामात भारतात कोरोनाने थैमान घातले. संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. इतर खेळाडू आयपीएलचे सामने कसे होणार अशी चिंता वक्त करत होते. मात्र अशावेळी मनोज तिवारी आयपीएल मधून आपले नाव मागे घेत घरी पायी चालत जाणाऱ्या कामगारांच्या मदतीला धावून गेला होता.

लॉकडाऊन मध्ये मजुरांची झालेली दशा पाहून क्रिकेट ऐवजी राजकारणात आल्याचे मनोज तिवारीने सांगितले. सत्ता असेल तर गरजवंताच्या मदतीला जाणे सोपे असते हे ठावूक असल्यानेच मनोज तिवारीचे पाऊले राजकारणाकडे वळले. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी भाजपकडून मनोज तिवारीला विचारणा झाली.

मात्र, भाजपकडून लॉकडाऊन मध्ये योग्य नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. भाजप दोन धर्मात तेढ वाढविण्याचे काम करते. त्यामुळे मी भाजप मध्ये सामील झालो नसल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले.

मध्यंतरी एका क्रिकेट मॅचच्या अवॉर्ड फ़ंक्शनवेळी त्याची गाठ मुख्यमंत्री ममता दीदींशी पडली होती. त्यांच्या मनात गरिबांबद्दल ममत्व असून तेच त्यांचे भले करू शकतात असे सांगत मनोज तिवारीने तृणमूल कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. इतकेच नाही तर यंदाची विधानसभा निवडणूक देखील भाजप हरवत खिशात टाकली. 

सोमवार झालेल्या शपथविधीच्या सोहळ्यात मनोज तिवारीने राज्यमंत्र्याची शपथ घेतली त्यांना क्रीडा खात्याचा मंत्री पद दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच मनोज तिवारीचा एकेकाळी भारतीय संघात सहकारी राहिला अशोक दिंडा भाजपकडून निवडून आला आहे. दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

जे भल्या भल्या लिजण्डरी खेळाडूंना जमलं नाही ते मनोज तिवारीने अवघ्या ३५ व्या वर्षी करून दाखवलंय. आता मंत्रिपद मिळाल्यामुळे त्याच्या वरची जबादारी तितकीच वाढली आहे हे मात्र खरं.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.