बिहार के लाला मनोज तिवारी दिल्लीचा मुख्यमंत्री बनेल काय?

देश की धडकन राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुका आल्या आहेत. सगळ्या देशाचं लक्ष लागलंय, प्रचाराच वातावरण तापलंय. सध्या तरी तिथली लढाई दुरंगीच दिसत आहे. एकेकाळी कॉंग्रेसचा हा बालेकिल्ला आता पूर्णपणे ढासळून गेलाय. त्यांचा प्रचार तरी सुरु आहे का कळायला मार्ग नाही.

त्या मानाने आपचा झाडू सध्या तरी फुल स्विंग मध्ये फिरताना दिसतोय. केजरीवाल यांच्या फ्री वाल्या योजना आणि घराची घंटी दाबत असलेला व्हिडीओची आपण येथेच्छ चेष्टा उडवली पण केजरीवालजी ना फुल कॉन्फिडन्स आहे की ते परत सत्तेत येतील. अशीच चेष्टा आणखी एका व्यक्तीची सुरु आहे.

भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी.

मनोज तिवारी मुळचे बिहारचे. जन्म झाला बनारस उत्तरप्रदेशमध्ये. शिक्षण घेतल पीई टीचर बनण्याच आणि बनला भोजपुरी सिनेमात सिंगर. नुसता सिंगर नाही तर अभिनय पण करू लागला. बघता बघता तिथला सुपरस्टार रॉकस्टार बनला. एक काळ असा होता रवी किशन आणि मनोज तिवारी बॉलीवूड स्टार्स पेक्षाही जास्त मानधन भोजपुरी सिनेमातून कमवत होते.

“रिंकीया के पापा ही ही हास देलें “

असली मस्तमौला गाणी, ससुरा बडा पैसावाला, दरोगा बाबू आय लव्ह यु, देहाती बाबू असे सिनेमे तुफान गाजले. मनोज तिवारी आणि रवी किशनने भोजपुरी सिनेमाला एवढ्या उंचीवर नेऊन बसवले.

ही लोकप्रियता बघून महानायक अमिताभ बच्चनने त्यांच्या सोबत चक्क गंगा या भोजपुरी सिनेमात काम केले. 

मनोज तिवारीची लोकप्रियता त्याला राजकारणात खेचून नेली नसती तर विशेष. आपल्या पैकी अनेकांना धक्का बसेल पण त्याने राजकारणाची सुरवात मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाकडून केली होती. पहिली निवडणूक लढवली ती ही गोरखपूरला योगी आदित्यनाथ यांच्या विरुद्ध. तिथेच त्याची एन्ट्री गंडली. योगीजीनी त्याची आपल्या बालेकिल्ल्यात धूळधाण उडवली.

मग गडी बिग बॉसमध्ये गेला. तिथे डॉली बिंद्रा बरोबर त्याचा झालेला पंगा राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला होता. काही जण म्हणतात की याच बिग बॉसमुळे मनोज तिवारीचा आपल्या बायकोशी डिव्होर्स झाला.

मनोज तिवारीच व्यक्तिमत्व त्याच्या गाण्याप्रमाणे हलकफुलकं आहे. 

असा हा भोळा भाबडा गडी अतिहुशार लोकांच्या बीजेपीमध्ये आला. लाटेच्या आधी तिची दिशा ओळखण्याचा आयुष्यातला एकमेव चापटरपणा मनोजभाऊनी त्या दिवशी केला असेल. शत्रुघ्न सिन्हानी त्याला भाजपमध्ये आणलं, ते पक्ष सोडून गेले पण तिवारी साहेब खुंटा गाडून उभे राहिले.

दिल्ली लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आला. त्यातही एकदा शीला दीक्षित यांच्या सारख्या तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मोठ्या नेत्याला पाडून.

कोणतेही राजकीय बॅकग्राउंड नसलेला गरीब घरातून आलेला मनोज तिवारी आता भाजपसारख्या कॉर्पोरेट कल्चर असलेल्या मोठ्या पक्षाचा दिल्लीचा प्रदेशाध्यक्ष बनतो. निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातात. जिंकले तर मुख्यमंत्री मनोज तिवारी होतील याचीच जास्त शक्यता आहे. भारतीय राजकारणाच्या दृष्टीने हे चित्र आश्वासक आहे.

पण सध्या माध्यमामध्ये तिवारींची इमेज एक जोकरप्रमाणे बनलेली आहे. त्यामागे देखील एक कारण आहे.

खर तर मनोज तिवारी यांचे जे कोणी मुलाखत घेत आहेत ते त्यांच्या प्रेमात पडतात. एक तर हा माणूस इतर नेत्यांप्रमाणे फक्त निवडक चॅनलला मुलाखत देत नाही. आपल्या विरोधातल्या चॅनलशी देखील बिनधास्त बोलतो. इंग्लिश येत नाही तर ते खुलेआम निरागसपणे मान्य करतो. हळूच एखाद्या शब्दाचा अर्थ विचारतो.

मुलाखत घेणारा आपली किती खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करू दे हा बिचारा त्याला आप मुझे बहुत अच्छे लगे याची कबुली देतो.

अरविंद केजरीवाल ला थेट धूर्त माणूस म्हणतो पण मनिष सिसोदिया मन का सच्चा आदमी है अस पण सांगून टाकतो.

कधी आपल्याच पक्षातल्या काही चुका अभावितपणे मान्य देखील करून जातो. अनुराग ठाकूरच्या सभेत देश के गद्दरो को गोली मारो सालोंको सारखी घोषणा दिली गेली याचा निषेध करण्याच धाडस मनोज भैय्याने दाखवलं. भाजपमध्ये हे नवीन आहे.

आता राजकीय धुळवड उडाली की अंगावर शिंतोडे उडणारच. अशाच मुलाखतीमध्ये मनोज भाऊला बीजेपीच्या धोरणांना वाचवावं लागतं. एकतर बिचाऱ्याचा अभ्यास जास्त नाही आणि मग अशात काही तरी शब्द इकडे तिकडे निसटून जातात पण तेच नेमके शब्द युट्युबवर फिरवून फिरवून दाखवले जातात आणि तो चेष्टेचा विषय ठरतो.

अशा या छक्केपंजे ठाऊक नसलेल्या माणसाला भाजपसारख्या धूर्त पक्षाने दिल्लीची कमान देण्यामागे कारण काय हा प्रश्न अनेक जण विचारत आहेत? 

भाजपमध्ये अनेक मोठे जुने जाणते संघाशी संबंध असलेले नेते आहेत जे सुषमा स्वराज, अरुण जेटली यांचा वारसा दिल्लीमध्ये चालवू शकतात. पण त्यांना यावेळी आपला पराभव होईल अस वाटतय. म्हणूनच ते पराभवाची जबाबदारी आपल्यावर पडू नये मनोज तिवारीला बळीचा बकरा बनवत आहेत अस मत विश्लेषकांनी व्यक्त केलंय.

एवढे असूनही जर मनोज भाऊनी दिल्लीचा विजय ओढून आणला तर तो मात्र एक चमत्कार असेल. युपी बिहारमध्ये आजही त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्याची कमी नाही.

मनोज तिवारीकडे धूर्तपणा हा गुण नसला तरी खास बिहारी चिवटपणा हा गुण नक्कीच आहे. याच उदाहरण एका प्रसंगातून देता येईल.

पटनामध्ये गग्ज ऑफ वासेपुरच्या गाण्याच रेकोर्डिंग सुरु होतं. अनुराग कश्यप दिग्दर्शक, वरुण ग्रोव्हर गीतकार तर स्नेहा खानवलकर सारखी मॉडर्ण नव्या अभिरुचीची  मुलगी संगीतकार होती. एका खास वैचारिक वर्तुळातील म्हणून फेमस असणारी ही मंडळी. मात्र एका विशिष्ट गाण्यासाठी त्यांची गाडी अडली. शेवटचा पर्याय म्हणून मनोज तिवारीना बोलवण्यात आलं.

गाण होतं,”जिया हो बिहार के लाला”

बिहारला आजही देशातील सर्वात मागासलेला भाग म्हणून ओळखतात. कित्येक जण आजही काबाडकष्टवाल जीवन जगत आहेत. मात्र तरीही तिथला भोळा भाबडा बिहारी भैया कसा हसत हसत गाणी गात जगतोय, संकटाला सामोरे जातोय त्या बद्दल हे गाणं आहे.

मनोज भाऊला गाता गाता हे गाणं एवढ आवडल की ते अचानक ट्रान्स मध्ये निघून गेले.

आजुबाजूला काय चाललंय याच भान विसरून फक्त गात सुटले गात सुटले. फायंनल टेक होऊन तब्बल तासभर झाला होता तरी मनोज तिवारी न थांबता गात होता आणि पूर्ण स्टुडियो नाचत होता. शेवटी त्याची समाधी तुटली व तो बाहेर आला. बाहेर आल्या आल्या अनुराग कश्यपने त्याला घट्ट मिठी मारली.

मनोज तिवारीला कोणी भोळसट म्हणो कोणी जोकर म्हणो की बळीचा बकरा. तो दिल्लीचा सीएम बनेल अगर ना बनेल पण अस्सल बिहारी लाला तो शेवटपर्यंत राहील हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.