या ठिकाणावरून सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुण्याचा पैसा मोजण्यास सुरवात केली जाते

आंबा या गावापासून विशाळगडाच्या रस्त्यावर तीन कि.मी. अंतरावरील मानोली गाव पर्यटन स्थळ म्हणून सुप्रसिद्ध आहे. इथला मुसळधार पाऊस आणि उन्हाळ्यातील गारवा पर्यटकांना आकर्षित करतो. मानोलीच्या पूर्व दिशेच्या पाच कि.मी. अंतरावरील डोंगररांगेत असणारा ट्रिग पॉइंट असाच वैशिष्ट्यपूर्ण आहे.

आधुनिक काळातील पश्चिम महाराष्ट्राच्या जमीन मोजणीची (सर्व्हेक्षणाची) सुरुवात या ठिकाणी २५ डिसेंबर १८४२ रोजी झाल्याने हे ठिकाण पुणे विभागातील महसूल खात्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, पश्चिम महाराष्ट्राचे मानबिंदू ठरावे असे आहे.

ब्रिटिशांनी १० एप्रिल १८०२ रोजी भारताच्या त्रिकोनमितीय सर्वेक्षणाला सुरुवात केली.

सन १८०० मध्ये झालेल्या म्हैसुर विजयानंतर ब्रिटिशांचा लेफ्टनंट विलियम लॅम्बटन यांनी भारतातील भू-भागाचे अचूक सर्व्हेक्षण करण्याची आवश्यकता ब्रिटिश प्रशासनाकडे कळवली. प्रारंभी केवळ म्हैसूर राज्यासाठी आणि त्यानंतर संपूर्ण भारतभर हे शास्त्रशुध्द सर्व्हेक्षण गेले.

भारतामध्ये ब्रिटिशांनी केलेली जमीनीची मोजणी ही, काही पहिल्यांदाच होत नव्हती. प्राचीन काळात भारतामध्ये मौर्यांनी जमीन मोजणी आणि नोंदणीसाठी रज्जुक नावाचे नवीन अधिकारीपद सुरु केले. तर, शेरशहा सूरी याने १५४०-१५४५ या कालखंडात जमीन मोजणी, मालकी आणि कररचना यामध्ये महत्त्वाचे बदल करून शेतजमिनीचे गल्ला, नस्क आणि नगदी यामध्ये विभाजन केले.

पुढे मुघल बादशहा अकबर याने आपला मंत्री तोरडमल याच्या सहाय्याने जमीन मोजणीत अनेक सुधारणा केल्या.

तोरडमलाने जमीन मोजणीसाठी काठी आणि साखळीचा वापर करुन क्षेत्रफळासाठी बिघा हे परिमाण ठरवले. महसूलासाठी त्याने जमिनदारी आणि रयतवारी या दोन पध्दती स्वीकरुन सुपीकतेनुसार पोलज, पडौती, चाचर आणि बंजर यामध्ये जमिनीची प्रतवारी केली. जमीन मोजणीसाठी बितकची तर, नोंदणीसाठी पटवारी ही नवी पदे निर्माण केली. अहमदनगर निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याने १६०५ ते १७२६ या कालखंडात अकबराच्या जमीन मोजणीची पध्दत कायम ठेवली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या जमीन मोजणीत आमूलाग्र बदल केले.

५ हात व ५ मुठ लांबीची शिवशाही काठी त्यांनी जमीनीचे मोजमाप करण्याचे एकक ठरवले. मिरास, वतन व इनाम हे मराठा इतिहासाच्या महसूलासंबधीचे शब्द याच काळात प्रचिलीत झाले. जमीनीचा पोत पिकांचे उत्पादन पाहून शिवराय कर निर्धारित करत असत.

या पध्दतीला कमालधारा असे म्हटले जाई.कमलाधारा पध्दत रयतेच्या दृष्टीने कल्याणकारी महसूल पध्दती होती.

ब्रिटिशांनी आरंभलेल्या त्रिकोतमितीय सर्वेक्षणात दोन ठिकाणांना जोडणार्या एका आधाररेषेवरुन (बेस लाईन) तिसऱ्या ठिकाणाकडे होणारे कोन मोजले जात आणि त्यांची स्थाननिश्चिती केली जात असे.

या प्रकल्पाच्या सुरुवातीची आधाररेषा मद्रासजवळील सेंट थॉमस माऊंट आणि पेरुमबक्कम यातील १२ किमी लांबीची रेषा होती. ही आधाररेषा अतिशय काळजीपूर्वक आणि अचूकपणे मोजली गेली. दुसरी आधाररेषा बेंगलोर येथे १८०४ मध्ये लेफ्टनंट वॉरन यांनी निर्धारित केली.

१८०६ कोईमतूर, १८०८ तजांवर, १८०९ तिनवेल्ली, १८२२ हैद्राबाद येथपर्यंत ही रेषा पुढे वाढविण्यात आली.

दुसरीकडून दक्षिण- पश्चिम बाजूने ॲड्र्यू स्कॉट वॉ यांनी १८६१ पर्यंत गोव्यापासून ते कराचीपर्यंत हे सर्व्हेक्षण पूर्ण केले.

इस १८०० सुरु झालेले हे सर्व्हेक्षण जगातील सर्वात मोठे सर्व्हेक्षण समजले जाते. या सर्व्हेक्षणामूळे भारताचे अक्षांश-रेखांश, समुद्रसपाटीपासूनची उंची, भौगोलिक रचना, नदी-नाले इत्यादींची अचूक नोंदणी करण्यात आली. भारतातील संपूर्ण सर्व्हेक्षणाला ५०ते ६० वर्षांचा कालावधी लागला. भौगोलिक सर्व्हेक्षणाच्या सोबत खगोलीय सर्व्हेक्षण करताना असंख्य क्लिष्ट आणि गुंतागुंतीची गणितीय समिकरणे वापरुन अचूक माहिती नोंदविण्यात आली.

नोंदविलेल्या प्रत्येक जागेची समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यासाठी कमीत कमी २०० खगोलीय निरिक्षणे करण्यात आली तर, एकूण प्रकल्पात ९२३० निरिक्षणांचा समावेश केला गेला.

याच कालखंडात गुंटर नावच्या अधिकाऱ्याने शंकुसाखळीद्वारे भारतातील शेतजमीनीची मोजणी केली. ही शंकुसाखळी ३३ फुट लांब आणि १६ भागत विभागली गेली या प्रत्येक विभागाला आणा असे संबोधले गेले. तर, गुंटर यांच्या नावावरुनच जमीन मोजणीत गुंठा हे एकक वापरण्यात आले. अशा, ४० गुठ्यांचा एक एकर समजण्यात आला.

ब्रिटिश काळात जमिनीचा महसूल सर्वप्रथम सन १८२७ साली पुण्याजवळील इंदापूर-भिगवण येथील सहाय्यक जिल्हाधिकारी प्रिंगले याने ठरविला.

भारतामध्ये लेफ्टनंट लॅम्बटन यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प आकारास आला. त्यांनी या सर्व्हेक्षणास ‘द ग्रेट ट्रीग्रोमेट्रीक सर्व्हे ऑफ इंडिया’ असे नाव दिले. पृथ्वी परिघाच्या वक्रतेची लांबी आणि त्याचा कंस मापून पृथ्वीचा आकार जाणण्यासाठी लॅम्बटन याने केलेल्या खटाटोपासाठी त्यांना १२२० किमीचा प्रवास पायी करावा लागला शेवटी, अतिश्रमामूळे हिंगणघाट येथे त्याचे १८२३ साली निधन झाले.

लॅम्बटन यांच्यानंतर जॉर्ज एवरेस्ट यांनी या प्रकल्पाचा कार्यभार १८६३ पर्यंत सांभाळला. त्यांनी सर्व्हेक्षण उपकरणांमध्ये बदल करुन त्यामध्ये अचूकता आणली.

यामूळेच एवरेस्ट कन्याकुमारी ते हिमालयापर्यंत असलेल्या पृथ्वीच्या परिघाचा कंस ११.५ डिग्री असल्याचे नोंदवू शकले. एवरेस्टट यांच्या कार्याचे स्मरण म्हणून जगातील सर्वोच्च शिखराला एवरेस्ट असे नाव १८६५ मध्येच देण्यात आले. नैनसिंह रावत आणि राधानाथ सिकंदर या भारतीयांनीही या प्रकल्पात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.

जलप्रलय – महापूर, साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव असताना डोंगरदऱ्यातून कन्याकुमारी ते हिमालयापर्यंत हजारो भारतीय सर्व्हेक्षकानी सर्व्हेक्षण केले. एकदा मलेरियाच्या साथीने सर्व्हेक्षकांच्या समूहाचा अंत झाला. तर, हिस्त्र श्वापदांपासून अनेकांना आपला जीव गमावला. या सर्व्हेक्षणामध्ये एखाद्या युध्दापेक्षा अधिक जिवीत आणि वित्त हानी झाली.

ब्रिटिशांनी आपली वसाहतवादी धोरणे राबवण्यासाठी हे सर्व्हेक्षण केले असले तरी, संपूर्ण भारताचे मानचित्र, देशाची समृध्दता अचूकतेने शास्त्रीय पद्धतीने अधोरेखित झाले हेच या सर्व्हेक्षणाचे ऐतिहासिक महत्त्व आहे.

१८४२ मध्ये जेव्हा स्कॉट कोकणातून सर्व्हेक्षण करत आंबा घाट पार करून आला तेव्हा, त्रिमितबिंदू निश्चित होईना.

दगिरी, विशाळगड, कासार्डे अशा अनेक ठिकाणी चाचपणी करुन अखेर, स्थानिकांच्या मदतीने मानोली येथे हा बिंदू निर्धारित केला गेला.

मानोली येथील त्रिमितबिंदूमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांची स्थाननिश्चिती झाली.

पुढे याच आधारावर कराचीपर्यंत जमीन मोजणी करण्यात आली. सन १८४२ साली ख्रिसमस सण साजरा करुन स्कॉट या अधिकाऱ्याने डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मानोली येथून नव्या कामाची सुरुवात केली. या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात महसूल विभागाच्या वतीने या वारसास्थळावर पांढरा ध्वज फडकवला जातो.

132743424 3618174784938419 6831380904299068034 n

मानोली येथील त्रिमितबिंदू हे वारसास्थळ आहे. मानोलीमधील भूमापनाच्या प्रारंभाचे स्मरण करताना, नैसर्गिक अधिवास अबाधित राखुन या वारसास्थळाचे संवर्धन करुन नव्या पिढीला याचे महत्त्व समजावण्याचा संकल्प करणे आवश्यक वाटते.

  • सुहास नाईक

       9765176869

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.