पाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता

जुनी अमूलची जाहिरात आठवते? गुजरातचे काठियावाडी गाव. बाप्ये म्हैशीच दूध काढत आहेत , लाल रंगेबेरंगी कपड्यातील शेतकरी बायका डोक्यावर दुधाचे हांडे घेऊन निघाल्या आहेत. त्यात दूध घुसळणारी सावळी भेदक डोळ्यांची स्मिता पाटील दिसते. मागे गाण्याचे शब्द कानावर पडत असतात.

मेरो गाम काठा पारे जहाँ दूध की नदियाँ बाहे जहाँ

कोयल कू कू गाये म्हारे घर अंगना न भूलो ना

या गाण्याने अमूलची दुध क्रांती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचली. अमूल देशाचा ब्रँड बनला. हे गाणं होतं १९७६ साली आलेल्या मंथन या सिनेमामधलं.

मंथन हा सिनेमाचं बनवला होता पाच लाख शेतकऱ्यांनी.

निम्म्याहून अधिक गुजरात दुष्काळी आहे. लहरी पावसावर अवलंबून असलेली शेती. रणरणत्या वाळवंटात पशुधन हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन. इंग्रजांच्या काळात पॉल्सन नावाची कंपनी इथून दूध गोळा करून मुंबईला विकायची. कंपनी या दुधाच्या पैशाने बक्कळ श्रीमंत झाली पण दुष्काळी शेतकरी फाटकाच राहिला.

स्वातंत्र्यलढ्याचे आंदोलन तेव्हा पेटलं होतं. अशातच त्रिभुवनदास पटेल नावाच्या काँग्रेस कार्यकर्त्याला शेतकऱ्यांचं हे दुःख जाणवलं. त्याने या शेतकऱ्यांची वल्लभभाई पटेलांना भेट घालून दिली. यातूनच कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना केली. आपल्या भागातील दूध आपण विकायचं, इंग्रजी कंपनीला फायदा मिळवू द्यायचा नाही या कल्पनेतून खेडा जिल्ह्यात ही सहकारी संस्था अस्तित्वात आली.

हि सहकारी संस्थांची लाट गुजरातच्या खेड्यापाड्यात पोहचली. प्रत्येक डेअरी उभ्या राहिल्या. प्रत्येक जिल्ह्यात दूध संस्था सुरु झाल्या.

इ.स. १९४६ रोजी के.डी.सी.एम.पी.यू.एल.चे नाव बदलून “आणंद मिल्क युनियन लिमिटेड”  करण्यात आले. ज्यालाच आपण अमूल म्हणून ओळखतो.

ब्रिटिशांनी विरोध केला मात्र स्वातंत्र्यानंतर या चळवळीला बळ मिळत गेले.

१९५० साली एका केरळी संशोधकाला केंद्र सरकारने आनंदला पाठवले. गुजरातच्या दूध उत्पादनाचे प्रमाण कसे वाढवता येईल याचे प्रयत्न तो तरुण करणार होता. न्यूझीलंडमधून प्रशिक्षण घेऊन आलेल्या या संशोधकाचे नाव म्हणजे व्हर्गीज कुरियन.

त्रिभुवनदास पटेलांनी व्हर्गीज कुरियन यांची क्षमता ओळखली. त्यांना आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन के.डी.सी.एम.पी.यू.एल.मध्ये काम करण्यास तयार केलं.

जोषात नव्या संस्थेचे काम सुरू झाले. त्यांनी स्थानिकांना रास्त भाव देत, गावोगावी फिरून लोकांना संस्थेत भागीदारी देऊ केली. त्यामुळे लोकांना दुधाच्या दर्जाप्रमाणे भाव तर मिळू लागलाच पण संस्थेच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होता आले. आता सर्वसामान्य विशेषतः महिला वर्ग ’आपली डेअरी’ म्हणून अमूलकडे पाहू लागले.

सहकारी चळवळीचे नेतृत्व त्रिभुवनदास पटेल यांचे तर प्रशासकीय व्यवस्थापक कुरियन अशी अफलातून जोडी जमली. या जोडगोळीने खेडा जिल्ह्याचं रुपडं पालटलं एवढंच नव्हे तर देशाच्या दुग्ध उत्पादनाला एक नवीन दिशा दिली.

अमूलमुळे देशात दुग्ध क्रांतीचा पाया रचला गेला. हे फक्त पटेल किंवा कुरियन यांचं यश नव्हतं तर तिथल्या दुष्काळी शेतकरी पुरुष महिला यांचा सिंहाचा वाटा होता. हि यशोगाथा जगाला कळावी अशीच कुरियन यांची इच्छा होती.

तेव्हा अमूलच्या जाहिरातीच्या निमित्ताने त्यांचा श्याम बेनेगल या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाशी संपर्क आला होता. त्यांनी बेनेगल यांना अमूलवर सिनेमा बनवणार का हे विचारले. श्याम बेनेगल यांना देखील ही कल्पना आवडली. पण सिनेमा बनवण्यासाठी पैसे कुठून आणायचे हा सर्वात मोठा प्रश्न होता.

श्याम बेनेगल यांनी सांगितलं,

“आपण झोळी घेऊन शेतकऱ्यांकडे जाऊ. तुमची कथा सांगणार आहे त्याचा सिनेमा बनवण्यासाठी २ रुपये द्या असं सांगू.”

खरोखर गुजरातच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपापल्या गावातलय डेअरीमध्ये २-२ रुपये गोळा करून कुरियन यांच्याकडे दिले. शेतकऱ्यांच्या पैशानी बनत असलेला हा भारतातला पहिलाच सिनेमा होता. श्याम बेनेगल यांनी सुप्रसिद्ध मराठी लेखक तेंडुलकर यांच्याकडून सिनेमाची स्क्रिप्ट लिहून घेतली. कैफी आझमी यांनी डायलॉग लिहिले.

फक्त अमूलची स्टोरी नाही तर तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाच्या क्रांतीमागे आलेले अडथळे, झालेले आर्थिक बदल, तिथल्या दलित उच्च्वर्णीय यामध्ये झालेली सामाजिक घुसळण या सगळ्या गोष्टी बेनेगल यांनी सिनेमात दाखवल्या.

स्मिता पाटील, गिरीश कर्नाड, नसिरुद्दीन शाह, मोहन आगाशे, अनंत नाग, अमरीश पुरी,  कुलभूषण खरबंदा अशा अभिनेत्यांनी या सिनेमात जीव तोडून काम केलं. श्याम बेनेगल आणि विजय तेंडुलकर यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. भारत तर्फे मंथन ऑस्कर साठी पाठवण्यात आला. वनराज भाटियांनी संगीत दिलेलं मेरो गाम काठा पारे गाणं तर अजूनही अमूलची ओळख आहे.

खरंतर श्याम बेनेगल आणि हि कलाकार मंडळी समांतर सिनेमासाठी ओळखली जायची. पण मंथन हा सिनेमा त्यांना कमर्शियली यश देखील मिळवून दिला. गुजरातमध्ये खेड्यापाड्यातील लोक बैलगाड्या भरून हा सिनेमा पाहण्यासाठी येत होते. हा त्यांचा सिनेमा होता, त्यांची गोष्ट होती.

फक्त दोन आठवड्यात या सिनेमाचा सगळं खर्च भरून निघाला. याच्या बॉक्सऑफिस जेवढा नफा कमवला तो शेतकऱ्यांमध्ये वाटून टाकण्यात आला.

आजही युट्युब वर अमूलने हा सिनेमा निशुल्क उपलब्ध करून दिलेला आहे. या सिनेमाच्या सुरवातीलाच पाटी येते,

5,00,000 FARMERS OF GUJARAT PRESENT

MANTHAN

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.