या गे राजानं आपला राजवाडा समलैंगिक लोकांसाठी खुला केला होता
जग बदलतं तशा त्याच्या परंपरा पण बदलत जातात. कोणतीच गोष्ट कायम म्हणून तशीच राहत नाही.
आता राजपीपला या राज्य- संस्थानाचं उदाहरण घ्या. भारत देशातल्या स्थानिक लोकांनी गुजरातेत स्थापन केलेलं मोठं संस्थान. गुजरातमधलं हे एक देशी संस्थान होतं जिथं गोहिल राजवंशाच्या लोकांनी ६०० हुन जास्त वर्षे शासन केलं.
पण आता इथं एक नवी सुरुवात होते आहे. मानवेंद्र गोहिल हे राजपीपलाच्या गोहिल राजवंशाच्या घराण्यातील सध्याचे वंशज आपल्या राजवाड्यात LGBTQA समलैंगिक समुदायासाठी एक कम्युनिटी हाऊस बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
या राज्याच्या मागे प्रचंड मोठा वारसा आहे. राज्याच्या सभोवती सतत मोठमोठ्या शत्रूंचा वेढा असायचा, पण हे राज्य कुणाच्याच ताब्यात आलं नाही. १३४० ला हे शासन सुरु झालं ते भारत स्वतंत्र होईपर्यंत १९४८ साली १० जून ला भारतीय संघराज्यात त्याचा विलय करण्यात आला.
राजपीपलाच्या गोहिल राजवंशाच्या लोकांनी मध्ययुगात अहमदाबादचा सुल्तान, मुगल सत्ता, बडोद्याचे गायकवाड आणि इतकंच नाही तर ब्रिटिश शासनाशीही झुंज दिली.
या संस्थानाला असा भलामोठा इतिहास आहे. तिथेच आता LGBTQA समलैंगिक समुदायासाठी एक कम्युनिटी हाऊस उभे राहत आहे.
Lesbian Gay Bisexual Trans Queer Allies या अद्याक्षरांच्या पासून बनलेली एक व्याख्या आहे. समलैंगिक समुदायामधील लोकांच्या लैंगिक ओळखी वेगवेगळ्या असतात. त्यामुळं पुरुष आणि स्त्री सोडून इतर ६० हुन अधिक प्रकारचे लिंगभाव माणसांमध्ये असतात. ही प्रक्रिया निसर्गाकडून येणारी असते.
६ सप्टेंबर २०१८ रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं ही गोष्ट मान्य केली होती. त्यानुसार या लोकांची माफी मागत समलैंगिकता हा गुन्हा ठरवणारं भारतीय दंडविधानातील ३७७ हे कलम देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवलं होतं.
राजपीपलाच्या गोहिल राजवंशाच्या लोकांनी आपल्या संस्थानात एक प्रचंड मोठा राजवाडा बनवला आहे. हा वाडा विंड्सर कासल (व़िन्ज़र् खास्ल्) या इंग्लंडच्या बर्कशायर काउंटीमध्ये महारानी एलिज़ाबेथच्या किल्ल्याच्या हुबेहूब स्वरूपात बनवलेला आहे.
लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसप्रमाणे या किल्ल्यालाही महत्त्व आहे. त्यामुळे राजपीपलाच्या गोहिल राजवंशाच्या लोकांनी हा किल्ला प्रचंड संपत्ती खर्चून बनवला होता.
हनुमंतेश्वर भागात १५ एकरांमध्ये हा राजवाडा उभारलेला आहे. नर्मदा नदीच्या किनारी सन १९२७ मध्ये राजे महाराजा विजयसिंग गोहिल यांनी हा बनवून घेतला होता. महाराजा विजयसिंग गोहिल हे राजे मानवेंद्र गोहिल यांचे पणजोबा आहेत. काळाच्या ओघात नर्मदेच्या पुराने या जागेचं मोठं नुकसान झालं होतं.
भारताचा व्हॉईसरॉय लॉर्ड वेलिंग्टन हा बराच काळ या राजवाड्यात राहिला होता. या जागी हनुमानाने अवतार घेता होता अशी स्थानिक लोकांची श्रद्धा असल्याने या जागेला फार महत्त्व आहे.
इथेच समलैंगिक समुदायासाठी एक कम्युनिटी हाऊस बनवण्याची मानवेंद्र गोहिल यांची संकल्पना आहे.
भारतात समलैंगिक समुदायाकडे याहूनही संशयास्पद दृष्टीने बघितलं जातं. त्यामुळे या लोकांच्या राहण्याची व निराश्रित लोकांच्या रक्षणाची सोय येथून करता येईल असा त्यांचा प्रयत्न आहे.
काही वर्षांपूर्वी संस्थानाचे राजे मानवेंद्र गोहिल यांनी आपण समलैंगिकअसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे राजपीपलाच्या गोहिल राजवंशाच्या लोकांनी याविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच संस्थानाचे राजे मानवेंद्र गोहिल याना राजघराण्याच्या वारसा हक्कातून वगळण्याचाही प्रयत्न झाला होता.
राजे मानवेंद्र गोहिल हा राजवाडा पुन्हा दुरुस्त करून काही नव्या इमारती बांधून येथे नवीन कम्युनिटी हाऊस बांधू इच्छितात. जेव्हा राजे मानवेंद्र गोहिल यांनी आपण समलैगिक असण्याची घोषणा केली होती तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना हि जागा भेट म्हणून दिली.
इतकंच नाही तर या जागी समलैगिक लोकांसाठी कम्युनिटी हाऊस बांधण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजनही त्यांनीच केले. हनुमान मंदिरातील पुजाऱ्यांनी हा विधी संपन्न केला होता.
या जागी अनेकविध कार्यक्रम झाले आहेत. त्याला बॉलिवूडमधील कलाकार, नेते, सरकारी अधिकारी, विद्यार्थ्यांच्या समूहांनीही हजेरी लावली होती.
जेव्हा राजे मानवेंद्र गोहिल यांनी आपण समलैगिक असण्याची घोषणा केली होती तेव्हा त्यांना स्वतःला भेदभावाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या घरातील लोकांनी त्यांच्याशी बोलणे सोडून दिले होते. तसेच राजघराण्यातूनही त्यांना हद्दपार केलं गेलं होतं.
पण नंतरच्या काळात त्यांच्या आईवडिलांना आपल्या चुकीची जाणीव झाली. तेव्हा त्यांना परत बोलावून हि जागा भेट म्हणून देण्यात आली होती.
पण राजे मानवेंद्र गोहिल यांच्या मते इतर घरातील मुलांना असे भाग्य मिळत नाही. त्यांना त्वरित घरातून हाकलून लावले जाते. मुलांवर दबाव टाकला जातो. अनेकांचं विरुद्धलिंगी व्यक्तींशी बळजबरीने लग्न लावले जाते. या विचारांना मेनी न केल्यास त्यांना घरातून बाहेर फेकण्यासही लोक कमी करत नाहीत.
तसेच मुलेही आपल्या पालकांशी मानसिकरीत्या जोडलेली असतात. पोट भरण्यासाठी त्यांच्याकडे इतर कुठलेही साधन उपलब्ध नसते. सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य बिघडून अनेक लोक यामुळे स्वतःचे जीवन संपवतात. त्यामुळे अशा लोकांना निवाऱ्याची आणि मदतीची गरज असते.
म्हणून आपण हे केंद्र सुरु करणार असल्याचे राजे मानवेंद्र गोहिल सांगतात.
या केंद्राचं वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारी ‘A’ म्हणजे ‘allies’ लोंकांनाही सामावून घेण्याची संस्कृती. राजे मानवेंद्र गोहिल यांनी लोकांना तोडण्यापेक्षा सामावून घेण्यावर जास्त भर दिला. त्यामुळे समलैंगिक लोकांमध्ये असणारे बरेचसे भेदभाव वगळून त्यांनी हे केंद्र सर्व प्रकारच्या समलैंगिक लोकांसाठी खुलं केलं आहे.
LGBTQA नसणाऱ्या लोकांनी आमची भावना समजून घेतली तरी समाजात बराच फरक पडेल असे ते म्हणतात. या केंद्रात भाषा, संगणक प्रोग्रामिंग, इंग्रजी, आजारांवरती उपचार करण्याच्या पद्धती,संगीत शिकवले जाते.
येथे एकल स्वतंत्र म्युजिक रूमसुद्धा उभारण्यात आली आहे. सध्या या केंद्राची घोडदौड एक सर्वसमावेशक कम्युनिटी केंद्र बनण्याकडे वेगाने सुरु आहे.
हे हि वाच भिडू:
- तृतीयपंथीयांच्या एका दिवसाच्या लग्नामागे आहे महाभारतातील ही कथा.
- ‘लौंडेबाज-ए-हिंद’ ही भारतातील पहिली गे चळवळ होती.
- दात पुढ आलेला हा लाजाळू भारतीय मुलगा जगातला ग्रेटेस्ट रॉकस्टार बनला.