एस. डी. बर्मन आणि लता मंगेशकर यांच्यातील अनेक वर्षांचा वाद पंचमदांनी एका गाण्यातून मिटवला होता…

‘पंचम’ म्हणजे सात सुरांमधला पाचवा सूर. सात सुरांमधला सगळ्यात स्थिर मानला जाणारा.. तो आपली जागा कधीच सोडत नाही. हिंदुस्तानी संगीतात या स्वराला अनन्यसाधारण असं महत्व आहे,

जसं हिंदी सिनेसृष्टीत पंचमदांना…

पंचमदा, म्हणजेच राहुल देव बर्मन (आर. डी. बर्मन) यांच्या संगीतात आपल्याला ‘एव्हरग्रीन’ शब्दाचा खरा अर्थ सापडतो. आजही अनेकांची प्लेलीस्ट अख्खं जग फिरून आली तरी शेवटी येऊन पंचमदांच्या गाण्यावरच थांबते.

आपल्या वडिलांकडून म्हणजेच सचिन देव अर्थात एस. डी. बर्मन यांच्याकडून, लहानपणीच आर. डी. बर्मन यांनी संगीताचं बाळकडू घेतलं, आणि लहान वयातंच शब्दांना चाली देण्यास सुरवात केली. आर. डी बर्मन यांनी संगीत क्षेत्रात अनेक प्रयोग केले, म्युझिक पॅटर्न तयार करताना वाद्यांचा वापर न करता आपल्या रोजच्या व्यवहारातला वस्तूंचा वापर करणं म्हणजे त्यांची एक वेगळीच खासियत.

साधारण सत्तरच्या दशकात आर. डी. बर्मन यांच्या संगीताने फक्त सर्वसामान्यांनाच नाही तर आपल्या सर्वांच्या लाडक्या गानकोकिळेलाही भुरळ पाडली होती. हि भुरळ इतकी होती की, आर. डी. बर्मन यांनी आपल्या एका गाण्याने लता दीदी आणि एस. डी. म्हणजे बर्मन यांच्यातील वर्षानुवर्षं चाललेला वाद मिटवायला लावला होता.

तर हा किस्सा आहे, १९६१ साली आलेल्या ‘छोटे नवाब’ या चित्रपटातल्या गाण्याचा.

‘छोटे नवाब’ हा चित्रपट एस. ए. अकबर यांनी दिग्दर्शित केला होता. तर प्रमुख भूमिकेत मेहमूद आणि अमिता असणार होते आणि निर्मिती होती उस्मान अली यांची. निर्माता म्हणून उस्मान अली त्यावेळी जराशी नवखे होते.

या चित्रपटाचं संगीत एस. डी. बर्मन म्हणजेच पंचमदांच्या वडिलांनी करावं अशी चित्रपटाच्या टीममधल्या सगळ्यांची इच्छा होती. त्यानुसार मेहमूद स्वतः एस. डींकडे पिक्चर साईन करण्यासाठी गेले. पण एस. डी. बर्मन यांनी हा पिक्चर साईन करण्यास नकार दिला.

आपण इतर कामात बिझी असल्याचं त्यांनी मेहमूद यांना कळवलं, आणि इंडस्ट्रीतल्या नव्या निर्मात्यासोबत काम करणं आत्ता तरी शक्य होणार नाही असंही सांगितलं.

आता हे सगळं संभाषण चालू असताना आर. डी. बर्मन बाजूलाच बसले होते. त्यावेळी मेहमूदना एकाएकी काय सुचलं माहित नाही, पण त्यांनी अचानक या चित्रपटाचं म्युझिक करण्याची ऑफर आर. डी. बर्मन यांना दिली. स्वतः वडिलांनी  यांनी आधीच नकार दिल्यामुळे या बाबतीत आता ते काहीच बोलू शकत नव्हते. पण त्यांनी धाडस करायचं ठरवलं.

साधारण १९५५ सालापासूनचं पंचमदा आपल्या वडिलांकडे सहाय्यक संगीतकार म्हणून काम करत होते.
गुरुदत्तच्या ‘प्यासा’ या चित्रपटासाठी सुद्धा पंचमदांनी सहाय्यक संगीतकार म्हणून काम केलं होतं. त्यांच्या कामावर खुश होऊन गुरुदत्त यांनी १९६० साली आपल्या ‘राज’ या चित्रपटातील संगीताची संपूर्ण जबाबदारी पंचमदांवर सोपवली होती. पण काही कारणाने हा चित्रपट डब्यात गेला आणि पंचमदांची स्वतंत्र म्युझिक डायरेक्टर म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करण्याची संधी थोडक्यासाठी हुकली.

त्यामुळे या चालून आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायचं पंचमदांनी ठरवलं आणि मेहमूदने दिलेली ऑफर लगेच स्वीकारली.

‘छोटे नवाब’ या चित्रपटाच्या संगीताची सगळी जबाबदारी आता पंचमदांवर आली होती, कामाला जोमात सुरुवातही झाली.

या चित्रपाटात क्लासिकलचा बेस असलेलं एक गाणं असणार होतं आणि ते गाणं सर्वोत्कृष्ट गायिका लता मंगेशकर यांनी गावं अशी पंचमदांची इच्छा होती. परंतु एक अडचण अशी होती की, पंचमदांचे वडील म्हणजेचं एस. डी. बर्मन आणि लता मंगेशकर दोन ते तीन वर्षांपासून एकत्र काम करत नव्हते. त्यांच्या दोघांमध्ये काही कारणास्तव वाद निर्माण झाला होता, आणि ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत होती.

परंतु तरीही, पंचमदांनी घाबरत घाबरतंच लता दिदींना या गाण्यासाठी विचारलं. मनात त्यांच्याकडून नकार येईल हेच गृहीत धरलं.

भेट झाली, पंचमदांनी लता दिदींना त्यांनी कंपोझ गेलेलं गाणं ऐकवलं. मात्र त्यानंतर लता दिदींना या गाण्याची चाल इतकी आवडली, की त्यांनी कसलाच विचार न करता गाणं म्हणण्यास होकार कळवला.

हे गाणं होतं, ‘घर आजा घिर आए बदरा सांवरिया.’

पुढे ही गोष्ट एस. डी. बर्मन यांच्यापर्यंतही पोहोचली. लता मंगेशकर यांनी आपल्या मुलाचं गाणं गाण्यासाठी होकार दिला हे ऐकून त्यांनाही आनंद झाला. गाण्याचं फायनल रेकॉर्डिंग झालं, ते ऐकल्यावर एस. डी. बर्मन यांनाही ते अतिशय आवडलं. पुढे काही दिवसातच एस.डी. बर्मन यांनी सगळा वाद विसरून स्वतः लता दिदींना आपल्या ‘बंदनी’ या चित्रपात गाण्यासाठी विचारलं. लता दीदी यांनी देखील कोणताही वाद आडवा येऊ न देता या गाण्यासाठी होकार दिला.

मात्र या सगळ्यासाठी दुवा ठरलं होत ते छोटा नावब मधील लता दीदी यांनी गायलेलं गाणं. जे पंचमदांनी केलं होत. या गाण्यामुळेच लता दीदी आणि एस. डी. बर्मन यांच्यातला वर्षानुवर्ष चाललेला वाद मिटला होता.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.