गेली शंभर वर्ष ही संस्था मद्रासमध्ये मराठी मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करत आहे..

आज शिक्षणाचा बाजार झालेला आपण पाहात आहे. साध्या बालवाडीला जरी प्रवेश घ्यायचा झाला तरी वशिला आणि चार आकडी डोनेशन हे कम्पल्सरी झालेलं सध्याचं चित्र आहे. इंजिनियरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट वगैरे उच्चशिक्षणाची तर गोष्टच निराळी.

अशा काळातही महाराष्ट्राच्या मुख्यभूमीपासून हजारो किलोमीटरवर असलेल्या चेन्नईमध्ये  राहून तिथल्या मराठी विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी हातभार लावणारी एक संस्था गेली १०० वर्षे कार्य करत आहे.

नाव द मराठा एज्युकेशन फंड

या संस्थेची माहिती घेण्यापूर्वी आपण इथल्या मराठी संस्कृतीची माहिती करून घेऊन. तामिळनाडू मध्ये पहिल्यांदा मराठी माणसाचं पाऊल पडलं शहाजीराजांमुळे. महाराष्ट्रातून दक्षिण भारतात आल्यावर बेंगलोर ही त्यांनी राजधानी बनवली आणि तिथून १६३८ साली तामिळनाडूमध्ये मराठा सैन्याच्या मोहीमा सुरु झाल्या.

त्यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी महाराज देखील या मोहिमांमध्ये असायचे. शहाजी महाराजांच्या निधनानंतर दक्षिण भारतातील जहागीर शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजांकडे गेली. त्यांनीच कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सीमेवर तंजावूर संस्थांनची निर्मिती केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा दक्षिण दिग्विजयाची मोहीम हाती घेतली तेव्हा त्यांनी आपले साम्राज्य दक्षिणेत जिंजी वेल्लोर किल्ल्यापर्यंत पसरवले. या किल्ल्यांच्या व्यवस्थेसाठी मराठा सरदारांची नेमणूक केली. तामिळनाडूमध्ये असलेल्या आदिलशाही सुभेदारांना धडा तर शिकवलाच मात्र इंग्रज,डच,फ्रेंच या परकीय व्यापाऱ्यांवर जरब बसवला.

या दक्षिण दिग्विजयानिमित्ताने अनेक मराठे कर्नाटक तामिळनाडूमध्ये वसले. पुढे औरंगजेबाच्या आक्रमणावेळी राजाराम महाराजांना या जिंजी व इतर किल्ल्यांचा फायदा झाला.

नंतरच्या काळात व्यंकोजींच्या वंशजानी तंजावूर संस्थानामध्ये मराठा साम्राज्य आणि मराठी संस्कृती टिकवली. सरफोजी राजांसारख्या भोसले घराण्यातील कर्तबगार राजाने आपल्या कारभाराने संपूर्ण तामिळनाडूमध्ये आदर्श प्रस्थापित केला.

तामिळ आणि केरळ मध्ये जवळपास तीनशेहून जास्त वर्षे या मराठयांनी आपली दक्षिणी मराठी जोपासली.

विशेषतः तंजावर, सालेम,अर्काट आणि मद्रास येथे मराठी भाषिकांचे प्रमाण नजरेत भरण्याएवढे होते. यात फक्त लढाऊ मराठा सरदारांची कुटुंबे होती असे नाही तर तंजावरच्या महाराजांनी मदुराई व इतर मंदिरांच्या देखभालीसाठी संस्थानातील पुजाअर्चेच्या निमित्ताने अनेक ब्राम्हण कुटुंबे देखील महाराष्ट्रातून इकडे बोलावली होती. यातले अनेकजण राज्यकारभारातही मदत करत होते.

पुढे जेव्हा ब्रिटिशांनी संस्थाने खालसा केली तेव्हा त्यांनी संस्थानातल्या मराठ्यांना आपल्या प्रशासनात सहभागी करून घेतले.

अशाच पैकी एक होते तंजावरच्या सदाशिव राव आणि मीनाक्षीबाई यांच कुटुंब. १४ जुलै १८९१ रोजी त्यांच्या पोटी विनायकराव यांचा जन्म झाला. अगदी लहानवयातच हा मुलगा तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा आहे व पुढे जाऊन आपल्या घराण्याचे नाव काढणार हे सगळ्यांना कळून चुकले होते. त्यांचे शालेय शिक्षण कुंभकोणम टाऊन हायस्कुलमध्ये झाले तर त्यांनी डिग्री पंचयप्पा कॉलेजमधून घेतली. घरच्या परिस्थितीमुळे शिकवण्या घेऊन आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.

पुढे रामास्वामी अय्यर आणि अल्लादि कृष्णस्वामी अय्यर या सुप्रसिद्ध वकिलांच्या हाताखाली मद्रास हायकोर्टात वकिलीची प्रॅक्टिस करू लागले.

विनायक राव याना शिक्षण क्षेत्रात विशेष रुची होती. शाळेच्या काळापासून सुप्रसिद्ध गणितज्ञ रामानुजन हे त्यांचे अगदी जवळचे मित्र होते. त्यांचे शिक्षणाचे झालेले हाल, त्यांना परदेशी जाण्यासाठी खाव्या लागत असलेल्या खस्ता विनायक राव यांनी जवळून अनुभवल्या होत्या. अन्न वस्त्र निवाऱ्या प्रमाणे शिक्षण हि देखील प्रत्येक मनुष्याची मूलभूत गरज आहे आणि ती पूर्ण होणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे हे विनायक राव मानत होते.

रामानुजन यांच्यावर जी वेळ आली तशी वेळ येऊ नये म्हणून त्यांनी तामिळनाडूमधल्या मराठी मुलांसाठी एखादी स्कॉलरशिप सुरु करायचा निर्णय घेतला. 

दक्षिण भारतातल्या सर्व दिग्गज मराठी व्यक्तिमत्वांना या संदर्भात त्यांनी भेट घेतली. या पैकी अनेकांना हि कल्पना पसंद पडली. १५ सप्टेंबर १९१२ रोजी मद्रासमध्ये रावबहादूर रामचंद्रराव यांच्या घरात एक बैठक बोलावण्यात आली. त्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील १३ जण उपस्थित होते. एका मोठ्या राज्याचे दिवाण असलेले कृष्णस्वामी राव साहेब या मीटिंगचे चेअरमन होते.

या सगळ्यांच्या चर्चेत मराठी मुलांच्या शिक्षणासाठी एक फंड उभा करायचं ठरवलं. त्याला नाव देण्यात आलं,

“मराठा एज्युकेशन फंड”

फक्त २१ वर्षे वय असणाऱ्या विनायक राव यांना या फंडची सगळी जबाबदारी आणि सेक्रेटरीपद देण्यात आलं. त्यांच्या प्रयत्नातून पहिल्याच वर्षी राज्यभरातून १२९ जणांनी या फंडसाठी निधी दिला. त्यातून ३ मुलांच्या स्कॉलरशिपची व्यवस्था करण्यात आली. तेव्हा पासून ते आज जवळपास ११० वर्षे झाली, हजारो मराठी मुलांना आपल्या उच्च शिक्षणासाठी कधी पैशांमुळे मागे फिरावे लागले नाही.

रामानुजन यांनी विनायक राव यांना केंब्रिजमधून पाठवलेल्या पत्रात देखील या स्कॉलरशिपचा उल्लेख आहे. सूर्यनानारायण यांना हि स्कॉलरशिप मिळाली याबद्दल ते समाधान व्यक्त करतात.

१९१६ साली ट्रिपलिकेन येथे स्थापन झालेल्या राघवेंद्रराव प्राथमिक शाळेची जबाबदारी या संस्थेने घेतली. आजही हि शाळा चेन्नईमधील सर्वोत्तम शाळांपैकी एक आहे. १९३१ साली मराठा एज्युकेशन फंडने आपला ऑफिसच्या कामासाठी म्हणून अलवार पेठ येथे जागा घेतली. तिथे एक हॉल व ऑफिस बांधण्यात आले.

या बिल्डिंगला महाराष्ट्र निवास म्हणून ओळखलं गेलं. तामिळनाडूमधील मराठी कुटुंबाचे हे प्रमुख केंद्र बनले. कित्येक जोडप्यांची लग्ने या हॉलमध्ये झाली. महाराष्ट्रातून चेन्नईला जाणाऱ्या पर्यटकांचे हक्काने उतरायचे ठिकाण म्हणून महाराष्ट्र निवासला ओळखलं गेलं.

पंधरा वर्षांपूर्वी या इमारतीचे रिन्यूएएशन करण्यात आले. आज इथे एसी हॉलपासून सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत.

तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या कानाला गोड वाटणाऱ्या तंजावरी मराठी बोलणाऱ्या या कुटुंबांनी हि संस्था जीवापाड जपली आहे. शंभरच्या वर काळ उलटून गेला तरी मराठा एज्युकेशन फंडच कार्य अविरत सुरु आहे. कोणत्याही मराठी मुलाचा रामानुजन यांच्या प्रमाणे हाल होऊ नयेत म्हणून सुरु झालेला हा फंड तामिळनाडू मध्ये मराठा मुलांच्या शिक्षण क्षेत्रातील यशाचे प्रमुख रहस्य आहे.

हे ही वाच भिडू,

 

Leave A Reply

Your email address will not be published.