मराठ्यांच्या धास्तीमुळं जगातली सगळ्यात मोठी तोफ बनवण्यात आली होती.

काल अजय देवगणच्या तान्हाजी सिनेमाचा पहिला ट्रेलर रिलीज झाला. कोंढाण्यावर नरवीर तानाजी मालुसरे आणि मुघलांसैन्याकडून राजपूत राजा उदयभान राठोड यांची लढाई यात दाखवली आहे. अनेकांना ट्रेलर आवडला काही जणांनी त्यात दाखवलेल्या घटनांच्या ऐतिहासिकते वर प्रश्न चिन्ह उभे केले.

यातच होती नागीण तोफ. सिनेमात दाखवलं आहे कि सैफ अली खान अभिनित उदयभान राठोड एका महाप्रचंड  तोफे वर स्वार झालेला आहे. औरंगजेबाला कोणी तरी सांगत देखील

“उदयभान और नागीण कोंढाणे तक पहूंच चुकी है. “

हे ऐकून बादशहा खुश झालेलं दाखवलं आहे. याचाच अर्थ मुघलांना वाटत होतं की मराठ्यांना हरवण्यासाठी मोठी तोफच कामी येईल. आता तानाजीच्या शूर मावळ्यांनी आपल्या पराक्रमाने ती गोष्ट खोटी ठरवली हा भाग वेगळा.

मात्र खरोखर अशी कोणती तोफ होती का?

आपण गड आला पण सिंह गेला हि गोष्ट अनेकदा ऐकली आहे त्यात या तोफेचा उल्लेख कधी ऐकला नाही. मात्र इतिहासात डोकावून पाहिलं तर उदयभानसोडून दुसऱ्या एका राजपूत राजाने मराठ्यांपासून संरक्षणा साठी एक महाप्रचंड तोफ बनवली होती.

17 व्या शतकात भारतात मराठ्यांचा दबदबा वाढला होता. मराठा साम्राज्याच्या सिमा विस्तारल्या गेल्या. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा धाक कमी झाला होता. मुघलाचं वर्चस्व क्षीण होतं गेलं. अराजकतेनं डोकं वर काढलं.  या उलट मराठ्यांनी दिल्लीपर्यंत आपलं वर्चस्व वाढवलं होतं.

मराठा सैन्याच्या धास्तीमुळे आपलं राज्य अबाधित ठेवण्यासाठी जयपुरच्या महाराजा सवाई जयसिंग दुसरा या राजानं तोफ बनवली.

त्या तोफेचं नाव जयबाण तोफ. ही तोफ जगातील सगऴ्यात मोठी तोफ म्हणून आज ओळखली जाते.

राजा जयसिंग दुसरा हा अंबरचा हिंदू राजपूत राजा. याचा जन्म 1688 चा. त्याचे वडील महाराजा भीशन सिंग यांच्या मृत्यूनंतर औरगंजेबानं 1699 मध्ये राजा जयसिंगाला गादीवर बसवलं. पुढं जाऊन या राजा जयसिंगाने जयपुर शहर वसवलं. त्याकाळी जयपुर शहर हे स्थापतकलेचा उत्तम असा नमुना होता.

मोठमोठाले महल आणि गुलाबी पत्थरांनी बनवलेले सुंदर घरं ही जयपुर शहरांची ओळख होती. जयसिंगने तालकटोरा सारखा सुंदर असा तलाव बनवला. जलमहालाची निर्मीती केली. मोठ मोठे रस्ते बनवले. शहरांच्या निर्मीतीसाठी 64 प्रकारचे विविध कारखान्याची निर्मीती केली. राणींसाठी बागा तयार केल्या.

कोणाचीही नजर लागेल असं सुंदर आणि मनमोहक गुलाबी शहर राजा जयसिंगने वसवलं होतं.

सुरक्षेच्या दृष्टीने जयपुर शहराला सात दरवाज्यांनी सुरक्षित केलं. याच दरम्यान त्यानी अरवली पर्वत रांगेवर असणाऱ्या जुन्या गडाची पुनर्निमीती केली. त्या किल्ल्याला जयगड असं नाव दिलं.

मात्र, असं सगळं असलं तरी जयसिंगला सगळ्यात जास्त भिती होती मराठ्यांची. त्यामुळे मराठ्यांना रोखण्यासाठी राजा जयसिंगने तोफ बनवायचं ठरवलं.

जयगड किल्ल्याच्या दारू खान्यातच तोफ निर्मीती सुरू झाली. त्यासाठी विशेष अशी व्यवस्था करण्यात आली. आजही जयगड किल्ल्याला भेट दिली तर ही तोफ बनवायची विशिष्ट जागा पाहायला मिळते. तोफ डागल्यानंतर तोफेचं तोंडाला तडे जायचे. त्यामुळे या तोफेसाठी विशेष काळजी घेतली गेली. तोफेच्या नळीला अनेक धांतूंचा मुलामा देण्यात आला. कारागिरांनी अनेक वर्षे कष्ट करून ही तोफ तयार केली.

जयगड किल्ल्यावर बनवली म्हणून या तोफेला जयबाण तोफ असं नाव देण्यात आलं.

या तोफेची लांबी तब्बल ३१ फूट ३ इंच होती. तोफेच्या नळीचा व्यास ११ इंच तर वजन तब्बल ५० टन होतं. या तोफेची ४० किमी पर्यंत तोफगोळा डागण्याची क्षमता आहे. त्यासाठी १०० किलो गनपावडरची आवश्यकता लागायची.

ही बलाढ्य अशी तोफ तयार झाल्यानंतर जयगड किल्ल्याच्या डुंगर दरवाजाजवळ ठेवण्यात आली. तयार झालेल्या या तोफेची चाचणी घेण्याचं ठरलं. तोफगोळा डागला गेला. वात पेटवली गेली. तोफेचा प्रचंड असा आवाज झाला. तोफेतून निघालेला गोळा 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या चाकसू या गावाजवळ पडला.

ज्या ठिकाणी हा गोळा पडला तिथं भलामोठा खड्डा झाला. त्या खड्डयाला नंतरच्या काळात तलावाचं स्वरूप प्राप्त झालं. गोळा पडला म्हणून तलावाचं नाव गोलिराम ठेवण्यात आलं. हा तलाव सध्या चोकसू गावातील लोकांची तहान भागवतोय.

चाचणी घेतल्यानंतर या तोफेची करामत दिसली. त्यानंतर कुठल्याच युद्धात या तोफेचा वापर करण्यात आला नाही. मात्र या तोफेमुळे जयसिंग राजाची दहशत वाढली.

अनेक ठिकाणी अजस्र अशा जयबाण तोफेचे किस्से सुनावले जाऊ लागले. मात्र तोफेचं वजन एवढं मोठं असल्यामुळे ज्या जागेवर सुरूवातीला ही तोफ ठेवली गेली तिथून आत्तापर्यंत तोफ कधीच हलवली गेली नाही.

या तोफेला आत्ता 300 वर्षे पुर्ण झालेत. जयगड किल्ल्याच्या एका टोकाला उभी असलेली ही अजस्र तोफ आजही जयपुर शहराचं रक्षण करणाऱ्या सैनिकासारखी भासते.

मात्र असं असलं तरी जगातल्या सर्वात मोठ्या तोफेंची निर्मीती मराठ्यांच्य़ा धास्तीमुळेच झाली होती हे आपल्याला विसरता येणार नाही भिडू.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.