फ्रान्सच्या राजाला ठाऊक होतं जगात महासत्ता व्हायचं असेल तर मराठ्यांची मदत घ्यावी लागेल.

सतराव शतक. भारतात मुघल सत्ता मोडकळीस आली होती. इतर छोट्या मोठ्या शाह्या संपुष्टात आल्या होत्या. तेव्हा सर्वात ताकदवान सत्ता होती मराठेशाही.

पानिपतात आलेल्या पराभवाच्या राखेतून मराठ्यांनी आपल स्थान पुन्हा बनवलं होतं. पुण्यात धूर्त नाना फडणवीस अल्पवयीन सवाई माधवराव पेशव्याला मांडीवर बसवून राज्यकारभार पहात होता. तर होळकर, गायकवाड,नागपूरकर भोसले असे अनेक पराक्रमी सरदार देशभरात फिरून मराठ्यांचा दरारा निर्माण करत होते.

यात सगळ्यात आघाडीवर होते महादजी शिंदे.

महादजीनी आपल्या तलवारीच्या बळावर उत्तरेत सर्व शत्रूंना नेस्तनाबूत करून ठेवल होतं. इतकच काय तर दिल्लीमध्ये लाल किल्ल्यात मुघल बादशहाला नामधारी गादीवर बसवून कारभार आपल्या हातात घेतला होता. अख्ख्या भारतावर सातारच्या छत्रपतींच्या वतीने महादजी शिंदे राज्य करत होते.

याच काळात आणखी एक शत्रू ताकदवान होत होता. सातासमुद्रापारहून आलेले इंग्रज. व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी संरक्षणाच्या नावाखाली शस्त्र हातात घेतली आणि भारतीयांच्या आपापसातील हेवेदावे यांचा फायदा घेऊन हळूहळू एकेक गाव जिंकत सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरु केली. शिवरायांनी दूरदृष्टीने उभा केलेले आरमार पेशव्यांनी बुडवले आणि इंग्रजांचा भारतावर पाया घट्ट झाला.

भारतासारख्या सुपीक, सोन्या हिऱ्याच्या खनिजानी समृध्द असणाऱ्या देशावर फक्त इंग्रजच नाही तर पोर्तुगीज,डच,फ्रेंच अशा अनेकांचा डोळा होता.

दूर युरोपमधल्या या महासत्ता भारत आफ्रिका अमेरिका मध्ये वखारी कोणाच्या मालकीच्या या वरूनमध्ये भांडत होत्या. याचे पडसाद भारतातील सत्ताकारणावरही होत होता. इंग्रज सर्वात धूर्त होते.  भारतातील सर्व साम्राज्यांशी सुरवातीला गोड गोड बोलून राहणारे इंग्रज आता आपला खरा रंग दाखवत होते.

महादजी शिंदेंचा राजकारणाचा अभ्यास मोठा होता. युरोपमधील घडामोडीवर देखील त्यांचे लक्ष होते. इंग्रजांना आवर घालण्यासाठी त्यांच्या शत्रूंना चुचकारण्याच धोरण त्यांनी अवलंबल होतं. शिवरायांनी फिरंग्यावर विश्वास ठेवू नये असे दिलेले आदेश महादजी शिंदेनी तंतोतत पाळले होते.

इंग्रज त्यांचे शत्रू होते  मात्र त्यांच्या एका चांगल्या गोष्टीच महादजी शिंदेना कौतुक होतं ते म्हणजे कवायती सैन्य.

अत्यंत शिस्तबद्ध असणारे हे कवायती सैन्य आपल्याकडेही असावे ही त्यांची इच्छा होती. डि. बॉइन या फ्रेंच सेनाधिकाऱ्यास आपल्या पदरी ठेवले आणि शिस्तबद्ध फौज तयार केली. त्याच्या पदरी तीस हजार कवायती पायदळ, पाचशे तोफा व तीस हजार घोडदळ एवढे सुसज्ज सैन्य होते. ते मुख्यत्वे ग्वाल्हेर येथे असे, व राजधानी उज्जैन येथे होती. त्यात मराठ्यांसोबतच मुसलमान, राजपूत व युरोपीय यांचा भरणा होती.

मराठ्यांची वाढलेली ताकद युरोपमध्ये फ्रेंच राजा सोळावा लुई याच्या कानावर पडत होती. त्याने मराठ्याशी संधान बांधायचं ठरवलं.

इंग्रजांसोबतच्या पॅरीस करारानंतर फ्रेन्चाची अमेरिकेमधील ताकद कमी झाली होती. तिथला अपमान भरून काढण्यासाठी भारतातील वसाहती वाढवायच्या हे फ्रेंचाच धोरण होतं. एकदा भारतावर कब्जा केला तर जगावर महासत्ता बनणे सोपे आहे हे फ्रान्सच्या राजाला ठाऊक होते.

भारतात वाढण्यासाठी त्यांना एका मित्राची गरज होती. माधवराव पेशव्याच्या काळापासून हे प्रयत्न चालू होते. सवाई माधवराव पेशवा होईपर्यंत जवळपास ५ वेळा हे प्रयत्न झाले.

महादजींनी कलकत्त्याच्या जवळ असणाऱ्या चंद्रनगर वर राज्य करणाऱ्या फ्रेंचाशी गुप्त करार केला. यातल्या अटीमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की,

इंग्रजांसोबत युद्ध झाल तर फ्रेंच आणि मराठे एकत्र लढतील. फ्रान्समधून येणाऱ्या सैन्याला भारतात उतरण्यासाठी महादजी शिंदे मदत करतील आणि त्यांना संरक्षण देतील. या सगळ्याच्या बदल्यात फ्रेंच सत्ता मराठ्यांचा बंगालमधील चौथाईचा हक्क मान्य करेल.

फ्रेंचांनी सिऊ ड्यू जा रिन नावाचा एक प्रतिनिधी शिंदेंच्या दिल्ली दरबारात ठेवला. त्यांना भारतात येण्याची एवढी आशा वाढली की त्यांनी बस्सी नावाच्या सेनानीच्या नेतृत्वाखाली मॉरीशस पर्यंत आपले सैन्य हलवलं देखील होते.

महादजी शिंदेनी त्यांनी फ्रान्सशी चर्चा चालू ठेवली मात्र कधीही त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला नाही. इंग्रजांच्या विरोधात उपयोग एवढीच त्यांच्या दृष्टीने फ्रेन्चाची उपयुक्तता होती. दोन्ही सत्ता परकीय आहेत व त्यांचा भारतातील वाढ ही आपल्या देशासाठी समान धोकादायक आहे हे त्यांनी ओळखल होतं.

पण महादजी शिंदेंच्या नंतर मात्र हे पेशव्यांनी या धोरणाकडे दुर्लक्ष केल. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने तर इंग्रजांशी हातमिळवणी करण्याची चूक केली. तर हैदर अलीने फ्रेंचाशी.

दरम्यानच्या काळात फ्रान्समध्ये क्रांती झाली. लोकांनी सोळाव्या लुईचा खून केला. पुढे जगज्जेता नेपोलियन फ्रान्सचा सम्राट बनला. हैदरअलीचा मुलगा म्हैसूरच्या टिपू सुलतानने नेपोलियनला इंग्रजांच्या विरुद्ध भारतात बोलावले. तो निघालाही होता मात्र इजिप्तमध्ये त्याचा पराभव झाला आणि इंग्रजांनी इकडे टिपूला ठार केले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.