मराठ्यांनी तलवार गाजवली म्हणून आजही पुरीच्या जगन्नाथाची रथयात्रा धडाक्यात साजरी होते

ओरिसामध्ये जगन्नाथपुरीची रथयात्रा इतकी प्रचंड असते की तिची तुलना फक्त पंढरपूरच्या वारीशी करता येईल. लाखो लोक या निमित्ताने पुरीमध्ये येतात. आता कोरोनामुळे जरी निर्बंध असले तरी तोच धडाका आणि उत्साह कायम दिसून येतो.

चार धामापैकी एक असलेल्या या जगन्नाथ मंदिराची निर्मिती कलिंगचा राजा चोडगंगाने आणि अनंग भीमदेवाने सु. बाराव्या शतकात केली, असे मानले जाते.

हे मंदिर जगन्नाथाचे (कृष्णाचे) असले तरी येथे कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती असून त्यांस फक्त डोळे, नाक, तोंड एवढेच अवयव आहेत. त्या दर बारा वर्षांनी नवीन करतात.

शेकडो वर्षांपासून या मूर्तींविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. रथयात्रा हा इथला प्रमुख उत्सव मानला जातो. जगन्नाथाचा जड रथ हजारो लोक ओढून नेतात.

संपूर्ण देशभरातून लोक या उत्सवासाठी ओरिसामध्ये दाखल होतात.

अनेक वर्षे इथे मुघलांनी राज्य केले. इथून मिळणाऱ्या यात्रा कराच्या उत्पन्नामुळे त्यांनी जगन्नाथ पुरीकडे वक्रदृष्टी फिरवली नाही.

पण कट्टर धर्मवेडा औरंगजेब जेव्हा सत्तेत आला तेव्हा त्याने हिंदूधर्म स्थळांची विटंबना करण्यास सुरवात केली. त्याने आपल्या ओरिसामधल्या अधिकाऱ्यांना जगन्नाथाच मंदिर फोडायचा फर्मान काढला होता.

पण कसंबसं तिथल्या पुजाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना लाच देऊन मंदिर वाचवलं.

याच काळात औरंगजेब बादशाह दक्षिणेत मराठ्यांशी युद्धाच्या धामधुमीत गुंतला होता त्यामुळे त्याच त्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष झालं. यामुळे अप्रत्यक्षरित्या मराठ्यांमुळे जगन्नाथ पुरीचं रक्षण झालं.

पण औरंगजेबाच्या मृत्यू पर्यंत हे मंदिर बंदच राहिलं.

पुढे शंभूपुत्र शाहू महाराज छत्रपती बनले आणि मराठा राजसत्तेला स्थैर्य आलं. पेशव्यांनी महाराष्ट्रात कारभाराला घडी बसवली. याच स्थैर्यामुळे बाजीराव पेशव्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राबाहेर मराठी घोडे दौडू लागले.

होळकर शिंदे अशा पराक्रमी सरदारांच्या मुळे संपूर्ण भारतभरात मराठ्यांचा वचक निर्माण झाला. रघुनाथराव पेशव्याने तर अटकेपार झेंडा लावला.

नागपूरच्या बेरार प्रांतात रघुजी भोसलेंचा उदय झाला होता. 

याच काळात शेजारच्या बंगाल प्रांतामध्ये मात्र परिस्थिती गोंधळाची होती. तिथला नवाब अलीवर्दी खान याच्यावर त्याचे सरदार नाखूष होते. अशाच एका नाखूष सरदाराने मीर हबिबने नागपूरच्या भोसल्यांना अवतान धाडले.

सुरवातीला रघुजी भोसल्यांनी भास्कर पंडितच्या नेतृत्वाखाली सैन्य देऊन बंगाल प्रांतात पाठवलं. भास्कर पंडित आणि त्याच्या सैन्याने तिथल्या मुघल व्यापाऱ्यांची लूट आणली. तेव्हा ओरिसा बंगाल प्रांताचाच भाग होता.

जवळपास १० वर्षे मराठ्यांच्या धाडी बंगाल आणि ओरिसा मध्ये सुरू असायच्या.

मराठा सैनिकांची दहशत एवढी मोठी होती की तिथल्या आया आपल्या मुलांना झोप नाही तर मराठा येतील या कथा सांगायच्या.

रघुजी भोसलेंनी बंगालच्या नवबाला एवढे जेरीस आणले की अखेर त्याने मराठ्यांशी तह केला आणि ओरिसाचा हिस्सा त्यांच्या कडे सोपवला.

हे वर्ष होत १७५१. जवळपास दीडशे वर्षांनी ओरिसामधली परकीय राजवट संपुष्टात आली होती.

मराठ्यांच्या हातात सत्ता आल्यावर अनेक बदल घडवून आणले. अनिल धीर या अभ्यासकांच्या मते मराठ्यांनी ओरिसाच्या राजकारभाराची घडी बसवली. बऱ्याच काळानंतर या भागात स्थैर्य व शांतता लाभली होती.

रघुजी भोसलेंनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. जगन्नाथपुरी मंदिराकडे विशेष लक्ष दिले. या मंदिराला दानधर्म केला. इथल्या पूजेसाठी जमिनी दान दिल्या.

रघुजी भोसले यांची आई चिमाबाई हिने देवाला मोहनभोग चढवण्याच्या परंपरेला सुरवात केली.

मराठ्यांनी ब्रजदेव गोस्वामीना इथला मठ प्रमुख बनवलं. एका मराठी गोसावीने सोन्या चांदीच्या मूर्ती दान दिल्या

रघुजी भोसलेंनी जगन्नाथपुरीची रथयात्रा धुमधडाक्यात साजरी करण्यास सुरवात केली. या यात्रेसाठी मोठा निधी दिला जाऊ लागला.

यात्राकरातून येणारा पैसाही मंदिराच्या विकासासाठी वापरला जात होता.

रघुजी भोसलेंच्या नंतर आलेल्या मराठा सुभेदारांनी देखील जगन्नाथ मंदिराची व्यवस्था चोख ठेवली. इतर अनेक जमीनदारांना राजा महाराजांना जगन्नाथाला जमिनी दान देण्यास भाग पाडलं.

मराठ्यांनी कोणार्क मधून अरुण स्तंभ उखडून जगन्नाथ पुरीच्या मंदिरात उभारला.

अस म्हणतात की, जगन्नाथ मंदिरातील दुसरी महत्वाची झुलना ही यात्रा मराठ्यांनी सुरू केली. या यात्रांना भारतभरातून भाविक गर्दी लागले याच प्रमुख कारण म्हणजे इथे असलेल मराठ्यांच राज्य.त्यांच्या पराक्रमाने आपल्या धार्मिक कार्याला संरक्षण आहे ही समजूत दृढ झाली.

मराठ्यांमुळे कोणत्याही धर्मांध राजसत्तेला जगन्नाथ मंदिराकडे पाहण्याची टाप नव्हती.

फक्त मंदिरच नाही तर मराठ्यांनी संपूर्ण ओरिसाचा विकास घडवून आणला. पुरीला बंगालशी जोडणाऱ्या जगन्नाथ सडकची निर्मिती केली.

राजाराम पंडित आणि सदाशिवराव पंडित अशा अनेक सुभेदारांनी अनेक ठिकाणी रस्ते, धर्मशाळा,विहिरी उभारल्या. यात्रेकरूंना सोईसुविधा बनवल्या. करांमध्ये सुधारणा केली, शेतीवर विशेष लक्ष पुरवले. जमिनीचे रेकॉर्ड बनवले.

मराठ्यांनी बनवलेल्या सैनिकांच्या बराकी आजही ओरिसामध्ये उभ्या असलेल्या पाहायला मिळतात.

आज अनेकदा बंगाली इतिहासकार मराठ्यांच लुटारू म्हणून चित्र रंगवतात पण याच मराठी राजसत्तेने ओरिसाला आपल्या पायावर उभे केले होते हा इतिहास त्यांच्या नजरेत येत नाही.

पुढे दुसऱ्या रघुजी भोसलेंनी इंग्रजांशी करार करून या प्रांतावरील हक्क गमावला. मराठ्यांचे राज्य संपुष्टात येताच सर्व प्रथम इंग्रजांनी जगन्नाथाच्या मंदिरावर हल्ला करून तिथला खजिना लुटला.

शेकडो वर्षांनी आजही जगन्नाथाची यात्रा धडाक्याने साजरी होते.

इथल्या सगळ्या विधी परंपरा थोड्या विचित्र आहेत. जगन्नाथ बाबा सर्दी तापाच्या रोगापासून सुरक्षा म्हणून १५ दिवसांच्या क्वारंटाईन पिरियडमध्ये जातात. दरवर्षी लाकडाच्या मूर्तीची पूजा केली जाते.

आजही तिथले लोक जगन्नाथ पुरीची यात्रा संपन्न होते याच श्रेय जातं रघुजी भोसलेंच्या राजवटीला देतात.

संदर्भ-  odisha diaries- The Maratha Barracks: Last Surviving Relic of Odisha’s Renaissance Age
swarajy – When Lord Jagannath Witnessed The Great Maratha Devotion

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.