राजाराम महाराज पालथे जन्माला आले तेव्हा शिवराय म्हणाले “हा दिल्लीची पातशाही पालथी घालील”
छत्रपती शिवराय म्हंटले की पराक्रम, युद्ध, लढाया, रायगड-राजगड यांसारखे बलाढ्य किल्ले, भवानी तलवार अशा कितीतरी गोष्टी झटकन नजरेसमोर उभ्या राहतात. पण महाराजांची अजून एक बाजू आहे. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज समतेचा पुरस्कार करणारे, शेतकरी हितकर्ते, सर्वधर्मसहिष्णू, महिलांचा आदर करणारे होते. तसेच, ते बुद्धिप्रामाण्यवादीही होते. त्यांच्या प्रागतिक विचारांचा प्रत्यय त्यांच्या जीवनातून आणि कारभारातून येतो.
त्यांचा प्रागतिक दृष्टिकोन त्यांच्या मुलाच्या जन्मावेळी प्रकर्षाने दिसून आला. याचा संदर्भ समकालीन कृष्णाजी अनंत सभासदाने नोंदवून ठेवला आहे. २४ फेब्रुवारी १६७० रोजी शिवाजी महाराजांना सोयराबाईंच्या पोटी राजाराम महाराजांचा जन्म झाला. त्यावेळीचा तो प्रसंग सभासद बखरीतून,
राजियास प्रथम स्त्री संभाजी राजियाची माता होती ती निवर्तली त्याजवरी राजियांनी साहा स्त्रिया केल्या. त्यांमध्ये मोहित्यांची कन्या सोईराबाई गरोदर होती. तीस पुत्र जाहला. तो पालथा उपजला. राजियास वर्तमान सांगितले. राजें म्हणूं लागले की, दिल्लीची पातशाही पालथी घालील असें बोलिले.
मग ज्योतिषी म्हणो लागले कीं, थोर राजा होईल शिवाजी राजियाहून विशेष कीर्ती होईल. असें भविष्य केलें. मग राजियांनी राजाराम म्हणोन नांव ठेविलें. आणि बोलिले कीं, राजाराम प्रजा सुखी रखील. आपणापेक्षा याचा पराक्रम होईल, नांवाची कीर्ती बहुत होईल. आपलें नांव रक्षील तर एवढाच रक्षील असें बोलिलें. आणि दानधर्म बहुत केला.
मुलगा पालथा जन्मला म्हणजे अपशकुन झाला, अशी धारणा त्या काळी होती. त्या वेळेस शिवाजी महाराज म्हणाले, ‘हा दिल्लीची पातशाही पालथी घालील.
राजारामांच्या जन्मानंतर दोन – चार दिवसांनी शिवरायांनी निळोपंत यांना पुरंदर सर करण्यासाठी पाठवले. राजारामांच्या बारशाच्या दिवशी निळोपंत यांनी पुरंदर जिंकला आणि पुरंदरचा मोगली किल्लेदार शेख रझीउद्दिनला कैद करून शिवरायांसमोर उभे केले. राजारामांच्या बारशाच्या शुभप्रसंगी पुरंदरवर भगवा फडकल्याची विजयी वार्ता आल्याने आनंदाच्या त्यासमयी शेख रझीउद्दिनला राजांनी सोडून दिले. मृत्यूच्या तयारीने आलेला मोगली किल्लेदार शेख रझीउद्दिन शिवरायांच्या मानवतावादी धोरणाने चकित झाला आणि शिवरायांचे गोडवे गात निघून गेला.
अनुष्ठान बळावर मनोरथ पूर्ण करण्याचा भाबडा दैववाद महाराजांजवळ नव्हता. शिवाजी महाराजांना लोकदैवतांबद्दल आदर होता. परंतु, यश मिळवण्यासाठी रणांगण गाजवावे लागते, नियोजनबद्ध लढा द्यावा लागतो, अर्थात प्रयत्न करावे लागतात, तेव्हाच यश मिळते, हे वास्तव महाराजांना चांगले उमगलेले होते.
स्वराज्य स्थापनेचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी अनुष्ठानाला बसून यशप्राप्ती होणार नाही, याची जाणीव त्यांना होती. हाती घेतलेल्या कार्यात यश मिळविण्यासाठी चातुर्य पणाला लावावे लागते, संघर्ष करावा लागतो, ही वैचारिक प्रगल्भता महाराजांकडे होती. ते प्रवाहपतित, म्हणजेच प्रवाहाबरोबर वाहत जाणारे नव्हते. त्यांची काही ठाम मते होती. त्यांच्या काही पत्रांतून, विविध प्रसंगांतून ती स्पष्ट दिसतातच.
हे ही वाच भिडू.
- मराठा साम्राज्याने निर्माण केलेली पहिली वेल प्लॅन्ड सिटी देशाची राजधानी बनली..
- या सरसेनापतींनी सर्वप्रथम गुजरातला मराठ्यांच्या टापेखाली आणलं..
- युद्धात ठार केलेल्या पाटलाच्या मुलाला छत्रपतींनी आपलं नाव दिलं
- ताराराणींच्या पराक्रमामुळे औरंगजेबाची कबर मराठी मातीत खोदली गेली.