आपल्या सर्वात मोठ्या शत्रूचे थडगे फोडून, त्यावर नाचून मराठ्यांनी घेतला होता “पानिपतचा बदला..”

पानिपत म्हणजे मराठ्यांच्या असीम शौर्याचे प्रतीक. पण पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांची एक पिढी खर्ची पडली. देशाचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराणे आपले योगदान दिले. पानिपत घडण्यास जी काही कारणे होती, त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे

‘नजीबखान रोहिला.’

याच नजीबामुळे मराठ्यांचे हजारो सैनिक धारातीर्थी पडले. मराठ्यांना भळभळती जखम देऊन नजीबखान मात्र सुरक्षित राहीला. पानिपतच्या युद्धानंतर मल्हारराव होळकर, महादजी बाबा शिंदे, माधवराव पेशवे यांनी मराठा साम्राज्याची उत्तरेतील दहशत पुनःप्रस्थापित केली. पण, मराठ्यांचा मुख्य शत्रू नजीबखान 30 ऑक्टोबर 1770 रोजी नैसर्गिक कारणांनी मरण पावला.

आपल्या शत्रूची खांडोळी करता आली नाही, याचे शल्य महादजी बाबांच्या मनात कायम होते. राजपूत-जाटांच्या मोहिमेवर असतांना त्यांना नजीबाच्या मृत्यूची बातमी समजली. त्यांनी लगेच आपला मोर्चा ‘रोहीलखंडाकडे’ वळवला.

इकडे, नजीबाच्या तीनही मुलांमध्ये वारसायुद्ध सुरू होते. यात झाबताखानाने बाजी मारली. पण त्याला सत्तेचा फार काळ लाभ घेता आला नाही.

नजीबाचे मुख्य ठाणे असलेल्या ‘पत्थरगड’ किल्ल्यालाच मराठ्यांनी वेढा घातला. झाबताखानचे धाबे दणाणले. मराठ्यांना तोंड देण्याएवढी ताकद त्याकडे नव्हती. जमेल तेवढ्या मौल्यवान गोष्टी आणि बायकापोरांसह झाबताखान किल्ला सोडून रात्रीच्या अंधारात पळून गेला. किल्ल्यामध्ये हाहाकार उडाला.

मराठ्यांची एक तुकडी झाबताखानाच्या मागावर पाठवून महादजी शिंदेंनी किल्ल्यावर हल्ला केला. किल्ल्याच्या आत असलेल्या बायका पोर सोडली, तर एकूण एक व्यक्तीला कापून काढले. साऱ्या किल्ल्यात रक्ताचे पाट वाहू लागले.

त्याच वेळी एक गोष्ट घडली. मराठ्यांच्या ऱ्हासास कारणीभूत ठरलेल्या नजीबखानाचे थडगे किल्ल्यात असल्याची माहिती मराठ्यांना मिळाली.

झाले. त्याच्या थडग्यासमोर मराठे जमले. कुदळ, फावडे, पहारी हातात जे येईल त्या गोष्टीने मराठ्यांनी नजीबाचे थडगे फोडले. एक सेनापती त्याच्या कबरीत उतरला आणि त्याची हाडे उधळत त्या थडग्यावर थयथया नाचू लागला.

त्या वीराचे नाव होते ‘विसाजी पंत बिनीवाले’ उर्फ विसाजी चिंचलकर..

विसाजी पंत सैन्यप्रशिक्षण आणि सुरुवातीच्या काही लढायामधे नेहमी समोर राहून युध्द करत म्हणून त्यांना ‘बिनीवाले’ ही पदवी मिळाली, जी त्यांच्या नावापुढे कायम लागली. बिनीवाले म्हणजे आघाडीचे सरदार.. त्यांचे खरे आडनाव चिंचलकर.

इसवी सन 1759 ते सण 1772 या 13 वर्षाच्या आपल्या पराक्रमी कारकीर्दीमधे त्यांनी अनेक लढाया मारल्या. इसवी सन 1769 मधे राजपूतांनी युद्ध न करताच 60 लाख रुपये मराठा साम्राज्याला दिले. पुढे 5 एप्रिल 1770 ला हरयानाच्या जाटांना हरवले. नजीबाचे थडगे फोडून त्यांनी मराठ्यांचा पानिपतच्या युद्धात झालेल्या अपमानाचा आणि नुकसानाचा बदलाच घेतला होता.

मराठ्यांनी पत्थरगड लुटला. महादजी बाबांनी तर जमिनीच्या वर 2 इंच दिसणारे प्रत्येक बांधकाम तोफ लावून उडवून देण्याची आज्ञा दिली होती.

संपूर्ण पत्थरगड धुळीस मिळाला. किल्ल्यातील लोकांनी मराठ्यांच्या भीतीने खंदकात सारी मालमत्ता टाकून दिली होती. मराठ्यांनी पाटाद्वारे सारे पाणी खंदकातून काढले आणि ती सारी मालमत्ता मिळवली. यात मराठ्यांच्या हाती सोन्याच्या मोहरा लागल्या, 12,855 तोळे सोने मिळाले, 17 रूप्याचे पलंग, मोती, हिरे, माणिक आणि असंख्य मौल्यवान वस्तू लागल्या.

शेवटी झाबताखानाने मराठ्यांना 40 लाख रुपये देऊन स्वतःच्या जीवाची सुटका करून घेतली.

मराठ्यांच्या या विजयी मोहिमेनंतर माधवराव पेशव्यांनी आपल्या पराक्रमी सरदारांचा भव्य सन्मान केला. नजीबाचे थडगे फोडणाऱ्या विसाजी पंतांवर माधवरावांनी सोन्याच्या मोहरा उधळल्या होत्या. आपल्या सर्वात मोठ्या शत्रूचे अस्तित्वच मराठ्यांनी नष्ट करून टाकले. आजही नजीबखानचे थडगे किंवा पत्थरगड किल्ला अस्तित्वात नाही. जे काही सापडते, ते केवळ भग्न अवशेषांच्या रुपात..

पानिपतच्या युद्धाचा मराठ्यांनी घेतलेला हा सर्वात मोठा बदला होता.

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. योगेश गायकर says

    विसाजीपंत कबरीवर नाचले याचा संदर्भ कुठे दिलेला आहे?

Leave A Reply

Your email address will not be published.