झोप नाहीतर मराठा येतील. बंगालमधली हि मराठ्यांची दहशत रघुजीराजे भोसले यांच्यामुळे झाली होती.

रघुजीराजे भोसले नागपूरकर. मुळचे सातारा जिल्ह्यातल्या देवूरचे हे भोसले घराणे. यांचे आजोबा शिवाजी महाराजांच्या सैन्यात लढले होते. अगोदर पासूनचे शूर योद्ध्यांचे हे घराणे. पेशव्यांच्या काळात त्यांना मोठी लष्करी पदे आणि बेरार येथील चौथाईचा अधिकार मिळाला.

नागपूर तेव्हा गोंडवना साम्राज्याची राजधानी होती. १७३९ साली तिथल्या राजाचा मृत्यू झाला. त्याचा वारसदार कोण होणार यावरून वाद सुरु झाले. यावेळी राजाच्या विधवा राणीने रघुजी भोसले यांच्याकडे मदत मागितली. रघुजी तेव्हा मराठ्यांच्यावतीने बेरार प्रांताचा कारभार बघत होते.  

रघुजींनी मध्यस्ती करून राजा गोंडच्या दोन पुत्रांना ज्यांना आधी राज्याबाहेर काढून बेरारला धाडण्यात आले होते, राज्य दिले. पण १७४३ मध्ये दोन भावात परत वाद उद्भवला. थोरल्या भावाने परत रघुजींना विनंती करून हस्तक्षेप करण्यास सांगितले.

तेव्हा रघुजींनी थोरल्या भावाविरोधातील बंडाळी मोडून काढली. पण कमी काळात दोनदा एवढ्या जवळ हाती आलेली सत्ता परत न करण्याचा मोह रघुजींना आवरला नाही आणि त्यांनी गोंड राजा बुरहान शानला, फक्त राजकीय बाहुले बनवून खरी सत्ता आपल्या हातात घेतली.

रघुजी मोठे पराक्रमी होते. गनिमी कावा युद्ध आणि मैदानी युद्ध या दोन्ही प्रकारामध्ये त्यांची सेना तरबेज होती. याच बरोबर रघुजीना राजकारणाची चांगलीच समज होती. शेजारच्या राज्यात घडणाऱ्या घटनांकडे ते दुर्लक्ष करत नसत. उलट याचा आपल्या राज्याच्या वाढीस काही फायदा आहे का याचा कायम कानोसा ते घेत असत.

तिसुवरपूरमच्या राजावर अर्काटच्या नवाबाने हल्ला केला. यावेळी या राजाने दोस्त खानच्या मुघल सेनेविरुद्ध मराठ्यांकडे मदत मागितली, यावेळी रघुजी भोसले आपली सेना घेऊन तिथे गेले. त्रिचनापल्लीच्या सुप्रसिद्ध युद्धात मुघलांचा पाडाव केला. या युद्धातील विजयामुळे अख्खे कर्नाटक तीन वर्षासाठी मराठी सत्तेच्या ताब्यात आले.

१७४१ साली अलीवर्दी खान बंगालचा नवाब होता. त्याच्या विरुद्ध त्याचा ओरिसाचा सुभेदार मुर्शिद कुली खानने बंड केले.

हे बंड अलीवर्दी खानने मोडून काढले. यावेळी मुर्शिद कुली तिथून पळाला, त्याने रघुजी भोसलेंकडे मदत मागितली. त्याच्या मदतीला राघुजीनी आपला खास सरदार पंडीत भास्कर राम कोल्हटकर यांना खास सेना देऊन पाठवले. या मराठा सेनेने ओरिसा आणि बंगालचा काही भाग जिंकला. तिथे मुर्शिद कुलीच्या जावयाला सुभेदार म्हणून बसवले.

नवाब अलीवर्दी खानने स्वतः जाऊन नव्या सुभेदाराचा पडाव केला आणि ओरिसा मराठी सत्तेच्या ताब्यातून परत घेतला. पण त्याच्या ताकदीचा तोपर्यंत मराठ्यांना अंदाज आला होता.

मुघल सैन्य हे आकाराने मोठे असायचे, तोफा हत्ती  यामुळे त्यांना गतीने हालचाल करणे जड जायचे. बंगालचा सुभा समृद्ध होता. इथले जमीनदार, व्यापारी बराच पैसा राखून होते. रघुजी भोसलेना लक्षात आले हा पैसा राज्याच्या कमी उपयोगात अंत येऊ शकतो.

यानंतर दरवर्षी मराठी घोडेस्वारांची सेना म्हणजेच ज्यांना बारगीर म्हणून ओळखतात ते बंगालवर हल्ला करू लागले. यातील अनेक मोहिमा रघुजी भोसले किंवा भास्कर पंडीत यांच्या नेतृत्वा खाली लढण्यात आल्या. या मोहिमा गनिमी काव्याने लढल्या जायच्या. मराठा बारगीर कधी आले कधी गेले कळायचे ही नाही.    

भास्कर पंडीतने दैन्हात नावाचे शहर वसवले. इथे मुख्य तळ उभारून बाकीच्या बंगालवर हल्ला करणे सोपे जात होते. मराठा सैनिककडे फक्त घोडा भाला आणि एक घोंगड एवढच सामान असायचे. त्यांचा वेग विद्युतप्राय असायचा. 

या सैन्याची दहशत बंगालमध्ये पसरली. काही काही ठिकाणी अफवा पसरल्या की “बारगीर येतात आणि गावोच्या गावो लुटून जातात. खंडणी न देणाऱ्याला कापून टाकण्यात येते.”

बंगालचा नवाब त्यांना पकडण्यासाठी खूप प्रयत्न करायचा पण ते त्याच्या हाती लागायचे नाहीत. मराठ्यांच्या येण्याच्या चाहुलीमूळ लोक गाव सोडून शेतात जाऊन लपू लागले.

बंगालीमध्ये एक लोकगीत प्रसिद्ध आहे,

छेले घुमालो पाडा झुलालो बोर्गी एलो देशे
बुल्बुलिते धान खेयेछे खाजना देबो किशे

याचा अर्थ, मुल झोपली, चाळ झोपली बोर्गी (मराठा बारगीर) आले रे आले. पक्ष्यांनी धान्य खाऊन टाकलं आता खंडनी कुठून देऊ रे?

आजही मुलांना झोपवण्यासाठी या लोरी बंगालमध्ये सांगण्यात येतात एवढी दहशत पसरली होती. काही ठिकाणी असं लिहिलं आहे की मराठी सैन्याच्या हल्ल्यात चार लाख बंगाली मारले गेले. अर्थात हा आकडा नंतरच्या काळात फुगवून सांगण्यात आला असावा.

अखेर बंगालच्या नवाबाने रघुजी भोसलेच्या पुढे गुढघे टेकले. ओरिसा आणि सुवर्णरेखा नदीपर्यन्तचा बंगालचा प्रांत मराठी सत्तेला जोडून टाकला याशिवाय बंगालचा वीस लाख आणि बिहारचा १२ लाखाचा कर मंजूर केला.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Baboo J. says

    What is this “Berar”? It is “Warhad”. During British times, British used to pronounce it as “Berar” – but you surely can refer to it by its original name, right?

Leave A Reply

Your email address will not be published.