म्हणून अटकेपार पराक्रम गाजवणाऱ्या मराठा साम्राज्याला कधी पैशांची चणचण भासली नाही

काबुल कंदहारच्या सीमेपर्यंत धडकलेल्या मराठा साम्राज्याची आर्थिक घडी अतिशय मजबूत होती. मराठ्यांचे राज्यविस्तार धोरण म्हणा किंवा जिंकलेल्या नवनवीन प्रदेशातून, मांडलिक राज्यांकडून येणाऱ्या चौथाईच्या रकमा मराठयांना सुबत्ता प्राप्त करून देण्यास सक्षम होत्या.

यांमध्ये मराठ्यांना कधीही आर्थिक चणचण भासू न देणारी सर्वात ‘स्ट्रॉंग सिस्टीम’ होती मराठा साम्राज्यातील सावकारांची.

आज ‘सावकार’ म्हणलं की काहीशी संमिश्र प्रतिक्रिया समाजात उमटते. पण सतराव्या-अठराव्या शतकात या सावकारांच्याच मदतीने मराठ्यांनी अफगाणिस्तानपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत मोठा पराक्रम गाजवला.

चाळीस-पन्नास हजारांचे सैन्य घेऊन भारतभर फिरणाऱ्या मराठ्यांना, त्यांच्या छावणीला कधीही कोणत्याच गोष्टीची कमी या सावकारांनी पडू दिली नाही. यांचे एकेक किस्से अफाट आहेत.

शिवरायांच्या काळात या सावकारांना ‘साहूकार’ म्हणत. आज्ञापत्रात याचा उल्लेख आला आहे. तत्कालीन काळाचा विचार करता उद्योगधंद्यांना फार मोठे स्वरूप नव्हते. जे काही नवनवीन व्यवसाय उभारले जात, ते लघू उद्योग स्वरूपाचे असायचे. त्यामुळे यांनाही फार मोठ्या भांडवलाची गरज नव्हती.

मुळात त्याकाळी कर्ज घेणे ‘पाप’ समजले जाई. लोकांच्या गरजाही मर्यादित स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे कर्जाची देवाण-घेवाण अतिशय कमी प्रमाणात होत राहिली. स्थानिक पातळीवर कर्ज मिळत होते.

पण थोरल्या शाहू महाराजांच्या काळात या सर्व कर्ज देणाऱ्या सावकारांना विस्तारवादी धोरणांची जाणीव झाली.

पेढी व्यवसायाला संस्थात्मक रूप आले. मराठ्यांच्या साम्राज्यात अनेक व्यापारी-सावकार प्रसिद्ध होते. त्यांमध्ये वैद्य, दीक्षित, पटवर्धन, भिडे, वानवले, कानडे, ब्रह्मेन्द्रस्वामी धावडशीकर, रास्ते, मोघे, गद्रे, अनगळ इ. मराठी सावकारांची नावे आपल्याला दिसून येतात. तर दुल्लभ गोविंद, हरिभक्ती, मोहनदास द्वारकदास, जीवनशेठ, दयाराम, वेणीराम राठोड, त्रिविक्रमसेठ इ. अमराठी सावकारांची नावेही कागदपत्रांमधून आढळून येतात.

वैद्य घराणे तर शिवकाळापासून सावकारकीचा व्यवसाय करत असे. रास्त्यांची संपत्ती एवढी प्रचंड होती, की त्यांच्याकडून थेट पेशव्यांनी, प्रतिनिधींनी कोटींच्या किमतीत कर्ज घेतले आहे.

इसवी सन 1761 ला पानिपतचे युद्ध झाले. त्याचवर्षी रास्त्यांनी वाई शहरात दहा लाख रुपये खर्चून मंदिरे बांधली होती. तीनशे वर्षांआधी दहा लाख रुपये म्हणजे किती होतात, याचा अंदाजच केलेला बरा. रास्ते पेशव्यांचे व्याही. थोरल्या शाहू छत्रपतींनी अतिशय चतुराईने या दोन्ही घराण्याचे वैवाहिक नातेसंबंध जोडून दिले आणि बाजीरावांवरील कर्जाचा संपूर्ण बोजा नाहीसा केला, अशीही एक कथा सांगितली जाते.

महादजी बाबा शिंदे यांनी घेतलेल्या 5 लाखांच्या कर्जाला नाना फडणवीस जामीन राहिले होते.

या सावकारांकडून कर्ज घेण्याचे प्रमुख कारण होते लष्करी व्यवस्था. या पेढी व्यावसायिकांचे मराठ्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांसोबत असलेले घनिष्ठ संबंध, याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.

एक उदाहरण द्यायचे झाल्यास, दुसऱ्या-इंग्रज मराठा युद्धामध्ये इंग्रजांनी ब्रिटिश सरकारच्या तैनाती सावकारांकडून कर्ज घेतले होते. या सावकारांची एक छोटीशी ‘बँक’ इंग्रजांनी मुंबईत स्थापन केली होती. त्याचा उल्लेख कागदपत्रांमधून ‘एजन्सी हाऊस’ म्हणून आपल्याला आढळतो. हे कर्ज फेडताना ब्रिटिशांकडून रोख रकमेसोबत काही व्यापारी सवलतीसुद्धा मिळवल्या होत्या.

या सावकारांनी आपली स्वतःची एक ‘टपाल व्यवस्था’ सुद्धा सुरू केली होती.

पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. या लढाईची पहिली बातमी नानासाहेब पेशव्याला मिळाली 24 जानेवारी 1761 रोजी, भेलसा या ठिकाणी. ही बातमी नानासाहेबांना देणारा व्यक्ती दुसरा-तिसरा कुणी नसून मराठ्यांच्या लष्करासोबत गेलेल्या सावकाराचा ‘कासीदा’ होता.

एकूणच काय, तर संपूर्ण मराठा साम्राज्याच्या आर्थिक नाड्या या सावकारी-व्यापारी मंडळींच्या हातात होत्या.

दुसऱ्या बाजीराव पेशव्याने पैश्यांसाठी अनेक सावकारांवर अनान्वित अत्याचार केले. पुढे सन 1818 मध्ये मराठा साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर इंग्रजांनी ही पेढी व्यवसाय पद्धत बंद केली आणि एक चलनी व्यवस्था प्रस्तापित केली. अशा प्रकारे मराठ्यांची दीडशे वर्षांची वैभवशाली परंपरा नष्ट झाली.

  • भिडू केतन पुरी

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.