नोकरीच्या शोधात मराठा टू कुणबी होण्याचा असाही एक मार्ग असतो…

जेष्ठ लेखक रंगनाथ पठारेंचा एक लेख वाचत होतो. त्यात त्यांनी पुणे परिसरातील एका म्हणीचा संदर्भ दिलेला. म्हण होती,

कुणबी मातला आणि मराठा झाला…

या लेखात ते पुढे सांगतात की,

कुणबी आणि मराठे यांतील छेदक रेषा पश्चिम महाराष्ट्रात फार धुसर आहे. कोकणातला कुणबी उर्फ कुळवाडी यांच्या तिथल्या मराठ्यांशी सोयरिका होत नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात कुणबीक ही मराठ्यांची वहिवाट आहे. परिस्थितीनुसार उच्चकुळातील मराठाही श्रीमंत कुणब्याच्या घरी सालगडी म्हणून काम करतो, त्याला कमीपणा वाटत नाही….

अशी वेगवेगळी मते आहे. वास्तविक कुणबी आणि मराठा हा विषय चर्चेत येतो तेव्हा वेगवेगळे संदर्भ येत राहतात. दोन्ही समाज एकच कसा इथपासून ते प्रत्येक मराठा कधीना कधी कुणबी होताच इथपर्यन्तची ही चर्चा असते.

पण वास्तव मात्र एकच आहे ते म्हणजे कुणबी समाजाला आरक्षण आहे आणि मराठा समाजाला आरक्षण नाही. म्हणूनच स्पर्धा परिक्षा करणारे, सरकारी नोकरी शोधणारे, दहावी-बारावीनंतर ॲडमीशनच्या शोधात असणारे असंख्य मराठा तरूण स्वत:ची पाळेमुळे कुणबी असण्यात शोधत असतात.

आपण कुणबी असल्याचा कागदोपत्री शोध कसा लावला जातो ते स्पष्ट करण्यासाठी स्वत:चाच एक अनुभव मांडण्याचा हा प्रयत्न.. 

सन २०१२. शासनाने PSI पदाची मेगाभरती काढली होती. सुमारे १८०० जागा होत्या. आत्ता आपला नंबर पक्का याची जाणीव असंख्य मुलांना होती. यामध्ये खाजगी क्लासवाल्यांना मार्केट आलं होतं, यामध्ये पुस्तक प्रकाशकांना मार्केट आलं होतं, पुस्तक विक्रेत्यांना मार्केट आलं होतं. थोडक्यात काय तर PSI भरतीसाठी मोठ्या प्रमाणात मार्केट आलं होतं.

पण या सर्व गोष्टीमध्ये अजून एका माणसाला मार्केट आलं होतं तो म्हणजे हेळवी !

सांगली, सातारा, कोल्हापूरच्या पट्यात वर्षातून एकदा हेळवी येत नाही अस घर मिळणं दुर्मिळ.

हे हेळवी कोण ?

हेळवी हा भटका समाज. हेळवी समाजाची लोकं हे आपले आडनाव हेळवी असच लावतात. त्यांची मुळ जात धनगर सांगितली जाते. बैलावर संसार घेवून भटकत राहणं हा हेळवी समाजाचा उद्योग. मुळचा कर्नाटकातील सौंदत्तीचा असणारा हा समाज कालानुसार मात्र दक्षिण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सेटल होत गेला.

भटका समाज म्हणलं की वर्षानुवर्ष लिहता, वाचता न येणारा समजा म्हणून पाहिलं जातं. पण हेळवी समाजाचं वैशिष्ट अस की या समाजात फार पुर्वीपासून लिहता वाचता येतं. कारण त्यांच्या उत्पन्नाचा तोच एक मार्ग आहे.

अलुतेदारी- बलुतेदारी वरुन जो काही गावगाडा विकसित झाला त्यामध्ये वंशावळींची नोंद करण्याची कामे हेळवी समाजाकडे आली. 

हा समाज प्रत्येक घराच्या वंशावळीची नोंद ठेवतो.

हि नोंद पुर्वी ताम्रपटावर केली जात असे. नैंदिबैलावरुन प्रत्येक गावाच्या बाहेर ठरलेल्या जागेवर हेळवी समाजाचा मुक्काम पडत असतो. त्यानंतर ठरलेल्या घरांमध्ये जावून एका विशिष्ट नैसर्गिक चालीत पुर्ण वंशावळ वाचली जाते. मुळ पुरुष कोणता, मुळ गाव कोणते, कोणत्या गावातून कोणत्या गावात विस्थापित झाले अशी सर्व माहिती यांच्या पोतडीत असते.

कालांतराने ताम्रपटांचे ओझे निघून गेल्यानंतर ते गुरूंच्या चरणी ठेवण्यात आल्याचं हेळवी सांगतात. कर्नाटकातील मायाक्का चिंचणी हे हेळवी समाजाचा मुख्य ठिकाण. याच ठिकाणी ताम्रपटावरील नोंदी ठेवण्यात आल्याच सांगितलं जातं. त्यांची काळजी घेणाऱ्याला गुरू संबोधल जातं. जेव्हा न्यायनिवाड्याची वेळ येते तेव्हा या ताम्रपटांची नोंद मान्य करण्यात येत असल्याचं सांगितलं जातं.

ताम्रपटात करण्यात आलेल्या नोंदी या शक कालगणनेनुसार असतात. वंशावळीत गोत्र, प्रवर, ऋषिगोत्र, व्यवसाय यांपासूनची सर्व माहिती दिलेली असते. यात देखील गंम्मत अशी की शरद पवारांनी स्त्रीयांना संपत्तीचे समान हक्क देण्याचा कायदा आणल्यानंतर हेळवी समाजामार्फत स्त्रीयांच्या देखील नोंदी केल्या जावू लागल्या.

तर हा झाला हेळवी समाज ?

त्यांचा मराठा आरक्षणाशी नेमका संबध कसा येतो ?

हेळवी समाजाकडे ज्या नोंदी असतात त्यांना शासकिय पातळ्यांवर गृहित धरत जात असल्याचं सांगण्यात येत. पण त्याहून अधिक महत्वाची असती ती वंशावळ. हेळव्याकडून कच्या कागदावर वंशावळ लिहून घेतली जाते. सात आठ पिढ्यांपर्यन्त वंशावळ मिळाली तरी काम होवून जातं. त्यानंतर हि वंशावळ संबधित व्यक्ती गावच्या चावडी, नगरपालिका जिथे जन्म, मृत्यूची नोंद केली जाते अशा ठिकाणी घेवून जातो.

आत्ता रोल निर्माण होतो तो मोडी लिपी येणाऱ्या व्यक्तीचा !

हेळव्याकडून मिळालेली वंशावळ व त्यात असणारी जन्म मृत्यूची तारिख. त्यासंबधात असणारे इतर कागदपत्र यांवर असणारी जातीची नोंद तपासली जाते. हि सर्व कागदपत्रे मोडी लिपीत असतात. गावातील एका वृद्घ गृहस्थाला या कामासाठी बोलवलं जातं. त्यांची रक्कम असते दिवसाला दोन ते तीन हजार. सहसा हि रक्कम तोंडाला येईल ती सांगितली जाते व ती मान्य देखील होते. 

त्यानंतर कागदपत्र धुंडाळली जातात. आपल्या वंशावळीत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसमोर “कुणबी” नोंद केली आहे का ते पाहिलं जातं. जर का तशी नोंद आढळली तर वंशपरंपरेन त्याच्याही नावापुढे कुणबी लागू शकतं अर्थात कुणबी असल्याचा दाखला त्याला मिळू शकतो. महाराष्ट्र शासनाने कुणबी समाजाला इतर मागासवर्गीय समाज OBC घटकांमधून आरक्षणाची तरतुद ठेवली असल्याने मराठा म्हणून नोंद असणारा व वंशावळीत कुणाच्यातरी पुढे OBC म्हणून नोंद असणाऱ्या पुढील पिढ्या या OBC प्रवर्गात जातात.

घटनाबाह्य, कायदेशीरदृष्ट्या चुकिचं आहे का ?

तर नाही या गोष्टी चुकिच्या नाहीत. आपल्या वंशपरेपरेत कुणबी नोंद असेल मात्र कालांतराने हिंदू मराठा अशी नोंद केली असेल तर त्या व्यक्तींचा कुणबी असल्याचं प्रमाण रद्द केलं जावू शकत नाही. या कामात हेळवी समाजाची मिळणारी मदत हि वंशावळ शोधण्यासाठी महत्वाची असल्यानं अशा प्रकारे कुणबी दाखला मिळवणाऱ्या मुलांची संख्या देखील मोठ्ठी आहे. मात्र वंशावळीत कुणबी नोंद नसेल तर त्याला मराठा म्हणूनच खुल्या प्रवर्गातून अर्ज करावा लागतो.

यामध्ये दोष आहे का ? मुलं चुकत आहेत का ? आपण कुणबी असल्याचा दाखला मिळतो तर तो चुकिचा आहे का ? तर नाही अभ्यास करुनच कुणबी समाजाला आरक्षणाच्या कक्षेत ठेवण्यात आलं. पारंपारिक शेतमजूर असणाऱ्या, कमी उत्पन्न असणारे घटक कुणबी घटक असल्याचं स्पष्टपणे दिसतं. दुर्देव अस की जी मुलं आज कुणबी प्रमाणपत्राचा शोध घेतात ती देखील कमी उत्पन्न घटकातूनच येतात.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.