प्रतापगडाने पाहिलाय पराक्रम, जेव्हा मराठ्यांचे छत्रपती हत्तीवर बसून लढले होते.

मोठ्या अनागोंदीचा तो काळ. स्वराज्याच्या छत्रपतीला, मराठ्यांच्या राजाला, संभाजी महाराजांना मुघलांनी फितुरीने पकडले. मराठा स्वराज्याला बसलेला हा जबरदस्त धक्का होता. मोठी आणीबाणीची परिस्थिती ओढवली होती. त्यातच, जुल्फिकारखान उर्फ इतिकादखान हजारोंचे सैन्य घेऊन रायगड ताब्यात घेण्यास निघाला होता.

स्वराज्याची राजधानी.. जिथे खुद्द छत्रपतींचा परिवार वास्तव्यास आहे. जी स्वराज्याच्या तख्ताची जागा आहे. झुल्फिकारखान त्यावर ताबा मिळवण्यासाठी येत होता.

शत्रूकडून संभाजी महाराजांचे अतोनात हाल सुरू होते. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता. अशा धीरगंभीर परिस्थितीत येसूबाई राणीसाहेबांनी मोठ्या हिमतीने सगळ्या गोष्टींचा जबाबदारी स्वीकारली. रायगड लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

या प्रतिकूल परिस्थितीत येसूबाईंनी मोठा करारी बाणा दाखवला आणि राजाराम महाराजांना रायगडावरून निघून जाण्याची आज्ञा केली.

राजधानीवर राहून आपण मुघलांशी लढू, राजाराम महाराजांनी बाहेर पडून मुघलांना सळो की पळो करून सोडावे आणि एकसाथ शत्रूचा निःपात करावा अशी योजना येसूबाई राणीसाहेबांची होती. ठरल्याप्रमाणे राजाराम महाराज कुटुंबकबिल्यासह आणि काही निवडक साथीदारांसह रायगडावरून निसटले आणि राजधानीपासून जवळच असलेल्या प्रतापगडाच्या आश्रयास गेले.

इकडे मुघलांना या गोष्टीची माहिती मिळताच शत्रूची एक तुकडी राजाराम महाराजांच्या मागावर पाठवण्यात आली.

प्रतापगड किल्ला मोठ्या निबिड अरण्यात. वेढा घालणे ही निव्वळ अशक्यप्राय गोष्ट. पण प्रतापगडाच्या आजूबाजूस जर शत्रूने महत्वाच्या वाटेवर ताबा मिळवला, तर या दुर्गम किल्ल्यावर आपण अडकून पडू. शत्रूला ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडल्याशिवाय गत्यंतर नाही, हे राजाराम महाराजांनी ओळखले.

मुघलांचे सैन्य प्रतापगडाच्या पायथ्याला असणाऱ्या ‘पार’ गावाजवळ येऊन पोहोचले. शत्रूची छावणी पडली. स्वराज्यातील काही नामवंत सरदार मुघलांना जाऊन मिळाले. तरीही राजाराम महाराजांनी युद्ध करण्याचा मनसुबा बदलला नाही. आपल्यासोबत रायगडावरून आलेल्या काही मोजक्या विश्वासू लोकांसोबत गडावर असलेल्या सर्वच शिबंदीनिशी मुघलांवर हल्ला करायचा आणि शत्रूचा बंदोबस्त तोडून निघून जायचे, अशी योजना आखण्यात आली.

ठरल्याप्रमाणे सर्व सैन्य युद्धासाठी सज्ज झाले. पिलाजीराव गोळे, रुमाजीराव येरूणकर, जावजी पराटे, संताजी भोसले यांच्यासारखे पराक्रमी सरदार महाराजांसोबत होते.

या अतिभीषय लढाईमध्ये राजाराम महाराजांनी एक धाडसी निर्णय घेतला. राजाराम महाराज हत्तीवर स्वार होऊन युद्धासाठी निघाले. मराठ्यांसाठी हे दृश्य नवीन होते. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही हत्तीवर बसून युद्ध केले नव्हते. पण मराठ्यांचा हा तरणाबांड छत्रपती हत्तीवर बसून युद्ध करणार, याच गोष्टीने सर्वांना स्फुरण चढले.

कोयनेच्या तीरावर लढाईला तोंड फुटले. महाभयंकर युद्ध सुरू झाले. संभाजी महाराजांच्या मृत्यूला फक्त एक-दीड महिना उलटला होता. शत्रूने दिलेल्या जखमा ताज्या होत्या. त्यामुळे मराठे अतिशय त्वेषाने लढत होते.

स्वतः राजाराम महाराजांनी आपला हत्ती ऐन रणधुमाळीत घातला. राजाराम महाराजांनी या युद्धात पराक्रम गाजवला. पण शत्रूची संख्या अधिक होती. स्थानिक सरदार शत्रूला मिळालेले. त्यामुळे मुघलांचे पारडे जड होते. प्रचंड मोठ्या युद्धानंतर मराठ्यांनी हळू हळू गडाचा आसरा घेतला आणि युद्ध थांबले.

भलेही मराठ्यांचा या युद्धात पराभव झाला, तरीही हे युद्ध मुघलांसाठी हानिकारक ठरले.कोयनेच्या पात्रात किती जणांना जलसमाधी मिळाली, याची गिणती नव्हती. राजाराम महाराजांच्या सैन्याने भयंकर नरसंहार केला. अतिशय कमी सैन्याच्या जिवावर महाराजांनी शत्रूला सळो की पळो करून सोडले.

आपल्या आयुष्यातील पहिली लढाई राजाराम महाराजांनी हत्तीवर बसून केली.

मराठ्यांचा छत्रपती मृत्यू पावला होता. राजधानीला शत्रूचा वेढा पडला होता. स्वराज्याचा होणारा छत्रपती केवळ 19 वर्षाचा तरुण.. तोसुद्धा शत्रूच्या वेढ्यात अडकलेला. अशा परिस्थितीत राजाराम महाराजांच्या जीवाचे मौल्य फार जास्त होते.

तरीसुद्धा या तरुण छत्रपतीने कोणत्याही गोष्टीची फिकीर न करता जो पराक्रम गाजवला, त्याला तोड नाही. आपल्या वडिलांनी, पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांनी याच प्रतापगडाला साक्षी ठेवून अफझलखानचा वध केला होता. आणि या पराक्रमी पित्याचा वारसा जपणाऱ्या राजाराम महाराजांनी इतिहासाची पुनरावृत्ती केली.

एक इतिहास असाही आहे, जेव्हा मराठ्यांचा राजा हत्तीवरून लढला होता..

  • भिडू केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.